कोरडा दुष्काळ जाहीर मराठवाड्यातील सर्व जिल्हे दुष्काळी; राज्यातील २६५ तालुक्यांचा समावेश
विशेष वृत्त | मुंबई: पावसाच्या मोठ्या खंडाने आणि अल निनोच्या प्रभावामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा व दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील 358 पैकी तब्बल 265 तालुक्यांमध्ये अधिकृतरीत्या कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार या तालुक्यांमध्ये दुष्काळाची पहिली कळ लागू झाली असून, महसूल व मदत-पुनर्वसन विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के भूभाग आता दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला असून, शेतकऱ्यांसाठी सवलतींची घोषणा करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील 74 च्या 74 तालुक्यांमध्ये 'ट्रिगर-1' लागू झाला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर (9 तालुके), जालना (8), बीड (11), लातूर (10), धाराशिव (8), नांदेड (14), परभणी (9) आणि हिंगोली (5) या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे.
उत्तर महाराष्ट्रातील ४९ तालुके होरपळले
नाशिक महसूल विभागातील जळगावमधील सर्वाधिक 15 तालुके, अहिल्यानगरमधील 14, नाशिकमधील 10, नंदुरबारमधील 6 आणि धुळे जिल्ह्यातील 4 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.
नुकसानीचे मूल्यांकन पारदर्शक आणि अचूक व्हावे यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बाधित शेतातील उभ्या पिकांची विदारक स्थिती दर्शवणारी छायाचित्रे आणि त्या ठिकाणचे अचूक जीपीएस कोऑर्डिनेट्स (GPS Coordinates) नोंदवूनच पंचनामे केले जातील. कृषी आयुक्त यांच्यामार्फत हा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल, ज्या आधारे बाधित शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष आर्थिक नुकसानभरपाईचा स्वतंत्र आदेश काढला जाणार आहे.

No comments:
Post a Comment