प्रासंगिक : मूल्य जाणिवांची पेरणी करणारा गीतकार वामनदादा कर्डक -करण मेश्राम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 14 May 2020

प्रासंगिक : मूल्य जाणिवांची पेरणी करणारा गीतकार वामनदादा कर्डक -करण मेश्राम




आंबेडकरी विचार जनमानसात रुजविणारे अनेक आंबेडकरी गीतकार होऊन गेले. बाबासाहेबांना आपला ऊर्जास्त्रोत मानून पायाला भिंगरी बांधून खेड्यापाड्यापर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहचविणारे अनेक असंख्य ज्ञात व अज्ञात कलावंतांचे कार्य मोठे आहे. बाबासाहेबांच्या मानवमुक्तीच्या लढ्यातील विविध स्तरातील महान व प्रतिभावान कलावंतांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये लोकशाहिर वामनदादा कर्डक हे आंबेडकरी गीतकार आणि लोककलावंत म्हणून महत्त्वाचे नाव समजले जाते.

वामनदादा  कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ साली नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मधील देशपंडी या खेडेगावात झाला. वडील तबाजी कर्डक, आई सईबाई, मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री असा वामनदादांचा परिवार होता. कविता, लोकशाहिरी आणि गीतांच्या माध्यमातून त्यांनी जनमानसात सहज संचार केलेला आहे. त्यांच्या नावावर वाटचाल, मोहळ आणि हे गीत वामनाचे गीतसंग्रह आहेत. शिवाय त्यांची अनेक गीते वेगवगेळ्या गायकांच्या आवाजात कॅसेट्स रूपात ध्वनिफीतही झाली आहेत. तसेच 'माझ्या जीवनाचं गाणं' या नावाने प्रा.रविचंद्र हडसनकर यांनी वामनदादांच्या जीवनावर आत्मकथन लिहिले आहे.

वामनदादा कर्डक हे आंबेडकरी गीतकार आणि लोककलावंत होते. त्यांची गीत लोकजीवनाच्या रोज जगण्याच्या बोलीभाषेतून उत्स्फूर्तपणे साकारणारी आहेत. अशा बोलीभाषेतून रचलेल्या आणि गायलेल्या गीतांमुळेच वामनदादा कर्डक हे गीतकार म्हणून जनमान्य ठरतात. शब्दांचा साधा पेहराव आणि गाण्याचा अकृत्रिम सरळ सुलभ साधेपणा हाच त्यांच्या गायनाचाअलंकार होता. आणि तो सर्वांना आवडत होता.  थोडक्यात सांगायचे झाले तर वामनदादांची  गाणी म्हणजे आंबेडकरी चळवळीची जिवंत वाटचाल आहे. ते आंबेडकरी सम्यक क्रांतीला प्रकाशमय करणारे तेजस्वी गीत आहे.

वामनदादांनी ओळखले होते की, गाणं हे आंबेडकरी विचार जनमानसात पोहचवण्यासाठी  प्रभावशाली शक्ती आहे. संपर्काचे परिणामकारक माध्यम आहे. म्हणून त्यांनी ह्या माध्यमांचा वापर तळागाळातील लोकांना जागृत करण्यासाठी केला. त्यांनी  आपल्या प्रतिभेच्या अभिव्यक्तीसाठी शब्द, सूर, आणि स्वर यांचा एखाद्या क्षेपणास्त्रासारखा वापर मृतवत पडलेल्यांना जागे करण्यासाठी, जागृत करण्यासाठी केला.

आपल्या गाण्याच्या माध्यमातून आंबेडकरी विचार घराघरात पोहचवणाऱ्या लोकशाहिर वामनदादा कर्डक यांचा आज  स्मृतिदिवस आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन..

No comments:

Post a Comment

Pages