आंबेडकरी चळवळीला लागलेली ' लाल कीड ' - ले. बबन सरवदे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 28 July 2020

आंबेडकरी चळवळीला लागलेली ' लाल कीड ' - ले. बबन सरवदे


             

                         " जयभीम , लाल सलाम " तो म्हणाल  " जयभीम ठीक आहे. हे लाल सलाम काय?"  मी विचारले
त्याने चमकून माझ्याकडे संशयाने पाहिले व म्हणाला " समविचारी लोकांबरोबर आपण एकजूट केली पाहिजे म्हणून..." त्याचे वाक्य मध्येच तोडत मी विचारले " रक्तहीन क्रांतीचे पुरस्कर्ते आणि रक्तरंजित क्रांतीवर विश्वास असणारे, समविचारी कसे काय? तो थोडा गडबडला. काहीतरी थातूर मातूर बोलू लागला व चिडून मला आंबेडकर द्रोही ठरवून निघून गेला.
                       मित्र हो असाच गोंधळ या लोकांनी आंबेडकरी चळवळीत माजवून ठेवला आहे. तब्बल वीस वर्षे जगातल्या विद्वानांच्या विचारांचा अभ्यास करून शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञाननिष्ठ मानवतावादी बुद्ध स्विकारला. तरीही ही लाल मंडळी आजही बाबासाहेबांवर मार्क्सचा प्रभाव कसा होता हे सिद्ध करण्यासाठी वैचारिक गोंधळ माजवीत आहेत.
                     तसे तर वयाच्या पंचविसाव्या वर्षीच  विद्यार्थी दशेत असतानाच जातींच्या रोगाने ग्रासलेल्या भारतात मार्क्सचे वर्गवादी तत्वज्ञान उपयोगाचे नाही हे           ९ मे १९१६ रोजी 'डॉ. ए. ए. गोल्डनवाईझर अँथ्रोपोलाजीकल' चर्चासत्रासमोर वाचलेल्या ' कास्टस् इन इंडिया ' या निबंधातूनच स्पष्ट मांडले होते. त्यामुळे बाबासाहेबांवर मार्क्सच्या विचारांचा प्रभाव आहे. हे म्हणणे किती चुकीचे आहे सिद्ध होते.
                   राजा ढाले यांनी, संवेदनशील मानवतावादी लेखिका शिल्पा कांबळे यांच्या 'निळ्या डोळ्यांची मुलगी' या कादंबरीच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी त्या कादंबरीत असणाऱ्या 'प्रिय मार्क्स' या कवितेच्या शेवटावर  खूप सुंदर विवेचन केले होते. कवितेचा शेवट असा आहे, जर बाबासाहेब आणि मर्क्स यांची भेट झाली असती तर बाबासाहेब मार्क्सला म्हणाले असते " मी. मार्क्स तू जर इथे जन्मला असता तर थेट माझ्यासारखा वागला असता आणि मी जर जर्मनीत जन्मलो असतो तर थेट तुझ्यासारखा वागलो असतो."  राजा ढाले यावर म्हणाले होते " खरच मार्क्स बाबासाहेबांसारखाच वागला असता पण बाबासाहेब बाबासाहेबांसारखेच वागले असते." या वाक्याचा अर्थ, बुद्ध तत्वज्ञानाची आग्रही मांडणी करणाऱ्या राजभाऊंचा तिरस्कार करणाऱ्या या लाल मंडळींना कसा कळणार?
                      डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे अन्याय अत्याचार विरोधात झालेल्या परिषदेत. आमचे मित्र नाटककार, कवी, साहित्यिक दिवंगत प्रा. सिद्धार्थ तांबे हे ठणकावून बोलले होते. "जर मार्क्स जन्माला आला नसता तर माझ्या आयुष्यात कोणताही फरक पडला नसता. पण जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर मात्र माझी जिंदगी उध्वस्त झाली असती." हे वाक्य भारतातील
तमाम तळागळातील लोकांसाठी निर्विवाद सत्य आहे.
                        पण ही लाल झालेली मंडळी हेतुपुरस्पर आंबेडकरी चळवळीत शिरून दिशाभूल करीत गोंधळ निर्माण करतात. यांना जर लाल चळवळ मान्य आहे तर त्यांनी मार्क्स, लेनिन, माओ, वगैरेचे फोटो प्रतिमा घेऊन खुशाल करावी. आमचा विरोध असण्याचे कारणच नाही. पण ही मंडळी बाबासाहेबांचा फोटो प्रतिमा घेऊन आमच्या वस्त्या नसावीत आहेत त्याला आमचा विरोध आहे आणि कायम असणार.
                       यांचा एक शाहीर आहे बिनबुडाचा. हा आंबेडकरी अनुयायांना भक्त म्हणून हिणवतो. त्यांना आमचे सांगणे आहे आंबेडकरी चळवळीत सगळे प्रामाणिक अनुयायीच आहेत. एकही भक्त नाही. कारण आम्ही आमचा आंधळेपणा १९५६ सालीच बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर सोडून दिलाय. तुम्हा लोकांसारखे आम्ही दुटप्पी वागत नाही. बाबासाहेबांच्या शब्दाबरहुकूम आम्ही वागतो.
                        रमाईचा त्यावेळी आग्रह असताना सुद्धा बाबासाहेब रमाईला घेऊन पंढरपूरला गेले नाहीत. म्हणाले "तेथे भेदभाव करतात. आपण आपली पंढरी निर्माण करू."  आणि आज हे शाहीर गातायत ' चला चला पंढरीला, भेदभाव मिटवायला ' आता यांना काय बोलायचे? अरे...! भेदभाव मिटवयाचा तर दीक्षाभुमीलाच जावं लागणार.... सर्वांना सामावून घेणाऱ्या बुद्धाच्या सावलीत.
                       यांची आणखी काही बुंडुकली ( बिन बुडाची भांडी) आहेत. ती पण कशी दिशाभूल करतात याचे उदाहरण देतो. बाबासाहेबांनी गावकीची कामे सोडायला सांगितली. आम्ही सोडली. खेडी सोडायला सांगितली. आम्ही सोडली. धर्म सोडायला सांगितला. आम्ही सोडला. बाबासाहेबांनी जे जे सांगितले ते ते आम्ही केले. आणि ही मंडळी बौद्धही न होता आमच्या वस्तीत येऊन आम्हाला म्हणतात " जयभीम म्हणायच्या आधी रक्त तपासा." कोणी आम्ही....??? वा रे वा....
                     यावर यांचा युक्तिवाद असतो आम्ही वैचारिक बौद्ध आहोत. तुमच्या कुटुंबियांच्या दाखल्यावर धर्म जातीच्या जागी काय ' वैचारिक बौद्ध ' लिहिता काय? यांचा अती शहाणपणा असा की, जे बौद्ध झालेत, जे प्रगल्भ झालेत, ज्यांनी इथली पारंपरिक चौकट उध्वस्त केलीय त्यांच्या वस्तीत येऊन बाबासाहेब व बुद्ध सांगतायत. यांच्यापेक्षा इतिहासकार मा. म. देशमुख सच्चे आहेत. एका सयूंक्त जयंतीच्या कार्यक्रमात स्टेजवरून बोलले "आम्ही बौद्धांना काय सांगणार? आम्हाला आमच्या समाजात काम करायला पाहिजे ते करता येत नाही ही दुःखाची गोष्ट आहे."
                    आमचे या मिलावटी लालभाईंना सांगणे आहे. तुम्ही ज्या समाजातून आलाय ना त्यांना चळवळ सांगण्याची व समजावून देण्याची जास्त गरज आहे. तिकडे काम करून दाखवा. बघा मा. लक्ष्मण माने, मा. हनुमंत उपरे काका, मा. राजाराम पाटील यांच्यासारखे काही जमतंय का? उगाच आंबेडकरी चळवळ गढूळ करण्याचं काम करू नका.
                          आणखी एक.आपलेच काही प्रसिद्धीला हापापलेले नाव लौकीकासाठी त्यांच्यात सामील झालेले. त्यांचेच बगलबच्चे बनून त्यांच्यातून बाहेर पडल्याचे दाखवत आपल्यात येतात. त्यांना शिव्या घालतात. कसा आपल्यावर अन्याय झालाय हे सांगून सहानुभूती मिळवतात. आपलेच असल्याचे भासवतात पण आतून काम मात्र त्यांचेच करतात. हे सुद्धा खूप घातकी आहेत.
                    आपलं होतंय काय की, शाळा, कॉलेज, विद्यापीठात आपली सक्षम विद्यार्थी संघटना नाही. तेथे तेथे ज्या प्रमुख संघटना आहेत त्यात कम्युनिष्ठांची संघटना बाबासाहेबांच्या प्रतिमेचा वापर करून आपल्या तरुण मुलांना आकर्षित करून घेतात व अलगद त्यांच्या मेंदूत त्यांना अभिप्रेत असणारे विचार ठासून देतात. मग ही कोवळी मुले उगाच दाढया वाढवून काळे झब्बे घालून चुकीच्या मार्गावर चालत राहतात. त्यांना चे गव्हेरा फिवेरा आदर्श वाटू लागतात. त्यातून सावरे पर्यंत अनेक जण उध्वस्त होऊन जातात. आम्हाला हे समजत नाही, रक्ताचा एकही थेंब न सांडता या देशात आमूलाग्र बदल घडवून युगच बदलवून टाकणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा दैदिप्यमान आदर्श समोर असताना यांना परदेशी बाप का हवाय?
                         बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही. आता या कोरोनाच्या काळात सगळे चमत्कारी अवतार कुलूपबंद झाले असताना माणुसकीच्या व करुणेच्या रुपात फक्त बुद्धच उभा होता. जगाची पुनर्रचना करणे हा बुद्धाच्या धम्माचा हेतू आहे असं बाबासाहेब म्हणायचे ते आता सिद्ध होतंय. आणि म्हणूनच आमचा या सगळ्यांना नम्र प्रश्न आहे की, " बाबसाहेबांपेक्षा जास्त कळते का?" जर कळत नसेल ना तर त्यांनी दिलेल्या मार्गावरूनच चालण्याचा प्रयत्न करा. उगाच इकडे तिकडे भरकटवू नका. आमचे प्रामाणिकपणे आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्यानाही  सांगणे आहे की, आंबेडकरी चळवळ सक्षम करायची असेल तर आपलाच मुखवटा धारण करून आलेली ही कीड ओळखून वेळीच रोखली पाहिजे.
                          -बबन सरवदे
                                                 

No comments:

Post a Comment

Pages