आंबेडकरी प्रेरणेचा गायक - गीतकार : हिरामण आठवले (गुरुजी) - सदाशिव गच्चे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 19 August 2020

आंबेडकरी प्रेरणेचा गायक - गीतकार : हिरामण आठवले (गुरुजी) - सदाशिव गच्चे


           डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेवून महाराष्ट्रात अनेक कवी-गायक,संगीतकार निर्माण झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारीक प्रबोधनचा आदर्श घेवून नांदेड जिल्हा व जिल्ह्या बाहेरील ग्रामीण भागात स्वतः बुद्ध-भीम गीते लिहून व प्रभावीपणे गात आपली जिप शिक्षकाची नौकरी सांभळत आपल्या संचाव्दारे  समाज प्रबोधन करणारा हरहुन्नरी परिवर्तनवादी कलावंत म्हणजे
हिरामण आठवले (गुरुजी)


                नांदेडपासून बावीस कि.मी.अंतरावर असलेलं बारड ता.मुदखेड हे  ऐताहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिकदृष्टया संपन्न असे गाव आहे. या गावात जवळपास आठवले आडनाव असणारी बौद्ध समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिकदृष्टया समृध्द अशी मोठी वस्ती आहे. या वस्तीला या ग्रामस्थांनी ज्ञानदीपनगर असे नामकरणही केलेले आहे. बारड  गावात बुध्द, शिव,फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे धार्मिक वातावरण असून सर्व गावकऱ्यांनी मिळून संबोधी बुद्ध विहार बांधलं आहे.
      याच गावी आई रावणाबाई वडील शेकोजी आठवले यांच्याकडे वडिलोपार्जित शेती होती.अश्या शेतकरी कुटुंबात हिरामण आठवले यांचा जन्म झाला. शेकोजी आठवले यांना वामनदादा कर्डक यांच्या गीत रचना ऐकण्याचा व म्हणण्याचा खूप छंद होता.गावात वैष्णवी भजनी मंडळ होते. त्या भजनी मंडळाची भजनं लहानपणा पासूनच मुलगा हिरामण यांच्या कानावर पडत गेली. वडिलांकडून गीत गायनाचा मिळालेला वारसा  व भजनी मंडळाकडून संगीत विषयक झालेल्या संस्कारामुळे हिरामण आठवले यांच्यातला कलावंत घडत गेला. पत्नी केवळाबाई, अनिल-सुनील ही दोन मुले, मुलगी भारती यांनी वेळो-वेळी आठवलेंच्या गीत गायनाला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. त्यांचे ही मोलाचे सहकार्य लाभत गेले.
                    गावातील काही लोकांना घेवून हिरामण आठवले यांनी "भीमगर्जना" गायन पार्टीची निर्मिती केली.या गायन पार्टीत प्रभाकर आठवले (तबलजी), बाबुराव आठवले (हार्मोनियम), किशन शेवाळे (ढोलक), शुद्धोदन आठवले, विनोद आठवले, कैलास आठवले,चंद्रमणी आठवले आदी कलवंतांना हिरामण आठवले यांनी सोबत घेवून नांदेड जिल्ह्यातील लहान, तळणी, सायाळ, निवघा, भोसी, लोण, शेम्बोली, पाटनूर, खांबाळा, रोहिपिंपळगांव, उमरी, हदगाव, परभणी जिल्ह्यातील टेंभुर्णी अश्या अनेक खेडो-पाडी बुद्ध-भीम गीत गायनाचे कार्यक्रम करून समाज प्रबोधनाचे प्रभावीपणे कार्य केले आहे.
                    प्रज्ञासूर्य माझा उगवलाच नसता !
                    जीवनाचा मार्ग दिसलाच नसता !!
             जाणिले दुःख दीनाचे भीमाने !
             तोडीले पाश दीनाचे भीमाने
             भीमाहूनी भीमाई धन्य ती माता !!१!!
                      चंदना परि तो झिजूनी कष्टला !
                      तयामुळे अमुचा संसार नटला !
                      असा भीम माझा दयावंत होता !!२!!
               अंधारी चमकते काजवे लपले !
               भीमाच्या तेजाने जग लखलखले !
               जीवनी दिनाच्या दीपस्तंभ होता !!३!!
                        हिरामणा लाभला जयभीम गाजला !
                        कीर्तीचा त्याचा डंकाच वाजला !
                         वाटेवरी भीम हा कल्पवृक्ष होता !!४!!
               अश्या स्वरूपाची बुद्ध-भिमाची महिमा सांगणारी गीते हिरामण आठवले स्वतः रचून हार्मोनियमवर गायचे तेंव्हा लोक रात्रभर जागचे हालत नसत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुर्दाड असलेल्या समाजाला जागृत करून त्यांच्यात स्वाभिमान जागा केला.आणि त्यांना माणूस केले.
 स्वाभिमान विषयक सांगतांना आपल्या गीतात आठवले म्हणतात....
            भीमरायाने दिधला तुम्हाला मान !
            गहान कशाला ठेवता रे स्वाभिमान !
                  पत्नी आणि बाळासाठी दुःख कधी ना केले !
                  नऊ कोटी बाळासाठी ढसाढसा ते लढले !
                  माऊलीच्या ममतेची ठेवा जरा जान !!१!!
             दगडांच्या वर्षावाला कधी ना ते भ्याले !
             धमक्यांच्या पत्रांना नाही डगमगले !
             क्रांतीने ते पेटविले सारे रान !!२!!
                     संग लागून मेंढराच्या ब्या-ब्या तुमची बोली !
                    जात लढवयाची तुमची जाणीव तुम्हा दिली !
                    जगा मानाने हिरामणा द्या धम्माला दान !!3!!
              अशी समाज मनाचा ठाव घेणारी एका पेक्षा एक अनेक विषयावर भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गीतं हिरामण आठवले लिहुन गातचं राहिले. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळायचा. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम दलित, शोषित,पिडीत समाजाला सन्मानाने जगता यावे म्हणून 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूरच्या पवित्र दिक्षाभूमिवर बौद्ध धम्माची दिक्षा दिली.सोबतच बावीस प्रतिज्ञा ही दिल्या.बौद्ध म्हणून लोक धम्माचे पालन ही करत होते.परंतु बाबासाहेबांच्या पश्चात 1960 नंतर धम्मचळवळ म्हणावी तशी गतिमान होताना दिसत नाही.याचे शल्य हिरामण आठवले आपल्या गीतात सांगतात...

              बौद्ध झालो किंवा नाही सांगणे कशाला !
              विचारा मनाला हो विचारा मनाला !!
                   आधी अंतःकरण स्वच्छ धुवावे !
                   स्वच्छंदी मनाने जगाला पाहावे!
                   काय करील दैव इथे हीन कर्तव्याला !!१!!
              दिली संजीवनी जाण नाही त्याची !
              करणी काय करता धरा लाज ती मनाची !
              घोट अमृताचा घेतला कशाला !!२!!
                     लाख नाही कामाचे आम्हा एक मोलाचा!
                     कोहिनूर हिऱ्यासम पाहिजे तोलाचा !
                     पुरे भीम माझा हे पुढारी कशाला !!३!!
               घेतली शपथ आम्ही वदली प्रतिज्ञा !
               ब्रह्म,विष्णू,महेश मानणार नाही त्यांना !
               हिरामणा मग करता कंदोरी कशाला !!४!!
                       दुभंगलेला समाज एक झाला तरच आपले प्रश्न सुटतील व  बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज निर्माण होण्यास मदत होईल हा आशावाद सांगतांना हिरामण आठवले आपल्या पुढारी व आंबेडकरी कार्यकर्त्याला आपल्या गीतातून म्हणतात...
                       बेकीचे भूत जळू द्या, जळू द्या !
                       आतातरी समजाला सुख मिळू द्या !
                       संघटनेचे महत्व कळू द्या, कळू द्या !
                       आतातरी समाजाला सुख मिळू द्या!!
               भीमाने समाजाचे मंदिर केले !
               वैऱ्यांनो तुम्ही त्याचे वाटोळे केले !
               भीम रक्ताचे नाते कळू द्या, कळू द्या !
               आता तरी समाजाला सुख मिळू द्या !!१!!
                       आम्ही बंधू,तुम्ही बंधू भाषा तुम्ही बोलता! 
                       संधी साधू वैऱ्याशी नाते तुम्ही जोडता !
                       युतीचे महत्व कळू द्या, कळू द्या !
                       आतातरी समाजाला सुख मिळू द्या!!२!!
                 भीम समाज आहे माझी गुळाची ढेप !
                 लाल,पांढरे,मुंगळे चिकटती आपो-आप !
                 सावध व्हा नसता दात गळू द्या, गळू द्या !
                 आतातरी समाजाला सुख मिळू द्या !!३!!
                         हिरामण तुम्हाला सांगे कळकळीने !
                         नका ओतू तेल तुम्ही त्यात पळीने !
                         चमच्यांनो बेकी जळू द्या,जळू द्या !
                         आतातरी समाजाला सुख मिळू द्या!!४!!
             हिरामण आठवले हे सातवी पास त्या काळी सातवी बोर्ड असायचा ही बोर्डाची परीक्षा पास झाले की नोकरी लागायची. आठवलेंना जिल्हा परिषेदेत शिक्षकाची नोकरी लागली होती. पहिला पगार आला आणि गायन पार्टीसाठी नवीन साहित्य खरेदी केले.पुन्हा नव्या दमाने आजू-बाजूचा सारा परिसर आंबेडकरी गीतं गावून पिंजून काढला.
               छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा खूप मोठा समाज आहे. या दोन्ही महामानवांचे विचार माणसाला सतत प्रेरणा व ऊर्जा देणारे आहेत. पण काही लोक आपल्या स्वार्थासाठी समाजात दुफळी निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. अश्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे.असं आठवले आपल्या गीतातून सांगतात.....
       झुंजण्याची कला शिकवली शिवबाने भीमबाने!
   मग आज कोंबड्या गत का झुंजता टाकीता मूठभर दाणे !
              शिवरायाची झुंज होती स्वराज्याच्या साठी !
              भीमरायानी मुक्त केले गुलाम कोटी कोटी !
              धन्य एकाची माता होती पिता एकाचा धन्य !!१!!
      शिवरायाच्या तलवारीने फाटून गेले पडदे !
      भीमरायाच्या एका बोलाने उठून बसले मुडदे !
      शिवबा भीमबा तुम्हा विसरुनी गाती स्वार्थी गाणी !!२!!
               शिवराय हे परस्त्रीला मानून गेले माता !
               भीमरायाने घटनेद्वारे नटविली भारत माता !
               हिरामणा तू अशीच गावी इतिहासाची पाने !!३!!    आठवले यांनी समाज एकसंघ राहिला पाहिजे,आशा आशयाची अनेक गाणी लिहून स्वतः सादर केली आहेत.आज ही खेडो-पाडी हिरामण आठवले गुरुजी यांचं नाव लोक खूप आदराने घेतात.लोक त्यांना विसरले नाहीत.   
          आयुष्यातील अतिशय कठीण व तेवढाच रोमांचकारी प्रसंग आठवले सांगत होते,मराठवाडा विद्यापीठाला  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळाले पाहिजे या करिता 1978 साली नामांतर दंगल घडली होती.नांदेड पासून चार कि.मी.अंतरावर असलेल्या सुगांव येथील जनार्दन मवाडे व बिलोली तालुक्यातील टेभुर्णी येथील मातंग समाजाचे पोचिराम कांबळे यांना जातीयवाद्यांनी जीवंत ठार मारले.घरांना आगी लावण्यात आल्या.संसाराची राखरांगोळी झाली होती.लोक मिळेल तिथे आश्रय शोधत होते. हिरामण आठवले खेडो-पाडी बाबासाहेबांचे गाणे फार गातो. तो ही खूप माजलाय त्याचा ही काटा काढुयात म्हणून काही बिनडोक लोक जातीयद्वेषाने पेटून उठले व ते लोक माझ्या मागावर होते. मला ठार मारणार असल्याची बातमी समजताच मी गाव सोडलं आणि भूमिगत होवून नांदेडच्या प्रभात नगर येथे आलो,म्हणून वाचलो नसता माझं ही नाव नामांतर शहिदांच्या यादीत राहिलं असतं.अश्या खडतर काळात सुद्धा मी माझ्यातला कलावंत व स्वाभिमान कधी ही ढळू दिला नाही. नामांतराचा हा इतिहास सांगत असतांना आठवले खूप भावूक झाले होते.
          भीमरायाच्या सुपुत्रांनो का?बसता गुमान !
          का सहन करता अन्याय राखा भिमाची शान!
                सिंहाचे छावे तूम्ही मेंढरे का झाला?
                नरडी फोडणारे तुम्ही का?खाता पाला !
                आपली जात ओळखा मिळवा सन्मान !!१!!
           भीमाच्या पथाने जाण्यासाठी सज्ज व्हावे !
           बांधलेल्या घरट्या मध्ये परतून यावे !
           दाखवून द्या आम्ही भिमाची संतान !!२!!
                 लाचारीने जगण्यापेक्षा मरणे बरे !
                 का स्वीकारता लाचारीने हारतुरे !
                 विचार घ्या हिरामणाचे का होता बदनाम !!३!!
               सातवी शिकलेले हिरामण आठवले यांच्यातील असणारी प्रतिभा,स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सतत खेडो-पाडी बाबासाहेबांचा विचार पेरीत गेले.त्यांच्या  कार्याला आमच्या नव्या पिढीचा  जयभीम !
                       - सदाशिव गच्चे .

No comments:

Post a Comment

Pages