महावितरणचे कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवावा -पालकमंत्री अशोक चव्हाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 29 April 2020

महावितरणचे कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवावा -पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड, दि. 29:- महावितरणचे अर्धवट व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवावा. शासन आपल्या दारी योजनेतंर्गत प्रलंबित असलेल्या कृषी वीज जोडण्या सुरु कराव्यात, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बैठकीत सुचना दिल्या.

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहातील कॅबिनेट हॉल येथे महावितरणच्या आढावा बैठकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार रावसाहेब अंतापुरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार तुषार राठोड , जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष वाहने आदींची उपस्थिती होती.

कृषी सौर योजनेतंर्गत मंजूर लाभार्थ्यांची कामे तातडीने पूर्ण करावेत. महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांशी सौदार्हपूर्ण वागणूक ठेवून येणाऱ्या अडीअडचणींचे तातडीने सोडवणूक करावी. नवी वीज जोडणीसाठी प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करुन वीज जोडण्या पुरविण्याबाबतही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये नवीन ट्रान्सफार्मरची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्ती करुन देण्यामध्ये मोठा विलंब होतो. त्यासाठी महावितरणने कॉलसेंटर किंवा मोबाईल यॅप विकसित करुन तक्रार निवारण प्रणाली विकसित करण्याच्या सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या.

वीज बिलाच्या थकबाकीमुळे नवीन पायाभुत सुविधा विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे वसुलीमध्ये वाढ करुन महावितरणच्या पायाभूत सोयी सुविधा ज्यामध्ये सबस्टेशन, ट्रान्सफार्मर यामध्ये वाढ होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच वीज चोरी थांबविण्यासाठी ग्रामीण भागात एव्ही केबल व शहरी भागात भुमिगत केबल टाकण्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत. शहरी भागात प्रिपेड मीटर पध्दती सुरु करण्याचा प्रयत्न करावा. पायाभूत सुविधासाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या.

महावितरण कंपनी करत असलेल्या कामाचे सादरीकरण अधीक्षक अभियंता संतोष वाहने यांनी केले. जिल्ह्यातील आमदार महोदयांनी त्या-त्या आमदार महोदयांनी त्यांच्या मतदार संघातील अडीअडचणी मांडल्या.

No comments:

Post a Comment

Pages