डाॕ भाऊ लोखंडे म्हणजे आंबेडकरोत्तर काळातला प्रबोधनाचा जागर होते. आंबेडकरी समाजाच्या अभ्युदयकाळात जे बुद्धीजीवी पुढे आले त्यामध्ये ते अग्रणी आहेत. धर्मांतरानंतर मार्गदर्शकाच्या भूमिकेत जो बुद्धीजीवी वर्ग पुढे आला त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्य आणि विचारधारा समजून घेत लोकांना समजून सांगावे लागले. मोठ्या निष्ठेने एका नवसमाजाच्या निर्माणासाठी डाॕ. भाऊ लोखंडे हे दायित्व निभवनारे बुद्धीजीवी होते.त्यांनी अविरतपणे समाजपरिवर्तनाच्या लढ्यात आपली वाणी आणि लेखनी झिजवली. त्यामगे तत्वनिष्ठ ध्येयवाद होता. त्यामुळेच त्यांचे शब्द भारुन टाकत. समुहाचे जाणीवांतर होत होते.
भाऊ लोखंडे हे निरलस कार्यकर्तेपण घेऊन चळवळीत आले. तेव्हाचा काळ पेटून उठण्याचा. रानमे उठविण्याचा होता. भजने गाने सभा संम्मेलने होत होती. तो काळ चळवळीचा सुवर्ण काळ होता. माणसे ज्ञानासाठी तहानलेली होती. सांस्कृतिक सांधा बदलताना अंतर्बाह्य विसंगतीवर विवेकाचा आसूड ओढत. नवे चिंतन समाजाला देणारा बुद्धिमान वर्ग सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीशी बांधने मोठेच आव्हानात्मक होते.
बुद्धीवंतांच्या अशा छावन्या उभ्या केल्याशिवाय नव्या प्रश्नांची सोडवणूक कशी करायची? बुद्धीवंतांचेही बुद्धीवंत हवेत. आंबेडकरी प्रज्ञेचा मानदंड निर्माण करणारी एक फळीच निर्माण होत होती. डाॕ आंबेडकरांची विचारपद्धती ही बुद्धीनिष्ठ व मर्मस्पर्शी होती. धर्मांतरानंतर धर्म म्हणजे काय? धम्म म्हणजे काय? हे बौद्ध जीवन जाणीवेचे नवे तत्वव्यूह होते. नियतीवाद व कर्मविपाकाच्या घातक धारणातून समाज मुक्त करत एक आश्वस्त करणारा जीवन मार्ग प्रशस्त करणे आवश्यक आहे. हे कार्य काही , काही दिवसाचे नव्हते. अव्याहत खपण्याचे होते.
मूल्यांतरण हे मोठे जोखिमेचे असते. धर्मांतर हे मूल्यांतर होते. त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय समाज घेत होता. बाबासाहेबांवर आसलेल्या अविचल निष्ठेतुनच त्याचे प्रत्यकारी प्रारुप उभे होत होते. धम्म आणि लोकशाही यांची सांगड घालून बहूजन वर्गातील समदुःखी जनसमुहास एका झेंड्याखाली आणण्याचे प्रयोगही करण्यात येऊ लागले. ओबीसी विमुक्त भटके समतेच्या छायेखाली येऊ लागली होती. वर्णाधिष्टित समाजव्यवस्था उलथून टाकण्यासाठी हे चालले होते.याचे प्रत्यक्ष साक्षीदार भाऊ लोखंडे होते.
बौद्ध धम्माचा व्यासंगी ज्ञानोपासक होऊन सुक्ष्मग्राही अवलोकन आणि आकलन करणारे फार थोडे लोक आहेत . त्यांचा पालिप्राकृत हा विषय असल्याने त्यांची बौद्ध धम्माची जाण चांगली होती. ते संवेदनशील अभ्यासक होते. बुद्ध चरित्रम या अश्वघोषाच्या संस्कृत बुद्ध चरित्राचे सुगम्य असे अनुवादकार्य त्यांनी केले. त्याची अर्पणपत्रिका मोठीचा कारुण्यमयी आहे. मुलीच्या अकाली मृत्यूने आतून हलून गेलेले भाऊ हे एक माणूस म्हणून किती कुटुंबवत्सल होते याचा अनुभव येतो. न जच्चा वसलो होति न जच्चा होति ब्रम्हणो कम्मुना वसलो होति कम्मुना होति ब्राम्हणो ! तेवढीच चिडही या मानवनिर्मित विषमतेची होती.
धम्मतत्वे अतिशय गहण आहेत . फार थोड्या चिंतनशील अभ्यासकांना त्याची ओढ असते. आंबेडकरी धम्मचिंतन हे विवेकधिष्टित आहे. त्यामध्ये कुठलाच अज्ञेयवाद नाही. ते एक समाजास समृद्ध करणारे तत्त्वज्ञान आहे. लोकशाही जीवनप्रणालीस पूरक जे नीतीमूल्य हवीत ते धम्माशिवाय अन्य कुठे असू शकते? एकूण समाजाच्या जडणघडणीचा विचार करीत" मराठी संत साहित्यावर बौद्ध धम्माचा प्रभाव" या संशोधन कार्यातून साकार झालेला हा प्रबंध धम्म आणि संत साहित्य याचा परस्पर भावबंध समृद्ध करणारा आहे.त्यांच्या संशोधनपर लेखनामुळे सर्व बहूजन समाजात वैचारिक भावऐक्य निर्माणाची विधायक शक्यता अधोरेखीत झाली आहे.
आंबेडकरी तत्वविचारांचा अन्वयार्थ लावताना, तो कसा बुद्धीसंगत न्यायसंगत मानवतेचे व्यापक हितसाधनारा व राष्ट्रवादी मूल्यांनी ओतप्रोत आहे. हे देशाला पटवून देणे आव्हानात्मक आहे. एक आंबेडकरी भाष्यकार म्हणून त्यांनी हे आव्हान लिलया पेलले. त्यांचा बौद्ध धम्माचा व्यासंग मोठा होता. बौद्धांनाच खर्याखुर्या बौद्ध धम्माची ओळख करुन देणे हे बौद्ध पंडितापुढील मोठे आव्हान आहे.
विपश्यनेबाबत सुद्धा त्यांनी घेतलेली भूमिका यथार्थ होती. त्यामूळे बौध्दिक मोकळेपणा, मनोविश्लेषक व मनोचिकित्सक परिप्रेक्ष समजून घेता आला. समाजाचा सांस्कृतिक तोल राखून ठेवण्यासाठी त्यांनी लेखनी झिजावली.
जनजाणीवेचा धागा पकडून ते बोलत. त्यांच्या भाषणशैलीने जनसमूह खिळून राहायचा. त्यामुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर सहजतेने पोहचले. ते एक ध्यासवेडे व्यक्तीमत्व होते. वैयक्तिक स्वार्थ जाळूनच आपली चळवळ सफल होऊ शकते. जो बारे घर अपना चलो हमारे साथ! कबिराची हाक त्यांनी ऐकली, ही आपणही ऐकावी. चळवळीच्या उभारणीकरीता त्यांनी गावोगाव पिंजून काढले. त्यांचे आकस्मिक जाणे धक्कादायक आहे. समाजमनावर त्यांच्या वाणीने अधिराज्य केले. दुरदुरून लोक त्यांची भाषणे ऐकण्यास येत. मन लावून ऐकत. विचाराची काही फुले आपल्या काळजात घेऊन घराकडे परत जात. विचारपरिमळ घराघरात गावोगाव पसरून आपले बौद्धिक दायित्व निभवत ते जगले. अशा आंदोलनाच्या खडतर वाट चालीस विनम्र आदरांजली!
-प्रा. सुभाष गडलिंग
अमरावती ९५४५२६५२७९
No comments:
Post a Comment