‘ज्ञानतीर्थ-२०२६’ युवक महोत्सवाला उत्साहात प्रारंभ अभिनेते
भारत गणेशपुरे यांच्या हस्ते उद्घाटन; विविध कलाप्रकारचे होणार सादरीकरण
नांदेड, ता. १६ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या अंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ चा आज (ता. १६) उत्साहात प्रारंभ झाला. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेजच्या यजमानपदाखाली आयोजित या महोत्सवाचे
उद्गघाटन मराठी हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हस्ते, तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर,डॉ.प्रवीण पाटील (अध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटी ), प्र- कुलगुरू डॉ.अशोक महाजन , ॲड. प्रदीप नागापूरकर यांच्या उपस्थितीत झाले.
महोत्सवाच्या प्रास्ताविकातून प्रा. राजपाल चिखलिकर यांनी आयोजनाची भूमिका आणि विविध कलाप्रकारांची माहिती दिली. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
१६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या युवक महोत्सवात गायन, वादन, शास्त्रीय नृत्य, समूहगायन, वक्तृत्व, वादविवाद, मूक अभिनय, विडंबन अभिनय, पोवाडा, जलसा, रांगोळी, मेहंदी, छायाचित्रण, व्यंगचित्रकला, पोस्टर पेंटिंग, कोलाज, लोकनृत्य, आदिवासी नृत्य, एकांकिका आदी विविध कलाप्रकारांच्या स्पर्धा होत आहेत.
तिसऱ्या व चौथ्या दिवशी विविध मंचांवर सकाळपासून स्पर्धांना सुरुवात होणार असून, विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. महोत्सवाच्या समारोपप्रसंगी दि.१९रोजी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या वेळी सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवामुळे सायन्स कॉलेज परिसरात विद्यार्थी, कलावंत आणि प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असून, विविध कलाविष्कारांनी परिसराला युवकांच्या उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

No comments:
Post a Comment