आंबेडकरवाद सांगणारा महाकवी : वामनदादा कर्डक. -सदाशिव गच्चे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 13 August 2020

आंबेडकरवाद सांगणारा महाकवी : वामनदादा कर्डक. -सदाशिव गच्चे


   
   महाराष्ट्रात असं एक ही गाव नाही,जिथं वामनदादा कर्डक यांच नाव नाही.आपल्या लेखणीने व गीत गायनाने आंबेडकरवाद सांगणारे महाकवी वामनदादा कर्डक यांनी आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी संबंध आयुष्य खर्ची घातले. महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर ही गीतगायनाच्या माध्यमातून अॅड.मा.मा.येवले उद्या दुसऱ्या कोणत्यातरी गावी त्यांचा झंझावात असायचा.ज्या शहरात,गावात जात  तेथील स्थानिक कलावंतांना सोबत घेवून आपल्या खास शैलीत बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम सादर करायचे.अगदी गाडगेबाबां सारखे.वामनदादांच्या गीत रचना ह्या लोकांना समजेल अश्या सरळ,साध्या,सोप्या बोली भाषेत असल्या कारणाने लोकांना खूपच आवडायच्या गीत गायनात रात्र केंव्हा निघून जायची काळायचेच नाही.
     
          मासळी बोले आपल्या पिलाला !
          खेळ बाळा तू खाली तळला !
          दुनिया पाहण्यास जर का येशील वरती !
          व्यर्थ लागून जाशील गळाला !!

          डोळे मिटून दर्या  किनारी !
          बगळोबाची ही बसली सवारी !
          भक्ष होशील त्याचे तू बाळा !
          दिप राहणार नाही कुळाला !!१!!

          हट्ट करू नकोस तू बाळा !
          जातो म्हणतोस मुंबई बघाया !
          तेथे पाणी ही नसे नळाला !
          खेळ बाळा तू खाली तळाला !!२!!
                                        - वामनदादा कर्डक
           केस माझे हे जेंव्हा गळू लागले !
           तेंव्हा जीवन मला हे कळू लागले !!

           आग होती मागे आणि आग होती पुढे !
           पंख पसरून गेलो त्या ज्योती पुढे !
           पंख माझे हे जेंव्हा जळू लागले !२!!

           काल वामन परि पेरण्या ही कला !
           लोक येत होते आणि नेत होते मला!
           आता जाणे ही तेथे टळू लागले !!२!!
                                          -वामनदादा कर्डक
       वामनदादा कर्डक आणि बाबादलितानंद हे दोघे खूप चांगले मित्र होते.एकदा काही कारणास्तव वामनदादांची पत्नी रुसुन माहेरी गेली होती,ती सासरी यावयास तयार नव्हती,ही गोष्ट वामनदादांनी बाबादलितानंद यांना सांगितली.तेंव्हा बाबादलितानंद वामनदादांच्या सासुरवाडीच्या लोकांना उद्देशून म्हणाले.....!                           
        "अरे या वेडीला समजावून सांगा" .      बाबादलितानदांचे हे शब्द ऐकुण वामनदादांनी  ह्या प्रसंगावर गीतच तयार केले.पुढे ते "सांगते ऐका"ह्या चित्रपटात घेण्यात आले.ते त्या काळी हे गीत खूपच लोकप्रिय झाले.(बाबादलितानंद यांनी कथन केलेल्या प्रसंगावरून)
        सांगा ह्या वेडीला माझ्या गुलछडीला !
        हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला !!
        तुला न्यावयाला ग घेवून गाडी !
        आलो सर्व सोडून मी शेतीवाडी !
        तू असतांना जोडीला,या भुरख्याच्या गाडीला !
        नाव रंग येईल गुलाबी साडीला !
        सांगा ह्या वेडीला ......!!१!!
        ही गाडी कुणाची,शेतीवाडी कुणाची !
        बढाई नका ठोकू मोठे पणाची !
        सांगा ह्या खोपडीला,ना ठिकाणा झोपडीला !
        कशी जावू मी सांगा सासुरवाडीला!
        सांगा ह्या वेड्याला.......!!२!!
        बरे नाही तुझे हे माहेरी राहणे !
        तू गावात बदनाम होशील याने !
        तुझ्या वाडवडीला अन धर्मरुढीला!
        हे घातक होईल पुढच्या पिढीला !
        सांगा ह्या वेडीला.........!!३!!
        आहे थोरवी थोर माझ्या पिढीची !
        बने आज गावात इज्जत पित्याची !
        आहे मान त्याला अन त्याच्या पगडीला !
        अरे हसतील सारे तुझ्या रे परवडीला !
        सांगा ह्या वेड्याला........!!४!!
        नको भांडू भांडण विकोपास जाईल !
        तुझा माझा तंटा मी पंचात नेईल !
        बसेन चावडीला त्या पंचाच्या जोडीला!
        तुला मात्र नेईन मी याच घडीला !
        सांगा ह्या वेडीला..........!!५!!
                        -वामनदादा कर्डक       


  
 माणसाच्या जीवनाचं वास्तव सांगणारी गीतं वामनदादा आपल्या शब्दात मांडायचे,अश्या रचना लोकांच्या मनाचा ठाव घेत होत्या.ग्रामीण व शहरी भागातील साठ ते सत्तर वयोगटातील लोकांना अशी गाणी खूपच आवडायची.
वामनदादांनी चित्रपट सृष्टीत गीत लेखन केले असते तर भरपूर पैसा,पुरस्कार वगैरे मिळाले असते,पण त्यात ते रमले नाहीत आणि पुन्हा मागे वळून कधी पाहिले ही नाही.त्यांना भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार महत्वाचा वाटला.
बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरी विचाराची पताका घेवून जमेल तिथे राहून व मिळेल ते खावून खेडो-पाडी,वाडी-तांड्यावर गावो-गावी आपल्या लेखणीच्या बळावर प्रबोधनाच्या माध्यमातून अखेरच्या श्वासापर्येंत वामनदादांनी जनमानसातआंबेडकरी विचार रुजविण्याचे काम केले.
          उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे !
          भीमा तुझ्या जन्मामुळे !!
          एक ज्ञान ज्योतीने कोटी-कोटी ज्योती !
          तळपतात तेजाने तुझ्या धरती वरती !
          अंधार दूर तो पळे भीमा तुझया जन्मामुळे !!१!!
          जखड बंध पायातील साखळ दंड !
          तडातड तुटले तू ठोकताच दंड !
          झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे !!२!!
          कुजे वृक्ष तैसाच होता समाज !
          हिरवी-हिरवी पाने अन तयालाच आलं!
          अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे !!३!!
          काल कवडी मोल जिणे वामनचे होते !
          आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते !
          बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे !!४!!
                               गीतकार - वामनदादा कर्डक
                                गायक - श्रावण यशवंते
           तुझीच कमाई आहे ग भीमाई !
           कुणाचेच काही इथे कष्ट नाही !
           लाभले ना जेथे प्यावयास पाणी !
           ज्ञानाची धारा अश्या माळरानी !
            तुझ्याच प्रतापे आणलीस आई,
            कुणाचेच काही इथे कष्ट नाही !!१!!
            वाळून ज्यांची पाने गळाली !
            घालून पाणी आशा फुलवेली !
            फुलवून गेली तूच ठायी-ठायी !
            कुणाचेच काही इथे कष्ट नाही !!२!!
            कालचे रिकामे आताचे निकामे !
            जगतात आड तुझियाच नामे !
            इथे गीत वामन खरे तेच गायी!
            कुणाचेच इथे कष्ट नाही !!३!!
                           - वामनदादा कर्डक
            भिमाची कोटी मुल कोटी मुल !
            वाहती त्यांच्या पदी कोटी फुल कोटी फुल !!
            भीमाचा लोक लढा,होता देशाला धडा !
            तरी ना कुणी बडा,राहिला पाठीशी खडा !
            राहिली छायेपरी पाठीशी त्याचीच पिलं !!१!!
            मांगला-महाराला मेहतर चांभाराला !
            शिक्षण केलं खुल रामोशी वडाराला !
            तरी ही भारतानं मानाच एक पान दिलं !!२!!
            समता वास करी,आशा बुद्धाच्या घरी !
            जावून वामन परि जनता पाय धरी !
            त्याच जनतेला इथं क्रांतीच अवसान आलं !!3!!
                                -वामनदादा कर्डक
              अशी ऐका-पेक्षा एक बुद्ध-भीम गीते वामनदादा लिहीतच राहिले. समाज एक झाला पाहिजे या करिता वामनदादांनी आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या पुढाऱ्यांना व कार्यकर्त्यांना पोटतिडकीने वेळो-वेळी इशारा दिला आहे.
         सांगू किती मी दादा ऐकतेने येथे नांदा !
         यारे सारे भाऊ-भाऊ,प्रेमभावे ऐकतेने राहू !
         तुटलेले दुवे सांधा,ऐकतेने येथे नांदा !!१!!
         नगरी सातारी कोकणी,मोगलाई सारी जुनी!
        अमरावती आणि चांदा, ऐकतेने येथे नांदा !!२!!
         आज तुमच्या घरची भाजी मीठ त्याचे मिरची माझी!
         एके ठिकाणी रांधा,ऐकतेने येथे नांदा !!३!!
         सारी भिमाईची बाळे, ऐकतेची गुंफा माळ!
         घरटे पुन्हा हे बांधा, ऐकतेने येथे नांदा !!४!!
         व्हारे वामनचे मैतर,काळजाच्या देठावर !
         नाव भीमाचे गोंदा,ऐकतेने येथे नांदा !!५!!
         बहुतेक 1975 -76 वर्ष असावे,मी तेंव्हा खूप लहान होतो.नांदेडच्या शिवाजीनगर भागातील लालवाडी येथे मिलिंद गायन पार्टी होती.या गायन पार्टीत देवराव हुटाडे,रघुनाथ तलवारे, भगवान वाघमारे,मोहन गायकवाड,किशन अण्णा ही सर्व मंडळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होवून त्या काळात शहरी व ग्रामीण भागात गीत गायन करून समाजप्रबोधनाचे कार्य करायचे. या गायनचे पार्टीचे ठिकठिकाणी कार्यक्रम ठेवणे व सतत त्यांना प्रेरणा देण्याचे काम त्या काळचे जुन्या पिढीतील कार्यकर्ते व आंबेडकरी नेते भारिपचे नगरसेवक बाबुराव निलंगेकर,कडकनाथ हाटकर,गंगाराम गायकवाड वैजनाथराव कांबळे,अॅड.मा.मा.येवले,सुरेशदादा गायकवाड ही मंडळी करायची.कोणत्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने वामनदादा कर्डक नांदेड मध्ये आले होते. त्यांना मिलिंद गायन पार्टीची ख्याती माहीत होती. या गायन पार्टीला सोबत घेवून वामनदादांनी नांदेड  परीसरात बरेच कार्यक्रम केले.या गायन पार्टीतील सर्वच कलावंत अतीशय नम्र व गुणवंत असल्या कारणाने वामनदादा यांच्यात रमले. बरेच दिवस त्यांनी लालवाडीत राहून मराठवाड्यातील परिसरात आंबेडकरी गीत गायनाचे कार्यक्रम करून प्रबोधन केले आहे.
         वामनदादांचा मुक्काम देवराव हुटाडे यांच्याकडेच असायचा कारण हुटाडे यांना हार्मोनियम,तबला, ढोलक, बुलबुलतारा,चार वाद्य वाजवता येत होती आणि गायन ही करायचे.बरीच गाणी वामनदादांनी लालवाडीत असतांना लिहिली होती.राहणीमान अतिशय साधं.नेहमी पांढरा शर्ट व पांढराच  पायजामा कडक प्रेस केलेला असायचा.नवीन गीत लिहिणे झाले की,हार्मोनियमवर त्या गीतास चाल बसवायचे. कुठला कार्यक्रम आला की, सर्व कलावंतांना सोबत घेवून ज्या गावी कार्यक्रम आहे,त्या गावी निघायचे.असा नित्य नियम असायचा.
             मला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती."भिमाची कोटी मुलं कोटी मुलं,वाहती त्यांच्या पदी कोटी फुलं कोटी फुलं" हे वानदादांच मला एकच गीत म्हणता येत होतं.एकदा मला मनातून ईच्छा निर्माण झाली की,वामनदादांना आपल्या घरी जेवण करायला बोलवावं.  म्हणून मी एके दिवशी देवराव हुटाडे यांना  घाबरत-घाबरतच  म्हणालो,वामनदादांना माझ्या घरी जेवण देण्याची ईच्छा आहे,ते माझ्या घरी येतील आणि जेवतील का? त्यावर हूटाडे म्हणाले ठीक आहे.ते खडकपुऱ्यात गायिका करुणासागर यांच्याकडे गेलेत,ते आले की, त्यांना विचारून सांगतो.
             तासाभरा नंतर मी पुन्हा हुटाडे यांच्या घरी गेलो.पाहतो तर काय वामनदादा व  हुटाडे कोणत्या तरी नवीन लिहिलेल्या गीतावर चर्चा करत होते,तेव्हढ्यात मी पोहचलो.हुटाडे यांनी माझ्याविषयी वामनदादांना सांगितले की,हा मुलगा इथलाच आहे,तुमच "भिमाची कोटी मुलं कोटी मुलं" हे गीत फार छान गातो.तुम्हाला जेवण देण्याची याची फार ईच्छा आहे.कसं करायचं? त्यावर वामनदादा म्हणाले,ठीक आहे.इथं जेवायच ते ह्याच्या घरी जेवू या.असं ऐकताच  एव्हढा मोठा महान महाकवी गायक आपल्या घरी जेवण करण्यासाठी येतोय.माझ्यासाठी हा आनंद गगनात मावेनासाच होता.
             घरी आलो माझ्या मायला म्हणालो,माय खूप मोठा माणूस वामनदादा कर्डक आज आपल्या घरी जेवणासाठी येणार आहेत,मी त्यांना बोलवलं आहे.मायला सुद्धा खूप आनंद झाला.कारण ती जात्यावर दळण दळतांना वामनदादांची गाणी म्हणत असे. संध्याकाळी जेवणाची सर्व सोय केली.वामनदादा, देवराव हुटाडे, प्रा.रविचंद्र हडसनकर आणि स्वतः मी असे आम्ही चौघेजन जेवणासासाठी बसलो. मायन जेवणाची सर्व तयारी केली ताट वाढली.जेवणाला सुरवात झाली.
             पुणे करारावर आधारित असलेलं कस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर लिहिलेलं वामनदादांच एक गीत होत.त्या गीताला मी बऱ्याच दिवसांपासून चाल लावत होतो. ते गीत वामनदादांना म्हणून दाखवण्याची खूप ईच्छा होती. जेवण करता-करताच म्हणालो दादा,मी तुमच्या गाण्याला चाल लावली आहे. त्यावर दादा म्हणाले,म्हणून दाखव.एकीकडं जेवण सुरू त्यात माझं गाणं सुरू.
             तू दिन दलितांचा राजा पाठीचा बंधु माझा !
             मला तू दान दे पतीचे प्राण दे !!
             हे गीत मी करुण स्वरात बसवलं होतं. ते दादांना आवडलं नाही,जेवण बंद केलं आणि तिथंच त्यांनी ते गीत पहाडी आवाजात आम्हा सर्वांना म्हणून दाखवलं.आणि मला म्हणाले असं गायला पाहिजे तेंव्हा लोकांना आवडतं. त्यावर मी म्हणालो ठीक आहे दादा.मग बऱ्याच वेळे नंतर आमची  जेवणं आटोपली.ही आठवण कायम माझ्या हृदयावर कोरल्या गेली.पुढे वामनदादा जेंव्हा-जेंव्हा नांदेडला येत तेंव्हा-तेंव्हा त्यांची मी आवर्जून भेट घेत असे.त्यांच्या प्रेरणेमुळेच माझ्यातला कलावंत (संगीतकार) विकसित होत गेला.ते केवळ वामनदादांच्या गीतांमुळेच.
             सत्य शोधक विचारमंच नांदेडच्या वतीने अध्यक्ष कोंडदेव हाटकर,जयप्रकाश गायकवाड,सचिव श्रावण नरवाडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी 1997 रोजी कालामंदिर येथे वामनदादा कर्डक व शांताबाई कर्डक यांचा "सत्य शोधक जीवन गौरव पुरस्कार" व रोख 10000/-(दहा हजाररुपये ) देवून भव्य स्वरूपात जाहीर सपत्निक सत्कार केला होता. त्या वेळी सभागृहातील उपस्थित आंबेडकरी जनतेनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून वामनदादा व त्यांची पत्नी शांताबाई यांचे जोरदार स्वागत केले.सत्काराला उत्तर देतांना वामनदादांना आनंदाअश्रू अनावर झाले होते.सत्यशोधक विचार मंच आणि तुम्ही नांदेडकरांनी केलेल्या सत्कारामुळे खूप आनंद
 झालो असल्याचे सांगून व उपस्थित जनसमुदाया समोर गीत गायनाला सुरवात केली.   
   वाट फुलेंची सोडून,आंबेडकरांना तोडून !
   तुला चालतच ईयायच न्हाय,तुला चालतच ईयायच न्हाय!
 
  फुटाया लागलं तांबडं, फुलेच पहाट कोंबड !
  तुला डालताच ईयायच न्हाय,तुला डालताच ईयायच न्हाय!
                                                                     !!१!!
 मनुच आंगड टोपड,माझ्या आंबेडकरला !
 तुला घालताच ईयायच न्हाय, तुला घालताच ईयायच न्हाय!
                                                                     !!२!!
 सोडून तथागताला वामन तुझ्या रथाला !
 तुला हालताच ईयायच न्हाय,तुला हालताच ईयायच न्हाय!
                                                                     !!३!!
        हे गीत वामनदादांनी अतिशय सुरेख पहाडी आवाजात गायलं होत.आणि या गीताला स्वतः शांताबाई कर्डक कोरस देत होत्या,तेंव्हा वामनदादा गीत गायनात अधून-मधून म्हणायचे पहा,माझी म्हातारी गाण्याला कशी कोरस देत आहे.हा प्रसंग आज ही जशास तसा नजरेसमोर दिसतो. समाजाच्यावतीने औरंगाबाद,नाशिक अश्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर वामनदादा व शांताबाई कर्डक यांचे सपत्नीक सत्कार होत गेले.
        आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते व दिक्षाभूमी स्मारक समितीचे सद्स्य अॅड.मा.मा.येवले यांनी 14 एप्रिल 2004 रोजी भीमजयंती निमित्त देगांवचाळ परिसरातील प्रज्ञा करुणा बुद्ध विहारावर वामनदादा कर्डक यांच्या गीततगायनाचा कार्यक्रम ठेवला होता.त्या कार्यक्रमात वामनदादांनी
        रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळणारा !
         मी वादळ वारा मी वादळ वारा !!
         मी तथागताची वाणी, ज्योतिबाची गाणी !
         मी क्रांतीचा नारा नारा,मी क्रांतीचा नारा !!१!!
         मी भीम युगाचा बेटा, मी भीम युगाचा रेटा !
         विषमतेला थारा तिथे,जातो माझा मारा !!२!!
         मी वामन वाणी गातो,मी वामन वाणी जातो !
         जातो तिथे पेरीत जातो,चिल्या पिल्यांचा चारा !!३!!
         हे गीत अतिशय जोशपूर्ण आवाजात गायलं होत.रात्री कार्यक्रम झाल्यानंतर 15 एप्रिलला अॅड.मा.मा.येवले यांच्याकडे वामनदादा थांबले होते.त्या वेळी चर्चे दरम्यान वामनदादा अॅड.मा.मा.येवले यांना म्हणाले होते,"यापुढे नांदेडला पुन्हा येणे होईल किंवा नाही,काही सांगता येत नाही"! हे सांगताना वामनदादांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. प्रज्ञा करुणा विहारावरील  तो कार्यक्रम नांदेडकरांसाठी अखेरचा ठरला होता.     
             महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच 6 डिसेंबर 1956 ला महानिर्वाण झाले.देशाच्या इतिहासात एव्हढी मोठी अंत्ययात्रा आतापर्येंत कुणाचीच निघाली नव्हती.या अंत्ययात्रेत बाबासाहेबांनच अखेरचं दर्शन घेण्यासाठी वामनदादा गेले होते. ते दुःख तो विरह वामनदादांना सहन होत नव्हता.त्या प्रसंगाचे वर्णन करणारं गीत लिहिलं....!
             चालवेना मार्ग फोड आले पाया !
             ये ग भीमाई उचलून घे या !!
             पोळतात पाय माझे,तापलेली वाट !
             लागुनिया ठेच माझे,ठेचाळले बोट !
             तोल जायी कशी पाहाया,मला हात द्याया!!१!!
             आजवर आई तू कष्ट साहूनिया !
             क्रमलीस मार्ग खडे झेलूनिया !
             कसा एका-एकी असा घात झाला !!२!!
             आई तुझ्या छायेत वाढला हा पिंड !
             मायच्या त्या पंखाखाली वाढलो अखंड !
             थकलास वामन शिणलिरे काया !!३!!
             ये ग भीमाई उचलून घे या.........!
               अखेरच्या श्वासापर्येंत वामनदादांनी
आंबेडकरी चळवळीला आपलं आयुष्य समर्पित केलं. आपल्या गीत गायनाच्या माध्यमातून संबंध आंबेडकरी समाजाला नवा आयाम दिला.
 वामनदादांची असंख्यअजरामर गीतं आंबेडकरी समाजाला सदैव प्रेरणा देत राहतील. ऐसा महाकवी वामनदादा कर्डक पुन्हा होणे नाही.जयंती निमित्त त्यांच्या लेखणीला त्रिवार वंदन व विनम्र अभिवादन !


No comments:

Post a Comment

Pages