[ प्रबोधन चळवळीत कवी गायक व शाहीराचे योगदान...
शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ते लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम देत आहोत.. संपादक ]
भाग - ६
शाहीर कैलास कोंडबाराव राऊत यांचा जन्म१५ डिसेंबर१९७२ साली हदगाव तालुक्यातील बनचिंचोली या गावी झाला.सध्या ते नागसेन नगर , हदगाव येथे राहतात. वडील गावातील भजनी मंडळात गायण करत.दर गुरुवारी भजन व्हायचे. लहानपणी कैलास राऊत भजणी मंडळाची गाणी ऐकत. वडील सामाजिक कार्यकर्ते असल्याने भीमजयंती निमित्त गायणाचे कार्यक्रम होत. आलेल्या सर्व गायक कलावंतांचे भोजन घरी बनवायचे ,जेवणाची व्यवस्था घरीच करायचे.नंतर हदगाव तालुक्यातील हरडप या माझ्या गावी दरवर्षी धम्म मेळावा होतो त्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक यांचे कार्यक्रम ऐकण्यासाठी न चुकता कैलास राऊत यायचे. आपणही त्यांच्यासारखे गायक व्हावे असे त्यांना वाटले तेथुन प्रेरणा घेऊन गीत गायाला सुरू केली. शालेय शिक्षण घेतांना गीतं लिहण्याचा छंद जडला .शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे ,जो कोणी प्राशन करेल ते गुरगुरल्या शिवाय राहत नाही. हा बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार अंगिकारुन एम.ए.बी.एड.पर्यंत शिक्षण घेतले .उच्च शिक्षित असुनही त्यांनी प्रबोधन कार्याला स्वत:ला वाहुन घेतले. महाकवी वामनदादा कर्डक,कालवश कवीरत्न को.जो. नरवाडे कामारीकर, विष्णु शिंदे, प्रतापसिंग बोधडे, प्रकाशनाथ पाटनकर यांच्या लेखणीच्या प्रभावाने आतापर्यंत ११००च्या वर गाणी लिहिली. संविधानातील समता, स्वातंत्र्य , बंधुत्व व न्याय या मानवी मुल्यांची जोपासना व गुलामांना गुलामीची जाणीव करून देणारी महापुरुषांच्या विचारांची शिदोरीआपल्या प्रतिभेतुन जनमानसात रुजविण्यासाठी त्यांनी केलेला हा गीत प्रपंच. त्यांचे २४गीतसंग्रह, १० व्हीडिओ सिडी आहेत.आणि १००च्या वर रेकार्डिंग गीतं नामवंत गायकांनी गायली आहेत.
महाराष्ट्रातील नांदेड, मुंबई, औरंगाबाद, नागपूर सह २५ जिल्ह्यात तसेच आंध्रप्रदेश, गुजरात, हैद्राबाद या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी हजारो कार्यक्रम केले. नांदेड आकाशवाणी वर तीन वेळा प्रबोधनपर कार्यक्रम केले.
कलावंतांसोबत गाण्याची संधी-
महाकवी वामनदादा कर्डक, विष्णु शिंदे, वैशाली शिंदे, प्रतापसिंग बोधडे, सुरेश शिंदे, नागसेन दादा सावदेकर, अशोक निकाळजे,चंद्रकला गायकवाड, क्रांती मिनल,वैशाली शेंडे, प्रकाशनाथ पाटनकर, सत्यपाल महाराज, राहुल शिंदे, निशा भगत अशा दिग्गज कलावंतांसोबत गाण्याची संधी मिळाली. तबलावादक हरडपचे प्रकाश वाठोरे, समाधान राऊत ढोलक ,जयपाल जमधाडे हार्मोनियम, अमोल भवरे, कोरसला संजय कदम, अरुण कदम असत. शाहीर कैलास राऊत यांची पत्नी विशाखा, मुलं तथागत व समाधान हे आख्खं कुटुंब या गायण क्षेत्रात आजही कार्यरत आहे.
मनपसंत गीते-
१)सांग रमा सांग आता पतीचं नाव गं,
२)आठवावा भीमाने दिलेला धडा,
३)मी पाहिलेला जवानी मधला महारोडा दिसत नाय,
४) माझ्या साहेबाला लागंल का कुणाची नजर,
५)भीमराया तुझ्या नातवाने,
उभा केला लढा वंचितांचा.
धम्मकार्य-
हदगाव शहरात सातत्याने सात धम्म परिषदाचे यशस्वी आयोजन. तसेच नांदेड-नागपुर हायवेवर मानवाडी फाटा ता.हदगाव येथे प्रा.चंद्रकांत पडघणे यांनी तीन एकर जमीन दान दिली व तेथे तथागताची उघडे डोळे व स्मित हास्य मुद्रा असलेला, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा धोतर नेसलेल्या पुतळा दान दिला आहे.त्याच ठिकाणी बहुजन टायगर प्रतिष्ठान या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने शाहीर कैलास राऊत यांच्या संस्थेतर्फे संघमित्रा बौद्ध महाविहार बांधन्याचा संकल्प जाहीर केला आहे.वंचितांना सत्तेमध्ये वाटा मिळवून देण्यासाठी गतवर्षी अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र राज्यात 'सत्ता संपादन जनजागृती अभियान राबवुन प्रचार केला.
पुरस्कार-
वामनदादा कर्डक भीमशाहीर,
नांदेडरत्न यासह अनेक पुरस्कार.
संदेश -सर्व बहुजन बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला जपावं, बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कार्यकर्ते तयार व्हायला पाहीजेत असे शाहीर कैलास राऊत आपल्या विद्रोही गीतगायणाच्या माध्यमातून सांगतात.
शाहीर कैलास राऊत यांचे हे सामाजिक,सांस्कृतिक, राजकिय प्रबोधनाचे कार्य अधिक गतिमान होवो !ही मंगल कामना!
- आयु.महेंद्र नरवाडे,
किनवट, मो.न.९४२१७६८६५०.
No comments:
Post a Comment