प्रा. डॉ. किशोर वाघ यांना राज्यस्तरीय राष्ट्रसंत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कार जाहीर
छत्रपती संभाजीनगर दि.20 : छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी, सुप्रसिद्ध कवी-गायक तसेच राजर्षी शाहू महाविद्यालय, पाथ्री येथील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक व संशोधक प्रा. डॉ. किशोर वाघ यांना “संत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार - 2026” जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था, परळी यांच्या वतीने हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.
विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक बांधिलकी जपत विविध सांस्कृतिक उपक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या डॉ. वाघ यांच्या कार्याची संस्थेने विशेष दखल घेतली आहे. संस्थेचे सचिव पृथ्वीराज शिंदे यांनी निवडपत्र पाठवून अधिकृत घोषणा केली.
राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे आयोजित सोहळ्यात मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ प्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या हस्ते व बार्टी, पुणेचे उपायुक्त विशाल लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
डॉ. किशोर वाघ यांना यापूर्वीही विविध सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या नव्या यशाबद्दल शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रासह सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



No comments:
Post a Comment