"सस्पेंड करा, पण माफी मागणार नाही"; डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने पालकमंत्री
गिरीश महाजनांवर संतापली कर्मचारी
नाशिक :- प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्त नाशिकमध्ये आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात आज एक अनपेक्षित आणि खळबळजनक घटना घडली. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना, वनविभागातील एका महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारत भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख का केला नाही, असा सवाल उपस्थित केला. या प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता.
माधवी जाधव असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून त्या वनविभागात कार्यरत आहेत. पालकमंत्र्यांचे भाषण ऐकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात नसल्याचे पाहून जाधव संतापल्या. त्यांनी थेट व्यासपीठाच्या दिशेने धाव घेत पालकमंत्र्यांना टोकले. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले असता, त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. "मला कामावरून काढून टाकले तरी चालेल किंवा सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक मान्य केलीच पाहिजे," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
आपली भूमिका मांडताना माधवी जाधव म्हणाल्या की, "पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही फार मोठी चूक आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी."
"बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलं नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही?" असा सवाल देखील माधवी जाधव यांनी केला.
माधवी जाधव यांनी भरकार्यक्रमात गोंधळ घातल्याचे सांगत उपस्थित पोलिसांनी त्यांना बाजूला घेतले आणि ताब्यात घेतले.

No comments:
Post a Comment