कुलगुरूंनी घेतलेली केंद्राच्या कार्याची दखल प्रेरणादायी – डॉ. मार्तंड कुलकर्णी
‘जननायक महोत्सवा’त विद्यार्थ्यांचा गौरव; दिल्लीतील संचलनाचे थेट प्रक्षेपण
किनवट :
“७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वार्षिक आढावा मांडताना मा. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी किनवट येथील उपकेंद्राच्या प्रगतीची जी विशेष दखल घेतली, ती आम्हा सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन केंद्राचे समन्वयक डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी केले. ते किनवट येथील कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रात आयोजित ‘जननायक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव’ अंतर्गत प्रमाणपत्र वितरण समारंभात बोलत होते.
दिल्लीतील संचलनाचे थेट प्रक्षेपण
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सह-समन्वयक डॉ. सुनील व्यवहारे यांनी दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे दूरदर्शनवरील थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रीनवर विद्यार्थ्यांना दाखवले. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना भारतीय शौर्य, शिस्त आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रत्यक्ष दर्शन घडले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी, लेखक तथा चित्रपटकार डॉ. विनायक पवार उपस्थित होते. कुलगुरूंनी आपल्या भाषणात केंद्राचा कायापालट करण्यासाठी डॉ. नितीन गायकवाड व विठ्ठल हंबर्डे यांनी केलेल्या परिश्रमांचा जाहीर गौरव केल्याबद्दल डॉ. कुलकर्णी यांनी विद्यापीठ प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी त्यांनी मा. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. बाविस्कर तसेच इंजि. अरुण धाकडे यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन गायकवाड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. योगेश आंबुलगेकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपकेंद्रातील प्राध्यापक डॉ. प्रवीण खंडागळे, डॉ. प्रमोद राठोड, प्रा. प्रिती देवस्थळे, प्रा. श्रीकांत दुधारे, प्रा. चेतन जाधव, प्रा. श्रीराम पवार तसेच कर्मचारी विठ्ठल हंबर्डे, रमेश जाकुलवार, वर्षाताई, रामभाऊ टेकाम, सुरक्षा रक्षक राजू जाधव, मुरली, सुनील टेकाम आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:
Post a Comment