किनवट,दि.१ : तालुक्यात संपूर्ण जून महिन्यात गतवर्षीपेक्षा यंदा सरासरी ६६.२८ मि.मी. अधिक पाऊस बरसलेला आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात १ ते ३० जूनपर्यंत तालुक्यात सरासरी केवळ ६९.८६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र, यंदाच्या संपूर्ण जून महिन्यात तालुक्यात सरासरी १३६.१४ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. ती गतवर्षीपेक्षा सरासरी ६६.२८ मि.मी.ने अधिक आहे.
गतवर्षी जून मधील ३० दिवसांपैकी १४ दिवस पाऊस निरंक होता. १० दिवस अत्यल्प असा एक अंकी पाऊस पडला, तर फक्त ६ दिवस सात पैकी कधी २ वा ३ तर कधी ४ मंडळात दोन अंकी पाऊस पडला. त्यामुळेच गतवर्षी जूनमध्ये पेरण्या होऊ शकल्या नाहीत. गतवर्षीच्या पेरण्या जुलैच्या दुसर्या आठवड्यापर्यंत चालल्या. यंदाच्या जून महिन्यातसुद्धा तब्बल १३ दिवस तालुक्यात पाऊस पडला नाही. पाच दिवस तालुक्यातील काही मंडळात एक अंकी पाऊस पडला, तर ११ दिवस तालुक्यातील काही मंडळात दोन तर कुठे एक अंकी पाऊस कोसळला. १४ जूनला इस्लापूर मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे यंदाच्या जूनअखेर सव्वाशे मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्याने, शेतकर्यांच्या खरीपाच्या पेरण्या जवळपास आटोपत आल्या आहेत. कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, मका,भात, हळद आदी पिकांची उगवण चांगली झाली असली तरी, सोयाबिन बियाणे अनेक ठिकाणी न उगवल्याच्या तक्रारी आहेत. तालुक्यात १६ हजार ६४१ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झालेली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी दुबार पेरणी करावी लागणार यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
तालुक्यात मंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून, कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेला पाऊस मि.मी.मध्ये दिला आहे. किनवट- ५ मि.मी.(९७); इस्लापूर-२मि.मी.(१५७);मांडवी - ०० मि.मी. (१२८) ; बोधडी- ३१ मि.मी.(८८); दहेली-०० मि.मी.(२३३);जलधरा- ००मि.मी.(७३);शिवणी-२ (१५६).

No comments:
Post a Comment