नामांतर शहीदांची गाथा शहीद पोचिराम कांबळे स्मृतिदिन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 4 August 2022

नामांतर शहीदांची गाथा शहीद पोचिराम कांबळे स्मृतिदिन



नांदेडपासून ७५ कि.मी.अंतरावर बिलोली,मुखेड व कंधार तालुक्याच्या सीमेवर असलेले टेंभुर्णी हे गाव.या गावात आंबेडकरवादी विचाराचा युवक पोचिराम मरीबा कांबळे आपल्या कुटुंबासाह आनंदात राहात असे.त्यांच्या कुटूंबात पत्नी धोंडाबाई व दोन मुले चंदर आणि बाळू व ३ मुली होत्या.

मातंग समाजातील हा युवक गावातील डाॅ.आंबेडकर जयंतीत सर्वात पुढे असायचा.तो काबाडकष्ट करून स्वाभिमानी व ताठ मानेने जगणारा व नेहमी बौध्दांच्या बाजूने उभा राहाणारा ग्राम पंचायत सदस्य होता.

 नामांतराच्या घोषणेनंतर नामातंर विरोधकाकडून मोठया प्रमाणात हिंसाचार सुरू झाला होता.दलित वस्तीवर हल्ला करून हिंसाचार करण्यासाठी सरपंच करडिंगणे माधवराव पाटील यांच्या घरी बैठक झाली.बैठकीत महार-मांगाची घरे जाळून टाकून पोचिराम व त्याचा मित्र शंकर कांबळे याना ठार मारण्याचा कट रचला गेला.त्यानुसार शुक्रवार दि.४ आॅगस्ट १९७८ रोजी सकाळी सातच्या सुमारास जवळपास दिडशे ते दोनशे लोकांचा जमाव हातात काठ्या,कु-हाडी, चाकू व पेटते टेंबे घेऊन दलित वस्तीवर चाल करून आला.या जमावाने घरे पेटवून दिली.पक्क्या घराना सुरूंग लावून उडवून दिले.त्याच वस्तीत राहाणाऱ्या शंकर कांबळे याचे दोन मजली घर सुरूंग लावून जमीनदोस्त केले.पुढे जमावाने पोचिराम कांबळेला लक्ष्य केले.एवढ्या मोठ्या जमावापुढे आपला निभाव लागणार नाही म्हणून पोचिराम त्याचा मित्र अन्वरच्या घरी लपला होता.पोचिरामच्या शोधात जमाव अन्वरच्या घराकडे निघाला.याची चाहूल लागताच पोचिराम जीव वाचविण्यासाठी पाच कि.मी.अंतरावर असलेल्या खेड गावाकडे धावतच गेला.तेथून राऊतखेड कडे गेला.तेथे रामचंद्र कांबळे यांच्या घरी जाऊन मदतीची याचना केली.मात्र जातीयवाद्यांच्या दहशतीमुळे त्याला मदत मिळाली नाही.तेथून तो काटकळंबा गावच्या दिशेने गेला.जमाव त्याच्या मागावरच होता.पळून पळून तो थकला व एका पाणी असलेल्या खड्ड्यात लपला मात्र त्याचे डोके पाण्याच्या वर होते.हल्लेखोर पोचिरामचा शोध घेत राऊतखेडला आले.तेथे चहापाणी करून ते परत निघालेच होते तोच तेथील पाटलाच्या मुलीने पाण्यात लपून राहिलेल्या पोचिरामचे डोके पाहिले व तिने हल्लेखोराना सांगितले.मोठा जमाव त्या दिशेने गेला व पोचिरामला अखेरीस पकडले.त्या जमावाने अत्यंत निर्दयपणे पोचिरामला काठ्या-कु-हाडीने मारहाण केली.

" बोल,तू जयभीम म्हणशील का? म्हण आता जयभीम,बोल आता जयभीम " असे बोलून जमाव हिंस्त्रपणे मारहाण करत होता.शेवटी त्याचे हातपाय बांधून त्यास गोठ्यात टाकून जिवंत जाळले.या प्रकरणाबाबत पोलिसांची भुमिका उदासीन स्वरूपाची होती.कारण पोलिसानी अज्ञात इसम जळून आकस्मिक मृत्यू झाल्याची पंचनाम्यात  नोंद केली.ही घटना शंकर कांबळे याने उघडीस आणली.देगलूर डिव्हिजनच्या एका पोलिस अधिका-याने स्वतः येऊन या घटनेची चौकशी केली व पोचिरामची हत्त्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले.

पत्रकारांची भूमिका देखील प्रसंगी पक्षपातीपणाची होती.

त्यानी आपल्या वर्तमानपत्रातून ' पोचिराम गुंड व चोर होता अशा आशयाच्या बातम्या छापल्या.मात्र कोणत्याही पोलिस स्टेशनला अशा कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती.तर सी.आय.डी.मार्फत केलेल्या चौकशीत पोचिराम एक सज्जन,दलितांचे नेतृत्व करणारा व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले.

भावपूर्ण स्मरण,विनम्र अभिवादन.

- संकलन : बी.एन. साळवे

No comments:

Post a Comment

Pages