मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे
नूतनीकृत कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन व वॉर रूमची पाहणी
नांदेड, दि. 26 जानेवारी :- नांदेड जिल्ह्यातील सर्व सरपंच व ग्रामस्थांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. हे अभियान गावांच्या सर्वांगीण विकासासाठीची ऐतिहासिक संधी असून लोकसहभागातूनच ते यशस्वी होईल, असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या नूतनीकृत कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन राज्याचे इतर बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी नांदेड जिल्हा परिषदेकडून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असून सर्व विभागांनी समन्वयाने प्रभावी कामगिरी केली आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार व लोकसहभाग या घटकांवर विशेष भर देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला थेट पाच कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून, पंचायतराजच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या रकमेचे बक्षीस देण्यात येत आहे. प्रशासक म्हणून उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
शाळा स्तरावर सीसीटीव्ही बसविणे, मुलींसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा उपलब्ध करणे, तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या नूतनीकरण व बांधकामासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्री अतुल सावे यांनी दिल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या वॉर रूमला भेट देऊन विविध विभागांच्या योजनांची माहिती असलेले बॅनर, आराखडे तसेच गावकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी उभारलेली प्रणाली पाहून समाधान व्यक्त केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी या अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली असून एका दिवसात हजारो जलतारा खड्डे तयार करण्यात आले आहेत. यासोबतच डिजिटल व स्मार्ट अंगणवाड्या, ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्ही बसविणे, कर वसुलीसाठी क्यूआर कोडचा वापर, आरोग्य शिबिरे, शाळा व अंगणवाड्यांची दुरुस्ती असे उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉन्फरन्स हॉलचे नियोजनबद्ध नूतनीकरण केल्याबद्दल कार्यकारी अभियंता संजय शिंदे, उपअभियंता बालाजी पवार, शासकीय कंत्राटदार विकी शिकारे व अधिराज चिंचवडकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांनी केले.
या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, मयूर आंदेलवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष देशमुख, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment