कंधार तालुक्यातील ४ बंजारा भटक्या महिलांना प्रजासत्ताक दिन परेडसाठी दिल्लीला जाण्याचा मान..
नांदेड :
देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी राजधानी नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या राष्ट्रीय सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील तांड्यावरील चार भटक्या महिलांना सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. ही बाब संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NBCFDC) आणि SDD प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील धान फाउंडेशनच्या सहकार्याने या महिलांची निवड करण्यात आली आहे. या महिलांना राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक लालकिल्ल्यावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
कंधार तालुक्यातील निर्मला भगवान जाधव (भोजतांडा, बिजेवाडी), अनुसयाबाई उत्तम चव्हाण (महादेव तांडा, फुलवळ), राधा भुजंग जाधव (केवळतांडा, फुलवळ) आणि बायनाबाई बालाजी राठोड (भोजतांडा, बिजेवाडी) यांना ही संधी प्राप्त झाली आहे.
आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होणे ही केवळ सन्मानाची बाब नसून, भटक्या-विमुक्त समाजाच्या अस्तित्वाची, संघर्षाची व प्रगतीची राष्ट्रीय पातळीवरील ओळख आहे. या घटनेमुळे कंधार तालुक्याचे नाव देशपातळीवर अभिमानाने उजळून निघाले आहे.

No comments:
Post a Comment