गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव किनवट तालुका : उत्पादनात घट होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 4 February 2025

गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव किनवट तालुका : उत्पादनात घट होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली


किनवट,दि.03 (प्रतिनिधी) : तालुक्याच्या रब्बी हंगामातील गहू हे महत्वाचे पीक असून, वातावरणातील बदलामुळे त्यावर सध्या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.  शेतकरी मंडळी तालुका कृषी कार्यालयाच्या शिफारसीनुसार तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी झटत असल्याचे चित्र आहे.


       किनवट तालुक्याचे भौगौलीक क्षेत्र 1,56,232.92 हेक्टर असून, रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र 14 हजार 800 आहे. तालुक्यातील रब्बीमध्ये गव्हाची पेरणी झालेले क्षेत्र 07 हजार 082 हेक्टर असून, ते सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 1026.58 मि.मी.असून, जानेवारी अखेर पर्यंत 1,079.20 मि.मी. पाऊस झालेला आहे.


            गहू पिकासाठी सगळ्यात जास्त हानीकारक रोग हा तांबेरा असून, सुरूवातीच्या काळात नारंगी आणि नंतरच्या काळात फेब्रुवारी अखेर तापमान वाढल्यावर काळ्या तांबेऱ्या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो.  तांबेरा रोगाचा प्रसार हा ‘पुक्सीनिया ट्रिटिकीया’ बुरशी मुळे होतो. रोगग्रस्त पानांवरून बोट फिरवल्यास नारिंगी रंगाची पावडर बोटाला  लागते. या रोगाचा प्रादुर्भाव पानाच्या खालच्या व वरच्या बाजूवर होतो. परंतु जर अनुकूल हवामान असेल तर याचा प्रादुर्भाव खोडावर, देठावर, गव्हाच्या ओंबीवरसुद्धा आढळून येतो. पानावर रोगाचा प्रादुर्भाव होताच अंडाकृती लंबवर्तुळाकारआकाराचे हरितद्रव्य नष्ट झालेले लहान ठिपके दिसून येतात. याकडे दुर्लक्ष झाल्यास  शंभर टक्क्यापर्यंत नुकसान होऊन उत्पादनात घट येते. वातावरणात भरपूर आर्द्रता आणि ढगाळ हवामान जर असले तर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. गव्हाचे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना जर प्रादुर्भाव झाला तर दाण्यावर सुरकुत्या पडून त्याचे नुकसान होते.


           ज्या भागातील गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी  प्रोपीकोनॅझोल 25 टक्के 200 मि.लि.प्रति 200 लिटर पाणी या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. या बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ‘मॅन्कोझेब’ किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रत्येकी दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, असे तालुका कृषी कार्यालयाकडून सुचविण्यात आले आहे.


‘‘शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणीच्या वेळी तांबेरा रोगास प्रतिकारक्षम जातीच्या बियाण्यांची निवड करावी. रासायनिक खतांची संतुलित मात्रा द्यावी. नत्राचा (युरीया) शिफारसीपेक्षा अधिक वापर केल्याने, गहू पीक तांबेरा रोगास जास्त बळी पडते. भारी जमिनीत पाणी जरूरीपुरते व बेताचे द्यावे. अती पाणी झाल्यास पिकातील हवामान जास्त दमट होऊन तांबेरा रोगाच्या फैलावास मदत होते.’’

-      बालाजी मुंडे, तालुका कृषी अधिकारी, किनवट.

No comments:

Post a Comment

Pages