मुंबईः महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्येचा चढता आलेख कमी होण्याचे नाव घेत नाही. आज राज्यात ७२९ नवीन कोरना बाधित रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ९३१८ झाली आहे. तर राज्यात आज ३१ रूग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही ४०० झाली आहे. दरम्यान, आज १०६ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या आता १,३८८ झाली आहे.
आज राज्यात ३१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २५, जळगाव येथील ४ तर पुणे शहरातील २ आहेत. मुंबई शहरात आज नमूद केलेले मृत्यू हे दिनांक २० ते २८ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत. जळगाव येथील मृत्यू हे मागील चार दिवसातील आहेत.
आज झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर १५ महिला आहेत. आज झालेल्या ३१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २० रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या ३१ रुग्णांपैकी २० जणांमध्ये (६५%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४०० झाली आहे.
राज्यात आतापर्यंत १ लाख २९ हजार ९३१ जणांच्या घशातील स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख २० हजार १३६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर ९,३१८ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
No comments:
Post a Comment