"कविता संविधानाच्या" काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन
नांदेड ( प्रतिनिधी ) :
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त राज्यभरातून आलेल्या ७५ कवींच्या संविधान विषयक व संविधान मूल्ये जोपासण्याचा संदर्भ असलेल्या "कविता संविधानाच्या " या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन नांदेड येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक नेते बाबुराव माडगे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोनबा दवणे, प्रकाशक उत्तम कानिंदे उपस्थित होते.
राज्य पुरस्कार प्राप्त व बालभारतीचे सदस्य असलेले रमेश मुनेश्वर आणि मिलिंद जाधव यांनी संपादित केलेल्या या काव्य संग्रहासाठी राज्यभरातून आलेल्या निवडक ७५ कविंच्या कविता यामध्ये आहेत. या संग्रहात बालभारती किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, संविधान अभ्यासक प्रा.डॉ.अनंत राऊत, बार्टीचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड, जेष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, यांसह जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षणाधिकारी (मा ) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (प्रा ) वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (यो ) दिलीपकुमार बनसोडे, मनपाचे निवृत शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे राज्याध्यक्ष नटराज मोरे, यांच्या शुभेच्छा संदेशाचा समावेश आहे.
नांदेडच्या शिक्षणाधिकारी (यो) कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे कौतुक केले. हा कविता संग्रह संविधानाचा गौरव करणारा असून संदर्भ ग्रंथ म्हणून देखील या संग्रहाचा अभ्यासकांना लाभ होईल असे ते म्हणाले. हा प्रातिनिधिक कवितासंग्रह साहित्यक्षेत्रात नक्कीच एक वेगळी जागा निर्माण करणारा ठरेल असेही गौरवोदगार त्यांनी काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश मुनेश्वर यांनी केले. सुत्रसंचालन शेषराव पाटील यांनी तर आभार मिलिंद जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.गजानन सोनोने, साहेबराव डोंगरे, रुपेश मुनेश्वर, सावित्री बड्डेवाड, सुरेशकुमार शेरे, विजय वाठोरे, प्रा. धनंजय सोनकांबळे, शिल्पाराणी बेंद्रे, बाळू पाटील, भुमय्या इंदुरवार , रामरास वाघमारे , यांच्यासह अनेकांची उपस्थित होती. कार्यक्रमांची सांगता संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आली.


No comments:
Post a Comment