पुस्तक वाचन हाच नटासाठी फार मोठा रियाज- विद्रोही साहित्य संमेलनात प्रख्यात सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांची मुलाखत ठरली लक्षवेधी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 2 March 2026

पुस्तक वाचन हाच नटासाठी फार मोठा रियाज- विद्रोही साहित्य संमेलनात प्रख्यात सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांची मुलाखत ठरली लक्षवेधी

 पुस्तक वाचन हाच नटासाठी फार मोठा रियाज- 

विद्रोही साहित्य संमेलनात प्रख्यात सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांची मुलाखत ठरली लक्षवेधी


नांदेड : २०व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनातील विशेष आकर्षण ठरलेली प्रख्यात सिने अभिनेते व कवी मिलिंद शिंदे यांची मुलाखत उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. माध्यम अभ्यासक व संमेलनाचे मुख्य निमंत्रक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी ही मुलाखत घेतली. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, संघर्ष, साहित्यप्रेम आणि दिग्दर्शनाचा अनुभव या संवादातून उलगडला.


अभिनयाविषयी बोलताना मिलिंद शिंदे म्हणाले, ‘आपण केलेली भूमिका नंतर जगात कुणालाही करता आली नाही पाहिजे.’ कलाकाराने व्यक्तिरेखेला स्वतःची स्वतंत्र छाप दिली पाहिजे, तीच त्याची खरी ओळख ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले. अभिनय ही सातत्याने करावयाची साधना असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले, ‘पुस्तक वाचन हाच नटासाठी फार मोठा रियाज आहे.’ वाचनामुळे संवेदनशीलता वाढते, भाषेची ताकद प्राप्त होते आणि व्यक्तिरेखेचा अंतर्भाव अधिक प्रभावीपणे साकारता येतो, असे ते म्हणाले.


जीवनप्रवासातील टप्प्यांवर भेटलेल्या व्यक्तींचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, ‘वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी चांगली माणसं भेटली पाहिजेत. ही माणसं भेटली तरच आपल्या आयुष्याला खरा आकार मिळतो.’ गुरू, सहकलाकार आणि सामान्य माणसांकडून शिकत राहणे हीच कलाकाराची खरी संपत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले.


मराठी सिनेमा बदलत असल्याच्या संदर्भाने बोलतांना ते म्हणाले , ‘डुक्कर पकडणारा मुलगा सिनेमाचा हिरो होईल असं कुणी म्हटलं असत तर लोक हसले असते.’ पूर्वी नायकाविषयी विशिष्ट धारणा गृहीत धरल्या जात होत्या, मात्र आज मराठी सिनेमा आशयप्रधान आणि वास्तववादी बनला असून तळागाळातील प्रतिभेलाही संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


अभिनयासोबत दिग्दर्शनाचा अनुभव मांडताना त्यांनी स्पष्ट केले, ‘मराठीमध्ये दिग्दर्शक होणं म्हणजे जवळपास शिपायाचं काम.’ मर्यादित आर्थिक बळ, अपुरी साधनसामग्री आणि बहुपदरी जबाबदाऱ्या यामुळे दिग्दर्शकाला प्रत्येक स्तरावर काम करावे लागते, असे ते म्हणाले. मात्र याच प्रक्रियेतून चित्रनिर्मितीचे खरे भान येते. डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या नेमक्या प्रश्नांमुळे मुलाखतीला रंगत आली. संघर्षातून उभा राहिलेला कलाकार, साहित्याशी असलेले नाते आणि बदलत्या मराठी सिनेमाचा प्रवास या सर्व अंगांनी उलगडलेला संवाद उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य बाबाराव नरवाडे यांनी केले. सदाशिव गच्चे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर रमेश कोकरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. वासुदेव मुलाटे, राहुल प्रधान, प्रा. प्रतिमा परदेशी, डॉ. सुरेश खुरसाळे आणि शिवाजीराव गावंडे मंचावर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages