पावसाळ्यातील पौष्टिक रानभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 16 August 2022

पावसाळ्यातील पौष्टिक रानभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर

किनवट, दि.16:

 दाट जंगलव्याप्त किनवट तालुक्यात अनेक प्रकारचे वनोपज विविध ऋतुमध्ये आढळून येतात. विशेषत: पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या आरोग्यदायी रानभाज्या डोंगराळ भागात आणि शेताच्या बांधावर उगवत असतात. सध्या ग्रामीण भागातील शेतकरी व आदिवासींकडून कर्टुले (करटोली), तांदुळजा (काठेमाठ),शेवगा, कपाळफोडी, उंदिरकानी, टाकळा (तरटे), रानातील अळू, हादगा (अगस्ता), घोळ, सराटे, चुका, वसू, वाघाटे, राजगिरा (कुरडू), सुरणकंद सारख्या चवीला रुचकर असणार्‍या रानभाज्या भाजीमंडईत विक्रीसाठी आणल्या जात आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्‍या या रानभाज्या रासायनिक खते व कीटकनाशकांपासून मुक्त असल्यामुळे,  कर्टुले व सुरणासारख्या भाज्या जाणकार ग्राहक चढ्या भावातसुद्धा विकत घेतांना दिसत आहेत.


         शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात म्हणून त्या पावसाळ्यात आवर्जून खाल्या जातात.


     करटुले ही पचायला हलकी असलेली रानभाजी ही केवळ पावसाळ्यातच उपलब्ध होते. तंतुमय व रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटक यात चांगल्या प्रमाणात असल्यामुळे, या दिवसात ही भाजी खाल्ल्यास सर्दी,खोकला, कफ व इतर अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते; शिवाय बद्धकोष्ठता, मूळव्याधीसह पोटावरील चरबी कमी होण्यासही याची मदत होते. मधुमेह असणार्‍यांनी याची भाजी नेहमी सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते, असे जाणकार सांगतात. टाकळा (तरटे)च्या कोवळ्या पानाची भाजी करतात. ही त्वचारोगासाठी उत्तम औषधी असून, ही भाजी उष्ण असल्यामुळे वात व कफ कमी होण्यास मदत होते. कुरडूची कोवळी पाने शिजवून याची भाजी करतात. दमेकरी,जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफ़विकार यात ही भाजी उपयुक्त आहे. तसेच ही भाजी लघवी साफ होण्यासाठी व बिया ह्या मूतखड्यावर उपयोगी आहेत. हादग्याच्या फुलाची व शेंगांची भाजी केली जाते. पचनक्रिया बिघडल्यास, भूक मंदावल्यास, वात,पित्त व कफ दोषात हादग्याच्या भाजीच्या सेवन करावे, असे आयुर्वेद सांगते. तांदुळजा (काठेमाठ) ही भाजी पौष्टिक व सुपाच्य असते. त्याने पचनक्रिया सुधारते. बाळंतिणीच्या जेवणात ही भाजी असल्यास, तिच्या अंगावरील दूध वाढण्यास मदत होते. गरोदर स्त्रीच्या गर्भाची नीट वाढ व पोषण  होते. पित्त,मूळव्याध व रक्तविकार यातही ही भाजी गुणकारी आहे. चुका भाजीला ‘रोचनी’ सुद्धा म्हणतात. ही आंबट-गोड असते. हृदयविकार, दमा, मूळव्याध, हातापायाची जळजळ, मूत्रमार्गाचा दाह यात चुका उपयोगी आहे. डोकेदुखीवर चुका व कांद्याचा रस चोळावा तर चुक्याच्या पानाचा रस दातदुखीवर उपयुक्त आहे. वसू ही जमिनीवर पसरत वाढणारी वनस्पती असून, याच्या कोवळ्या पानाची भाजी केली जाते. यकृताचे (लिव्हर) विकार, पंडुरोग अर्थात अ‍ॅनिमिया, शरीरातील वात कमी करणे यात वसू ची भाजी लाभदायी आहे; मात्र गरोदर स्त्रियांनी वसूची भाजी खाऊ नये. गुळवेलास अमृतवेलही म्हणतात. याच्या पानाची भाजी करतात. ही मधुमेहासह काविळ,सर्दी,ताप, खोकला यावरही उपयुक्त असून, याच्या सेवनाने थकवा दूर होऊन भूक वाढते. वारंवार तहान लागणे,जळजळ होणे यावरही गुणकारी आहे. त्यामुळे स्वादिष्ट व आरोग्यपूर्ण असलेल्या या रानभाज्या पावसाळ्यात आवर्जुन खाव्यात, असे आयुर्वेद व आहारतज्ज्ञांसह आपल्या पूर्वजांनीही म्हटलेले आहे.


  “ पावसाळ्यातील वातावरण हे दमट व ओलसर असल्यामुळे आरोग्यदायी नसते. अशा वातावरणात पौष्टिक,रुचकर व पचावयास हलका आहार घेण्याची सर्वांचीच गरज असते. या काळात निसर्गत:च शरीरातील वातदोष वाढतो व भूकही मंदावलेली असते. त्यामुळे मांसाहारी पदार्थ या काळात पचनक्रिया बिघडवू शकतात. त्याकरिता पावसाळ्यात शाकाहार कधीही चांगला! पावसाळ्यातील चार महिन्यात आंबट,खारट व मधूर पदार्थाचे सेवन करावे. निसर्गाने पावसाळ्यातील रानभाज्यात ही गुणवैशिष्टे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे वर्षाकाळात रानभाज्यांचे सेवन आरोग्यदृष्ट्या उत्तम असते.”


-वैद्य शिरीष पत्की, अध्यक्ष, डॉक्टर्स असोशिएशन, किनवट.

No comments:

Post a Comment

Pages