एके सकाळी टोकीयोच्या विमानतळावरुन एका विमानाने ऊड्डाण केलं. या विमानाने जेंव्हा आकाशात झेप घेतली तेंव्हा त्या विमानातले प्रवासी एकदम गोंधळून गेले. कारण हे विमान जेंव्हा सुरु झालं तेंव्हा ते धावपट्टीवर सैरावैरा धावू लागलं. नंतर त्याने एका झटक्यासरशी वर झेप घेतली. आणि त्या विमानाच्या काँकपिटमधून म्हणजे जिथे पायलट बसतात त्या कक्षातून जोरजोरात हसण्याचा आवाज ऐकू आला. तो पायलट इतका जोरजोरात हसत होता की विचारता सोय नव्हती. म्हणून मग एक प्रवासी पायलट कक्षात डोकावला व त्याने त्या पायलटला विचारले की, 'एवढ्या जोरजोरात का हसता आहात ? मामला काय आहे ....?' त्यावर त्या पायलटच्या खुर्चीवर बसलेला तो माणूस आपले हसू आवरीत म्हणाला की,
'फार मोठा विनोद झाला आहे. त्या लोकांनी मला पागलखान्यात बंद केलं होतं. मी तेथून पळालो. आणि मला याचे हसू येते आहे की, त्या पागलखान्याचे अधिकारी आता मोठ्या पेचात पडले असतील. त्यांना समजणारच नाही की मी कुठे आहे ते. ते मला जमीनीवर शोधत असतील आणि मी तर आकाशात आहे. त्या बिचा-या अधिका-यांचा मोठा मजाक झाला आहे.'
आता कल्पना करा की, त्या विमानातल्या प्रवाशांवर काय प्रसंग ओढवला आहे. या विमानाचा जो पायलट आहे, तो पागलखान्यातून पळालेला एक पागल आहे. हा पागल विमान घेऊन आकाशात आहे. आणि हा पागल म्हणतो आहे की, त्या पागलखान्याच्या अधिका-यांबरोबर मोठा मजाक झाला आहे. या पागलखान्याच्या अधिका-यांचं सोडून द्या. पण या विमानातल्या प्रवाशांच्या बाबतीत मात्र खरोखर फार मोठा गहिरा मजाक झाला आहे, हे तुम्हीसुध्दा मान्य कराल. ही गोष्ट टोकीयोमधली आहे. त्याचा आपल्याशी काही संबंध नाही, असे जर तुम्ही समजत असाल तर तुम्ही फार मोठ्या भ्रमात आहात असे मी म्हणेन. कारण ही गोष्ट जितकी टोकीयोची आहे तितकीच ती तुमची माझी सुध्दा आहे. कसे ते सांगतो. हा जो टोकीयो आहे तो आपला देश समजा. ते विमान म्हणजे रिपब्लिकन पार्टी समजा. या विमानातले प्रवासी म्हणजे आपण सर्व आणि या विमानातल्या काँकपिटमध्ये बसलेला पायलट म्हणजे आपले नेते आहेत. मग मला सांगा, त्या टोकीयोच्या विमानात बसलेल्या प्रवाश्यांच्या आणि आपल्या परिस्थितीमध्ये काय फरक आहे...?
पुर्वी अँड. संघराज रुपवते आपल्या भाषणात नेहमी एक किस्सा सांगायचे. ते म्हणायचे की, समुद्राच्या मध्यभागी एक बोट आहे आणि त्या बोटीमध्ये आपले सगळे नेते आहेत. अचानक समुद्रात तुफान येते आणि बोट बुडू लागते. अशा प्रसंगी या बोटीतला कोणता नेता वाचेल? कोणी म्हणेल अमूक नेता हुषार आहे, तो वाचेल. कोणी म्हणेल तमूक नेता चपळ आहे, तो वाचेल. पण शेवटी संघराज रुपवते सांगयचे की, बोट जर बुडाली तर कोणीही वाचणार नाही.हे सर्व नेते बोटीसकट बुडाले तर आंबेडकरी चळवळ वाचेल. आज संघराजजी आपल्या भाषणात हा किस्सा सांगतात की नाही, हे माहित नाही. बहुदा ते हा किस्सा सांगत नसावेत. कारण आज ते सुध्दा याच बोटीत बसले आहेत. हे सगळं सांगण्यामागचं कारण हे की रिपब्लिकन चळवळीचा मागील इतिहास जर पाहिला तर नेत्यांचं ऐक्य फार काळ टिकत नाही, हे दिसून आलं आहे. भूतकाळात अनेक ऐक्याचे प्रयोग झाले. शपथा घेतल्या गेल्या. राणा भिमदेवी थाटात गर्जना केल्या गेल्या.
'फुटेल तो मिटेल.' 'जो फुटेल त्याला ऊद्याचा सूर्य दिसणार नाही', अशा वल्गनाही करण्यात आल्या. पण तरीही ऐक्य फुटलं हा इतिहास आहे. जेंव्हा चेबूरच्या नऊ तरुणांनी ऐक्यासाठी आमरण ऊपोषण केलं त्यावेळी आंबेडकरी जनतेच्या दबावाखाली सर्व नेते एक झाले. शिवाजी पार्कवर या ऐक्याची न भूतो न भविष्यती, अशी सभा झाली. या सभेला एवढी प्रचंड गर्दी होती की, शिवाजी पार्कचे कठडे फोडून अगदी दादर स्टेशनपर्यंत माणसे ऊभी होती. त्या सभेतही नेत्यांची आवेशपूर्ण भाषणे झाली. आणाभाका केल्या गेल्या. पण नंतर पुन्हा
'ये रे माझ्या मागल्या, टाक कण्या चांगल्या' या ऊक्तीप्रमाणे पुन्हा हे ऐक्य फुटलं.
मिटलं मात्र कोणीच नाही. पुन्हा नेत्यांनी पूर्वीसारखीच आपआपली दुकाने थाटली. त्यावेळी संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या वतीने मी बाबासाहेबांना एक पत्ररुपी कविता लिहली होती. ती कविता ऐकवतो.
तिर्थरुप बाबा, तुझ्या नातवाचा तुला सप्रेम जयभिम विनंती विशेष.पत्रास कारण की......,
त्या दिवशी तुझ्या प्रकाशात निळ्या आकाशात एक अपूर्व घटना घडली.
ताकदीनिशी निळी पताका बिनधास्त फडफडली.
अरबी समुद्रासमोर जनसमुद्र ओसंडून वाहत होता.
त्यावेळी घोड्यावरचा शिवबासुध्दा कौतुकाने पाहत होता.
ऊपास तपास करुन बाबा नेते सारे एक झाले.
केवळ तुझ्या पुण्याईने बदनामही नेक झाले.
फुटेल तो मिटेल म्हणून शपथविधी झाला.
पुन्हा त्यांनी फुटिरतेचा विक्रमही केला.
पण बाबा, काळजी काही करु नको.मनी अढी धरु नको.
शासनकर्ती जमात व्हावी म्हणून अट्टाहास केला आाहे.
हाँस्टेलवरचा रामदास नाईलाजाने नामदार झाला आहे.राखीव जागा भरणार आहेत,बौध्दांनाही देणार आहेत,
प्रकाश मंत्री होणार आहे,
अरुणचाही नंबर लागणार आहे.अशी भरपूर चंगळ मंगळ,सगळं मंगल घडणार आहे, मग चंदर कांबळेच्या मरणाने बाबा फरक काय पडणार आहे...?
चंदर साला येडा , मरुन मरुन मेला केंव्हा,भारतरत्न दिलं तेंव्हा.......,
आता याचा विचार करणार केंव्हा...?
एक मात्र बाबा आता नक्की ठरलय.तुझं नाव घ्यायचं, मिळेल ते खायचं,कुठेही घुसायचं, आता मागे नाय राह्यचं.जमलच तर विद्यापिठा नाव तुझं द्यायचं,पण नावासाठी आता नाही आंदोलन करायचं.क्रांतीचं काय काम आहे.....?
चळवळीला विराम आहे.आता बाबा मस्तपैकी पाच वर्षे आराम आहे.पाच वर्षे सरल्यावर, दिवस यांचे भरल्यावर, पुन्हा एकदा .........तुझ्या प्रकाशात, निळ्या आकाशात एक अपूर्व घटना घडेल.ताकदीनिशी निळीपताका बिनधास्त फडफडेलत्यावेळीसुध्दा जनसमुद्र ओसंडून वाहणार आहेमी पाच वर्षाने बाबा तुला पुन्हा पत्र लिहणार आहे.तिर्थरुप बाबा! तिर्थरुप बाबा!!तिर्थरुप बाबा!!!
ही कविता सांगण्यामागचा ऊद्देश हा की, आपण पुन्ह,पुन्हा,तोच,तोच प्रयोग करणं कितपत योग्य आहे...?* मला मान्य आहे की, माणूस चुकतो. किंबहूना चुकतो त्यालाच माणूस म्हणतात. पण माणूस जर शहाणा असेल तर त्याने पुढच्या वेळी तीच ती मागची चुक न करता नवी चुक केली पाहिजे. त्याच त्या चुका आयुष्यभर करणा-याला बुध्द 'मुढ' म्हणतात. आणि हा मुढपणा आपण सातत्याने करीत आलो आहोत. प्रश्न असा आहे की, रिपब्लिकन ऐक्य जर करायचे असेल तर ते नेत्यांचं करायचं की रिपब्लिकन विचारावर ऐक्य करायचं. नेत्यांचं ऐक्य तर आपण कैक वेळा करुन पाहिलं. पण ते कुचकामी ठरलं. मला वाटतं आता आपण रिपब्लिकन विचारावर ऐक्य करणं गरजेचं आहे. मग रिपब्लिकन विचार म्हणजे काय...? या प्रश्नाचं ऊत्तर शोधायचे झाल्यास आपल्याला बाबासाहेबांच्या खुल्या पत्राकडे जाणे भाग आहे. हे शासनकर्ती बनण्याचं आपलं जे फँड आहे, तो खुप नंतरचा विषय आहे. बाबासाहेबांनी या खुल्या पत्रात 'प्रमुख विरोधी पक्ष' बनण्याचा स्पष्ट मानस व्यक्त केला आहे. पण प्रमुख विरोधी पक्ष बनण्याच्या आधीच आपण शासनकर्ती जमात बनण्याचं आपलं जे शेखचिल्ली स्वप्नं आहे, ते म्हणजे मँट्रिक नापास असतानाही ग्रँज्युएट बनण्यासारखा प्रकार आहे. बाबासाहेबांनी या खुल्या पत्रात पक्ष कसा असावा हे सांगताना असे म्हटले आहे की,
"पक्ष हा सैन्यासारखा असावा. पुढारी हा सरसेनापती सारखा असावा. पक्षाचे ध्येय, धोरण व तत्वद्न्यान असले पाहिजे. पक्षासमोर एक विशिष्ट कार्यक्रम असला पाहिजे.विशिष्ट ध्येयवादाने प्रेरीत होऊन मतदारांनी केलेली संघटना म्हणजे पक्ष होय.
आता बाबासाहेबांनी सांगीतलेल्या या कसोटीवर सध्याचे रिपब्लिकन पक्षाचे किती व कोणते गट बसतात, याचा आपण विचार करावा. बाबासाहेबांनी भारतीय जनतेला लिहलेल्या खुल्या पत्रात रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाची सात ध्येय, ऊद्दिष्टे सांगीतली आहेत. ही ध्येय धोरणे काय आहेत, हे जाणण्यासाठी प्रत्येकाने बाबासाहेबांचं हे खुलं पत्र विस्ताराने वाचलं पाहिजे. या ध्येय धोरणाबाबत इतकच सांगतो की, ती इतकी सुस्पष्ट, व्यापक व समस्त भारतीयांना न्याय देणारी आहेत. संपूर्ण भारतीय जनतेला कवेत घेण्याची ताकद या पक्षाच्या ध्येय धोरणात आहे.
अशा या रिपब्लिकन पक्षाचे नेत्यांनीच नव्हे तर आपण सर्वांनीच अक्षरश: मातेरं करुन टाकलं आहे.जो पक्ष आज संपूर्ण देशामध्ये प्रमुख पक्ष असायला हवा होता तो आज कुठे आहे हे दुर्बिण लावून शोधावा लागतो आहे. ज्याने सिंहगर्जना करायला हवी होती तो आज अक्षरश: मँव, मँव करु लागला आहे. हे सगळं पाहून वाटतं की, बाबासाहेबांचं हे हवाई जहाज बहूदा अडाण्यांच्या हातात पडलं असावं. हवाई जहाजावरुन मला दुस-या महायुध्दानंतरची गोष्ट आठवली. हे महायुध्द संपल्यानंतर
बर्माच्या जंगलामध्ये एक टू सिटरचं छोटं विमान पडलं होतं. त्याची कुणालाच आठवण न राहिल्याने ते विमान तिथच पडून राहिलं. जंगलात राहणा-या आदिवासींनी ते पाहिलं. पण हा काय प्रकार आहे तो त्यांना कळेना. त्या विमानाची चाकं पाहून त्यांना ती आधुनीक प्रकारची बैलगाडी वाटली. मग त्यांनी त्या विमानाला बैल जुंपले व त्याच्या सहाय्याने ते आपली छोटी,मोठी कामे करु लागले. असे कित्येक महिने ते विमान बैलगाडीचच काम करत होतं. एके दिवशी या जंगलातलाच एक शहरात राहणारा आदिवासी सुट्टी काढून या जंगलात आला. त्याने हे बैलगाडीचं काम करणारं विमान पाहिलं. पण त्यानेसुध्दा कधी विमान पाहिलं नव्हतं. त्याने फक्त बस व ट्रक पाहिले होते.तो त्या आदिवासींना म्हणाला, 'अरे ही बैलगाडी नाही. ही तर छोटी बस आहे.' मग त्याने ते विमान चालविण्याचा प्रयत्न केला. तर ते विमान जमिनीवर पळू लागले. बैलांशिवाय चालणारी गाडी पाहून आदिवासी चकित झाले. नंतर हा आदिवासी सुट्टी संपल्यावर परत शहरात आला. त्याने ही गोष्ट आपल्या अधिका-याला सांगीतली. ते ऐकताच अधिकारी म्हणाला, पागल, तू ज्याचे वर्णन करतो आहेस ती बस नसून विमान आहे. मग त्या अधिका-याने एका प्रशिक्षित पायलटला तेथे पाठविले. पायलट त्या विमानात बसला आणि विमान आकाशात ऊडविले. आकाशात ऊडणारे विमान पाहिल्यावर त्या आदिवासींच्या आश्चर्याला पारावार ऊरला नाही. बाबासाहेबांनी आपल्याला जो पक्ष दिला आहे तो सरपटण्यासाठी नसून आकाशात झेप घेण्यासाठी दिला आहे. कारण हा पक्ष बैलगाडी नसून जंबोजेट आहे. आज ते सरपटतं आहे कारण त्याला अद्यापपावेतो प्रशिक्षित पायलटच मिळालेला नाही. पण असा पायलट मिळणारच नाही असे मुळीच नाही. किबहूना असा पायलट मिळण्याची शक्यता आता अगदी जवळ येत चालली आहे. बाबासाहेब आपल्या रिपब्लिकन पक्षाविषयी बोलताना म्हणतात की, 'मी माझ्या पक्षाचे झाड खडकावर लावले आहे. ज्यांना फळाची घाई झाली आहे त्यांनी सत्ताधारी पक्षात जावे. माझ्या झाडाला ऊशीरा फळे येतील. पण ती सकस स्वाभिमानाची असतील. लाचारीची नव्हे. म्हणून कार्यकर्त्यांनी धीर न सोडता सबूरीने कार्य करीत राहिले पाहिजे. हळहळू आपले कार्य वाढवून आपला पक्ष प्रबळ केला पाहिजे. बाबासाहेबांनी हे नेत्यांना नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सांगीतले आहे, हे आपण विशेषत्वाने लक्षात घेतलं पाहिजे. आपण जर स्वत:ला आंबेडकरी कार्यकर्ते समजत असाल तर आपण चळवळीच्या बाबतीत अत्यंत सजग राहिलं पाहिजे. आपण पुण्यामुंबईला राहतो म्हणजे आपण सजगच आहोत असे आपण मानूनच चाललो आहोत. पण आपल्याला पुण्यामुंबईबाहेर काय चाललं आहे हे खरच माहित नसतं. कारण पुणे,मुंबई म्हणजेच आपलं जग असतं.
विलास घोगरे म्हणायचे की,...... आम्ही पुण्या मुंबयची लोकं,पोकळ आमचा हा झोकं,जयभीम, जयभीम म्हणतो,गांडूचं जीवन जगतो. अशी आपण पुण्यामुंबईची चंगळवादी लोकं आहोत. कारण आपल्याला हे माहित नाही की, बाबासाहेबांच्या या खडकावरच्या झाडाला फळं लागायला सुरुवात झाली आहे आणि ती सुध्दा नागपूरमधून. बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारलेला तंतोतंत रिपब्लिकन पक्ष निर्माण झाला आहे. त्याचं लोण हळूहळू पुण्यामुंबईपर्यंतही पोहोचणार आहे, एवढं मात्र निश्चित. आपण जर खरोखर जागे असाल तर ते आपल्यालाही माहीत असेलच. वंतबाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष चालविणारा नव्या दमाचा नवा तांडा आता दमदारपणे मैदानात ऊतरला आहे. त्याने बामसेफला धुडकाऊन लावलं आहे. बीएसपीला नाकारलं आहे. फक्त बाबासाहेबांची वैचारिक शिदोरी घेऊन ही आपली माणसे मुलुख मैदान गाजवायला निघाली आहेत.
मुलुखगीरी करायला निघालेल्या या आपल्या माणसांच्या लढावू तांड्याकडे पाहून आता मला माझीच कविता आठवते आहे. ती अशी की........,
नागवंशाचे नाग होऊन, विद्रोहाची आग होऊन आणि पँथरचा वाघ होऊन.....बाबा, आता येतीलच आपली माणसे. धर्मवाद्यांचा गळफास होऊन, समतेचा ध्यास घेऊन आणि बुध्दाचा श्वास होऊन बाबा,आता येतालच आपली माणसे.
- विवेक मोरे
No comments:
Post a Comment