धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी व नागपूर शहरातील सुविधांचे आगाऊ नियोजन करा; बहुजन समाज पार्टीची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
नागपूर : ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून लाखो धम्मबांधव नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर येतात. या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसर, अजनी रेल्वे स्थानक तसेच शहरातील वाहतूक आणि मूलभूत सुविधांचे आगाऊ व प्रभावी नियोजन करण्यात यावे, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या नागपूर शहर शाखेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले.
बसपाचे पदाधिकारी नागरिक व लोकप्रतिनिधींच्या भेटीसाठी निश्चित केलेल्या दुपारी ३ ते ५ या वेळेत जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. मात्र, या वेळेतही जिल्हाधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने निवेदन महसूल विभागाकडे जमा करावे लागले. दीक्षाभूमीसारख्या महत्त्वाच्या विषयावरील निवेदनाबाबत महसूल विभागातील कर्मचाऱ्यांकडे पुरेशी माहिती नसल्याचे दिसून आल्याचा आरोप बसपा पदाधिकाऱ्यांनी केला.
प्रशासनाच्या या निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभारामुळे धम्मबांधवांच्या सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची नाराजीही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
निवेदनातील प्रमुख मागण्या
पावसाची शक्यता लक्षात घेऊन दीक्षाभूमी परिसरात चिखल, दलदल आणि पाणी साचू नये यासाठी कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच मुरूम, खडी किंवा पेव्हर ब्लॉकची व्यवस्था करावी.
धम्मबांधवांसाठी पुरेसे पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट आणि महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत.
स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात करून स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी.
दूरवरून येणाऱ्या नागरिकांसाठी स्नानगृहे, विश्रांतीची ठिकाणे तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध कराव्यात.
दीक्षाभूमी परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी २४ तास वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्रे आणि मदत केंद्रे सुरू ठेवावीत.
अजनी रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या धम्मबांधवांसाठी दीक्षाभूमीपर्यंत विशेष शटल बससेवा सुरू करावी.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचे नियोजन करावे.
अंबाझरी तलाव परिसरात जाणाऱ्या नागरिकांसाठी तात्पुरत्या टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था करावी.
मनपा, पोलीस, रेल्वे, आरोग्य, परिवहन, अग्निशमन विभाग तसेच सामाजिक संस्थांची तातडीने संयुक्त बैठक घेऊन कृती आराखडा तयार करावा.
प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस नियोजन करावे. अन्यथा धम्मबांधवांच्या सुविधांसाठी आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा बहुजन समाज पार्टीच्या वतीने देण्यात आला.
यावेळी बसपाचे शहर अध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, शहर महासचिव मंगेश नागदिवे, शहर उपाध्यक्ष जितु हिवरकर, शहर महासचिव अंकित थुल, शहर सचिव राकेश सहारे, रामटेके साहेब, शुभम पिल्लेवान, मनोज निकाळजे, धीरज डोंगरे, अभय डोंगरे, अमित बनसोड, अजय कुमार, सौरभ सोमकुवर, सचिन खोब्रागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment