२० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा समारोप समता, विवेक आणि पर्यायी संस्कृतीचा निर्धार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 2 March 2026

२० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा समारोप समता, विवेक आणि पर्यायी संस्कृतीचा निर्धार

 २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

समता, विवेक आणि पर्यायी संस्कृतीचा निर्धार



नांदेड : राजा ढाले साहित्य नगरी , सदाशिव राव पाटील क्रिडा संकुल मैदान सायन्स कॉलेज येथे उत्साहात पार पडलेल्या विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा समारोप समता, विवेकवाद आणि पर्यायी संस्कृतीच्या घोषणांनी झाला. तीन दिवस चाललेल्या या संमेलनात विचार, काव्य, शाहिरी आणि संवाद यांचा प्रभावी संगम अनुभवायला मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, तसेच विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण आणि आदिवासी भागांतून आलेल्या कवी-लेखक-विचारवंतांच्या उपस्थितीने संमेलनाला व्यापक सामाजिक आशय लाभला.


‘पर्यायी संस्कृती निर्माण : पुढील आव्हाने’ या विशेष सत्रात दिल्ली येथील प्रख्यात इतिहासकार प्रा. रतनलाल यांनी शिक्षणाच्या व्यापारीकरणावर कठोर टीका केली. इंग्रजी शिक्षण महागडे होत असताना सामाजिक दरी वाढत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत स्वप्नाची आठवण करून दिली. ‘मुलांना अंधभक्त नव्हे, तर विवेकवादी आणि प्रश्न विचारणारे बनवा,’ असे आवाहन त्यांनी केले.


‘भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण : हिंदी सक्ती आणि अभिजात भाषेच्या निमित्ताने ’  या परिसंवादात डॉ. वंदना महाजन(मुंबई ) यांनी भाषेतील सत्ता-संबंधांचा ऊहापोह केला. “बोली ही कनिष्ठ नसते. तीही भाषा असते. भाषा वर्चस्वाचे नव्हे, तर संवादाचे साधन झाली पाहिजे,’ असे त्या म्हणाल्या. डॉ. निळकंठ शेरे(रायगड ), डॉ. दिलीप चव्हाण( नांदेड)  आणि अरविंद सुरवाडे (मुंबई)  यांनीही भाषिक अस्मिता आणि हिंदी सक्तीच्या प्रश्नांवर परखड मते मांडली. डॉ. आदिनाथ इंगोले, ज्योती दुधमल आणि सर्जेराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे कवी संमेलन पार पडले. डॉ. भास्कर गायकवाड आणि कपिल दगडे यांनी सूत्रसंचालन केले. विद्रोही आशयाच्या कवितांनी श्रोत्यांना विचारमग्न केले.’लोकआख्यान : शाहिरांचे गणराज्य – लोकशाहीच्या सांस्कृतिक प्रवासाचे संगीत व्याख्यान’  हा कार्यक्रम संपादक,विचारवंत ज्ञानेश महाराज यांनी सादर केला. शाहिरी आणि प्रबोधनाचा संगम साधत लोकशाही मूल्यांची सांस्कृतिक परंपरा त्यांनी प्रभावीपणे मांडली. संविधान गीत गायन , रप संगीत आदि सादरीकरणाने उपस्थितांना तरुणाई ला थिरकायला भाग पाडले. बाल मंच आणि युवा मंचावरून छोट्या कलावंतांनी आपल्या सादरीकरणाद्वारे सर्वांना प्रभावित केले.


संमेलनाच्या समारोप सत्रात अध्यक्ष कवी लोकनाथ यशवंत यांच्या ‘... हे तर होणारच होते’  या नव्या कविता संग्रहाचे प्रकाशन सुषमा लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते करण्यात आले. याच सत्रात जातिमुक्त गाव असा ठराव प्रत्यक्षात राबविणाऱ्या सौंदाळा (ता. नेवासा) येथील सरपंच शरद अरगडे आणि सत्यशोधक बाबा अरगडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. संमेलनस्थळी उभारलेल्या पुस्तक स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लाखो रुपयांची पुस्तक विक्री झाली. समारोप सत्रात एकूण २१ ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात आले. त्यामध्ये हिंदी भाषा सक्ती रद्द करावी, मराठी शाळा बंद करण्याचे धोरण तात्काळ मागे घ्यावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी, खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे,


यांसह शिक्षणातील समानता, भाषिक स्वातंत्र्य, संविधानिक मूल्यांची जपणूक आणि सामाजिक न्याय यांसंदर्भातील महत्त्वाचे ठरावांचा समावेश होता. स्वागताध्यक्ष राहुल एस. एम. प्रधान, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी , किशोर ढमाले , डॉ. राजेंद्र गोणारकर , कमलबाई सरोदे , डॉ. अनंत राऊत, डॉ. आदिनाथ इंगोले , युवराज थोरात , इंजि. भारत कानिंदे,इंजि. विवेक मवाडे, पवन जगडवार,  अर्जुन बागुल , उज्वला पडलवार, राज गोडबोले, डॉ. विजयकुमार माहुरे, डॉ. स्वाती सरोदे , डॉ. प्रेरणा ढवळे, डॉ. हेमंत कार्ले आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून हे संमेलन यशस्वी झाले.समता, विवेक आणि लोकशाहीच्या मूल्यांचा दृढ संकल्प व्यक्त करत विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला.

No comments:

Post a Comment

Pages