शिक्षक सृजनशील असला की सृजनात्मक निर्मिती होते -शिवाजी खुडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 3 February 2020

शिक्षक सृजनशील असला की सृजनात्मक निर्मिती होते -शिवाजी खुडे




शिक्षक सृजनशील असला की सृजनात्मक निर्मिती होते -शिवाजी खुडे

' उमलत्या कळ्या..' चे केंद्रप्रमुखांच्या हस्ते विमोचन

किनवट:
        शिक्षक सृजनशील असला की सृजनात्मक निर्मिती होते. शिक्षक मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी विविध सहशालेय उपक्रम घेतले जातात म्हणूनच जिल्हा परिषद शाळेचे मुले आता मागे राहिले नाहीत तर ते सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहेत असे प्रतिपादन केंद्रप्रमुख शिवाजी खुडे यांनी केले. ते शालेय मंत्रीमंडळाने तयार केलेल्या 'उमलत्या कळ्या' या हस्तपुस्तिकेच्या विमोचन प्रसंगी बोलत होते.

        किनवट तालुक्यातील कमठाला केंद्रांतर्गत जिल्हा परिषद लोणी प्राथमिक शाळेत नुकतेच प्रजासत्ताक महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या ' उमलत्या कळ्या ' या हस्त पुस्तिकेचे विमोचन प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख शिवाजी खुडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप गुंजकर होते.

        सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागता नंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर शाळेत राबवित असलेल्या उपक्रमांपैकी शालेय मंत्रिमंडळ यांची ओळख करून देण्यात आली. याच विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या 'उमलत्या कळ्या.. ' हस्तपुस्तिकेचे प्रकाशन केंद्रप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तिकेत संग्रहित केलेले साहित्य कथा, कविता, सुविचार, सामान्यज्ञान, विनोदी चुटकिले तर आहेच पण विशेष विभाग त्यांनी तयार केले आहेत. त्यात आमची चित्रकला, वर्तमानपत्रात शाळा, छायांकित शाळा, आमची हस्तलिखिते, असे संबंधित साहित्य असून एक आकर्षक पुस्तिका तयार करण्याचे काम शालेय मंत्रीमंडळाने केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले.

        मुख्याध्यापक वर्षा कुलकर्णी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांच्या प्रेरणेने आणि तंत्रस्नेही शिक्षका शाहीन बेग व उपक्रमशील शिक्षिका विद्या श्रीमेवार यांच्या मार्गदर्शनातून 'उमलत्या कळ्या ' ही हस्तपुस्तिका तयार झाल्याचे शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री वेदिका गुंजकर हिने सांगितले. शालेय मंत्रिमंडळातील ज्योती गाताडे, रुद्र गुंजकर, पूजा कोसरे, सलोनी गुंजकर, रोशनी मडावी, राजश्री सावरकर, प्रणव गुंजकर, वैष्णवी हुसूकवाडे, सानिका गुंजकर, आरती माळेकर, प्रजापती गुंजकर, अखिलेश किनाके,  या विद्यार्थ्याने सुरेख नियोजन केले होते.


"आमच्या शाळेत मैत्री उपक्रमांतर्गत आनापान, वॉटरबेल, वृक्षारोपण, निसर्ग सहल, शालेय ग्रंथालय, बिनभिंतीची शाळा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, चित्रकला, योगासने, कवायती, प्लास्टिक मुक्त अभियान, ग्रामसफाई असे विविध उपक्रम घेतले जातात आता तंबाखूमुक्त शाळेसाठी सर्वांनी पुढाकार घेतला आहे."
- रमेश मुनेश्वर ( राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक )

No comments:

Post a Comment

Pages