अनंत पैलूंचे क्रांतिकारी संत : संत सेवालाल महाराज
गोर बंजारा ही भारतातील आदिम भटकी जमात असून ती अनार्य लोकगणातील मातृपुजक जमात आहे. या जमातीला भारतभर लमाण, लम्बाडी, लभान, बंजारा अशा विविध नावाने ओळखले जाते. मात्र ‘गोर’ ही त्यांची सार्वत्रिक ओळख असून पुरुषाला ‘गोरमाटी’ तर स्त्रियांना ‘गोरणी’ म्हणून ओळखले जाते. या जमातीच्या उत्पत्तीसंदर्भात अनेक सिद्धांत आहेत. उदा. लवणाचा (मीठ) व्यापार करणारे ते लमाण, राजस्थानातल्या ‘लुणी’ नदीच्या खोऱ्यात राहणारे ते लमाण, बनज म्हणजे व्यापार करणारे ते बनजरा किंवा वनात लपून शत्रूवर हल्ले करणारे ते बंजारा. मात्र शैव आणि शाक्त परंपरेशी या जमातीचा सर्वात जास्त जवळचा संबंध आढळून येतो. शंकराच्या पत्नीला अर्थात आदिमायेला ‘गोराही’ म्हटले जाते. गौराही म्हणजे ‘गोराणी’ गोरची राणी, ते गोर गोरणी ही उपपत्ती अधिक सयुक्तिक वाटते. गोर बंजारा स्त्रिया डोक्यावर शिंगे धारण करतात, ते नंदीचे प्रतीक म्हणून. शंकर हा इथला अनार्य लोक गणातील दैवत आहे आणि पार्वती अर्थात आदिमाया शक्ती ही इथली मातृगणातील दैवत आहे. शंकरासारखे बैलाला प्रिय मानणे, शंकराच्या जटाप्रमाने डोक्यावर केस ठेवणें, प्रत्येक कार्यात भांग- घुगरीला महत्त्व देणे, लग्नकार्यात नवरदेवाच्या शेंडीवर पाणी टाकून वधूच्या मातेने शंकराच्या जटातील पाणी पिणे, वधूला हुंड्यात बैल आणि गोणी देणे या सगळ्या प्रथा शैव आणि शाक्त परंपरेला जवळच्या आहेत.
वैदिक तत्त्वज्ञानापासून दूर असल्यामुळे या जमातीत बुद्ध,चार्वाक,महावीरांच्या भौतिक तत्त्वज्ञानाची एक लढाऊ परंपरा आढळून येते. ही परंपरा तपसू, भिल्लक,लख्खीशाह बंजारा,सेवादास या महापुरुषांनी अधिक समृध्द केली. पैकी बंजारा समाजाचे आराध्य दैवत म्हणून संत सेवादास यांची ओळख आहे. संत सेवादास हे केवळ संत नव्हते तर थोर समाज सुधारक,लोकसंघटक, राजकारणी,अर्थतज्ञ,आणि युद्धशास्त्रात पारंगत असणारे शूर वीर लढवय्ये होते. परंतु त्यांचा इतिहास इथल्या बोरू बहाद्दरांनी लिहिला नाही. जे काही थोडे बहुत संदर्भ मिळतात ते मुस्लीम इतिहासकारांच्या इतिहासातच. बाकी सगळा भर गोर बंजार्यांच्या मौखिक साहित्यावर आहे.
सेवादास यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ साली डोडी तांडा, ता.गुठ्ठी, जि.अनंतपुर आंध्रप्रदेश येथे झाला. त्यांच्या आईचे नाव धरमणी तर वडिलांचे नाव भीमा होते. ५२ तांड्याचे प्रमुख म्हणून त्यांना भीमा नायक असे संबोधले जात. भीमा नायक त्याकाळातील मोठे व्यापारी होते. बैलाच्या पाठीवरून मालाची ने आण करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. घरातून वडिलांचा व्यापारी वारसा सेवादासांना होताच, परंतु केवळ तेवढ्यावर न थांबता सेवादासांनी तत्कालीन राजकारणात,समाजकारणात आणि अर्थाविश्वात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. बाबासाहेबांची शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ही त्रिसूत्री त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणली होती. म्हणून त्यांनी हा व्यापार केवळ नफेखोरीच्या किंवा मूठभरांच्या हिताभोवती केंद्रित ठेवला नाही. लाखो लोकांच्या उपजीविकेचे ते साधन बनवले. ग्राहक आणि विक्रेता असे त्यांच्या व्यापाराचे स्वरूप नव्हते. तो फक्त ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय होता. त्या काळी भारतातील राज्यव्यवस्था आणि प्रशासन एकसंघ नव्हते. अनेक छोटे मोठे राज्य होते आणि प्रत्येकाचे कायदे कानून वेगवेगळे होते. त्यामुळे ट्रान्सपोर्टिंग करणाऱ्या व्यावसायिकांना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कर भरावे लागत असे. त्यांची अडवणूक होत असे. म्हणून सेवादासांनी या अशा अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना एकत्र आणले. त्यांची संघटना बांधली. संघटीत शक्तीची पक्की जाण त्यांना होती. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. आपल्या न्याय हक्कांसाठी प्रसंगी राज्यकर्त्यांशी संघर्ष करावा लागेल याची जाण होती म्हणून त्यांनी स्वतःची सरंक्षण फौज उभारली. उत्तरेपासून तर दक्षिणेतल्या सर्व राज्यांच्या राजकारणावर ते बारीक लक्ष ठेवून होते. इंग्रजांना व्यापारी म्हणून भारतात पाय रोवण्यासाठी सगळ्यात मोठा अडसर बंजाऱ्यांची व्यापारी पध्दती ठरत होती. म्हणून इंग्रजांनी सर्व राजांवर बंजार्यांचे व्यापारी नियम मोडीत काढण्यासाठी दबाव आणायला सुरवात केली. त्याविरोधात सेवादासांनी बंड पुकारले. हैद्राबादचा निजाम त्या दबावाला बळी पडत असल्याचे पाहून सेवादासांनी त्यावर हल्ला चढवला. या युद्धात निजाम पराभूत झाला आणि त्याने सेवादासांच्या सर्व अटी मान्य केल्या. तिथून निजामाचा खलिता घेऊन सेवादास दिल्लीचा बादशहा गुलाम खान यांच्या दरबारात गेले. गुलाम खान मोठा घमंडी नवाब होता. त्याने सेवादासांचा प्रस्ताव नाकारला आणि त्यांचा भरल्या दरबारात अपमान केला. सेवादासांनी लगेच आपल्या निवडक नऊशे सैनिकांसह गुलाम खानवर हल्ला चढवला. बादशहाच्या २५००० सैन्याला केवळ ९०० सैन्याने सळो कि पळो करून सोडले यावरून ते युद्धकलेत किती निष्णात होते हे लक्षात येते. शेवटी दिल्लीचे तख्तही त्यांच्यासमोर झुकले आणि नवाब गुलाम खानने शरणांगती पत्कारत त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या. दिल्लीचे तख्त हलवणाऱ्या सेवादासांना भारतातील कित्येक छोट्या मोठ्या संस्थानिकांना हरवणे फार कठीण नव्हते. पण युद्ध आणि सत्ता हे त्यांचे उद्दिष्ट नव्हते. शोषणरहित, अन्यायरहित समाजव्यवस्था हे त्यांचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टाच्या आड येणाऱ्यांची मात्र ते अजिबात गय करत नव्हते. हे त्यांनी राजस्थानातील लोकांची लुट करणाऱ्या, त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या भूमियाचा शिरच्छेद करून सिद्ध केले. अहिंसा आणि शांततापूर्ण सहजीवनाचे ते पुरस्कर्ते होते. पण टोकाची अहिंसा ही देखील एकप्रकारची हिंसाच असते हे ते जाणून होते. म्हणून वेळ-काळ-परिस्थिती आणि गरज पाहून त्यांनी हातात शस्त्रे घेतली.
सेवादास शिक्षणाचे महत्त्व जाणून होते. त्याकाळी आजच्या सारखी शिक्षणव्यवस्था नव्हती. बहुतांश बंजारा समाज हा अशिक्षित अडाणी होता त्यामुळे तो सहपणे वेगवेगळ्या अंधश्रद्धेला बळी पडत. शिवाय शाक्त परंपरेतील काही प्रथांच्या अतिरेकामुळे मद्य, मांस, मैथुन यातच बहुतांशी समाज अडकला होता. भौतिक प्रगतीच्या वाटा खुंटल्या होत्या. त्यातून जन सामान्यांना बाहेर काढण्यासाठी लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून त्यांनी ‘लडी’ रचल्या. तुकारामाच्या अभंगासारख्या या लडी होत्या. त्यातून समाजाला उपदेश केला. ते स्वतः मऱ्यामा याडीचे भक्त होते. परंतु अंधश्रद्धाळू नव्हते. ते सर्व प्रकारच्या धार्मिक कर्मकांडा विरोधात होते. सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, सहिष्णुता हे गुण त्यांनी स्वतः आत्मसात केले आणि मग लोकांना उपदेश केला. ‘केणी भजो मत पूजो मत’ (कुणाला भजू नका, पुजू नका), ‘ जानजो छानजो पच मानजो (कुठलीही गोष्ट आधी जाणून घ्या. बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या आणि स्वीकारार्ह वाटली तरच स्वीकारा)अशी विवेकवादी शिकवण दिली. भगवान बुद्धाचा ‘अत्त दीप भव’ हा मार्ग त्यांनी अंगिकारला. कुणी गोर गरिबांची छळवणूक करू नये म्हणून ‘गोर गरीबेन डांडण खाहे,सात पिढी नार्केमा जाहे’ (गोरगरिबांना लुबाडून खाईल त्याच्या सात पिढ्या नरकात जातील) अशी भीती घातली. ‘करीहे चोरी खाहे कोरी,हाथेमाई आहे हातकडी पगेमाही बेडी’ (चोरी केल्यानंतर हाता पायात बेड्या पडतात आणि तुरुंगवास भोगावा लागतो. म्हणून कुणी त्या वाटेने जाऊ नका) अशी शिकवण ते देतात. अशा कितीतरी लडीमंधून त्यांनी समाज सुधारणेचा मार्ग दाखवला. वैश्विक मानवतावादाची शिकवण दिली. पण आपल्याकडे असामान्य कर्तुत्व असणाऱ्या महापुरुषांचं दैवतीकरण करण्याची थोर परंपरा असल्याने आणि त्यात अलीकडे ब्राम्हणवादाचा संसर्ग झाल्याने सेवादासांना अवतारी घोषित करण्यात आले आणि त्यांच्याभोवती अनेक चमत्कार गुंफण्यात आले. त्यांच्या लडीत अनेक पाठभेदही घुसडण्यात आले. मग एकदा का अवतारी घोषित केले कि त्यांचे कर्तुत्व शून्य होते. त्यांच्या हातून जे जे असामान्य घडते त्यामागे दैवी शक्ती असते अशी धारणा बनते.
तत्कालीन समाजावर संत सेवादासांचा प्रचंड मोठा प्रभाव होता. त्यांचे कार्य केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित नव्हते, जे जे शोषित पिडीत आहेत, गोरगरीब आणि अज्ञानी आहेत त्यांच्या उद्धाराचे अविरत कार्य त्यांनी हयातभर केले. त्यांचा मृत्यू नेमका का आणि कसा झाला यासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध नाही. पण संत तुकारामांसारखे सेवालाल महाराजांना देखील सदेह स्वर्गात धाडून त्यावर भाकडकथा रचण्यात आलेली आहे. त्यामागचे खरे वास्तव जाणून घेणे गरजेचे आहे.
संत सेवादास हे अनंत पैलूंचे संत होते. संत,तत्वज्ञ,योद्धा,व्यापारी,भविष्यवेत्ता,समाजधुरीण,संघटक अशा कितीतरी गुणांचा संगम त्यांच्याठायी पाहायला मिळतो. ‘जे छाती करीय वोन साथ दियुं, हाय नाकीय वोरो डेरो पाडीयु’ असे म्हणत संघर्शील माणसाच्या सोबत राहण्याचे आणि गुलामी करणाऱ्याचे डेरे पाडण्याचे वचन देणारे सेवादास हे बुध्द-चार्वाक-चक्रधर- बसवेश्वर-तुकाराम-फुले –शाहू-आंबेडकर या वैचारिक परंपरेतले आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
जय भीम जय सेवालाल !
-प्रा. सुदाम राठोड
नाशिक

No comments:
Post a Comment