विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व बोधचिन्हाचे लोकार्पण
नांदेड :
नांदेड येथे दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी होणाऱ्या विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीने वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रविवार, दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुगोविंद सिंग स्टेडियम, गाळा क्रमांक 12 येथे संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ समीक्षक व अनुवादक डॉ. भगवंत क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण नांदेडचे सुप्रसिद्ध चित्रकार श्रीरंग केरबाजी खानजोडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे बोधचिन्ह कलाकार संतोष घोंगडे यांनी साकारले आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. भगवंत क्षीरसागर म्हणाले की, आज समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असताना विद्रोही भूमिका घेणे ही साहित्यिक व कलावंतांची नैतिक जबाबदारी आहे. जाती-पाती, वर्गभेद व लिंगभेद यांच्या बुरसटलेल्या चौकटी भेदून तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवणारी विद्रोही साहित्यपरंपरा समाजाला योग्य दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चित्रकार श्रीरंग खानजोडे यांनी बोधचिन्हाबाबत बोलताना ते विद्रोही विचारांचा वारसा आणि संघर्षशील वाटचालीचे प्रतीक असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमास विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी, राज्य संघटक किशोर ढमाले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहुल प्रधान, मुख्य निमंत्रक डॉ. राजेंद्र गोणारकर, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. अनंत राऊत, मुख्य संयोजक शिवाजीराव गावंडे व डॉ. विजयकुमार माहुरे, यशवंत मकरंद, डॉ. बालाजी पोतुलवार, डॉ. विठ्ठल भंडारे,इंजि. विवेक मवाडे, डॉ. संतोष हंकारे, हेमंत कारले,डॉ. जे. टी. जाधव, दिगंबर घायाळे, पवन जगडमवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन पडॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. भीमराव हटकर यांनी केले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, लेखक, साहित्यिक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपर्क कार्यालय सुरू झाल्यामुळे संमेलनाच्या नियोजन व कार्यवाहीला अधिक गती मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.



No comments:
Post a Comment