आदिवासी भागातला आंबेडकरी गायक : सुरेश पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 1 November 2020

आदिवासी भागातला आंबेडकरी गायक : सुरेश पाटील

 


          महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीत गीतगायनाच्या माध्यमातून अनेक कलावंतांनी आपले योगदान दिले आहे.त्यात नांदेड जिल्ह्यातील किनवट सारख्या आदिवासी भागात राहून  शास्त्रोक्त पद्धतीने संगीताचे शिक्षण घेवून सुरेश पाटील यांनी आपल्या गीत गायनाद्वारे आंबेडकरी चळवळीला समृद्ध करण्याचे कार्य केले आहे.

           सुरेश पाटील हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील माहूर या गावचे.आई राधाबाई वडील यादवराव हे गावातच मोल-मजुरी,मोळी विकून संसाराचा गाडा हकायचे. त्यांच्या पोटी सुरेशसह सात भावंडे जणू सप्त स्वरच.आई राधाबाई  ह्या जात्यावर दळण दळतांना बाबासाहेबांचा पाळणा(अंगाईगीत) गायन करत. तर वडील यादवराव महाकवी वामनदादा कार्डकांचे गीत गायन करायचे.यामुळे सुरेशवर अगदी लहानपणापासून गीत गायनाचे संस्कार होत गेले.

            गावातील जि.प.शाळेत सुरेशचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असतांना शाळेतील विश्वनाथ गायकवाड,सुभाष भोपे या शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील कविता,देशभक्तीपर गीते गायन करण्यास प्रोत्साहन दिले.घरची परिस्थिती बिकट असल्या कारणाने विजय रसवंती व ताज हॉटेल मध्ये काम करत सुरेशने माध्यमिक शिक्षण पूर्ण करून दहावीला शाळेत दुसरा क्रमांक प्राप्त केला.पुढे आपण शिक्षक बनले पाहिजे म्हणून पुसद येथील असेगांवकर अध्यापक विद्यालयात प्रा.छाया पालकृतवार यांच्या मार्गदर्शनाखाली डी.एड.पूर्ण केले.शिक्षण शिकत असतांनाच बुद्ध जयंती,भीम जयंती,धम्मचक्र प्रवर्तन,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आदी प्रसंगी भजनी मंडळाच्या माध्यमातून गीतगायनाचे कार्यक्रम सुरूच ठेवले.

             नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत माहूर तालुक्यातील लखमापूर या गावी सुरेश पाटील यांना 1994 साली सहशिक्षक म्हणून नोकरी मिळाली.नोकरी लागल्यामुळे थोड्या बहुत प्रमाणात पोटा-पाण्याचा प्रश्न सुटला होता. नोकरीतल्या पहिल्या पगारात सुरेश पाटील यांनी प्रथम हार्मोनियम विकत घेतली.कारण  त्यांच्यातला कलावंत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. नोकरी सांभाळत त्यांचे गीतगायनाचे कार्यक्रम चालूच होते. संगीताचे जाणकार पंडित सरस्वतीराज जाधव व पंडित अविनाश सोनकर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे किनवट येथे बदली झाल्यानंतर 

सुरमणी पंडित वसंतराव शिरभाते यांच्याकडे संगीत विषयातील बहुमानाची "संगीत विशारद"ही पदवी प्राप्त केली.

        सुरेश पाटील आता गायन कलेत निपूण झाले होते.किनवट व परिसरात त्यांचा नावलौकिक झाला.लोक आवडीने त्यांच्या गीत गायनाचे कार्यक्रम ठेवू लागले.आपल्या अंगी असलेल्या कलेच्या बळावर त्यांनी सर्वांग सुंदर असा "बुद्धभीमवाणी"हा कार्यक्रम बसवला. हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला की,या कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश,छत्तीसगढ,हैद्राबाद, नांदेड,जळगांव, पुणे, नागपूर, अमरावती आदी मोठमोठ्या शहरात सादर केला.या कार्यक्रमात वामनदादा कर्डक,प्रकाशनाथ पाटणकर, रंगराज लांजेवार, राजानंद गडपायले, मनोजराजा गोसावी आदी गीतकरांच्या गीतांना प्राधान्य दिले.आज घडीला महाकवी वामनदादा कार्डक यांचे दोन हजाराहून ही अधिक गीतांचा संग्रह असल्याचे पाटील यांनी सांगितले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात समाज वेग-वेगळ्या गटात विभागला गेला.काही कार्यकर्त्यांमुळे आंबेडकरी चळवळीची होत असलेली दयनीय अवस्था गीतकार प्रतापसिंग बोदडे यांनी आपल्या गीतात शब्दबद्ध केली आहे.हे गीत सुरेश पाटील आपल्या  सुरेल आवाजात मंचावर आवर्जून सादर करत असतात. ते गीत येथे देत आहे.

तुझ्या पाऊल खुणा भीमराया !

तुझी पोरं पुसू लागली रे !

तुझ्या वैऱ्याच्या संगतीला जावून

पंगतीला बसू लागली रे !!धृ!!

पांगली ही तुझी भीमसेना !

त्यात सरदार कोणी दिसेना !

बिन धन्याच्या या फौजेस आता!

सारी दुनिया हसू लागली रे !!१!!

शिक्षणाची पिछेहाट झाली !

पिढी आताची मोकाट झाली !

येत आहे उद्याची गुलामी !

मला आता दिसू लागली रे !!२!!

तूच माळी मला राखणारा !

काय वर्णू तुझा बा दरारा !

तुझ्या मळ्यातच तुझ्यापाठी आता

सारी ढोरं घुसू लागली रे !!३!!

मनी नाही निराशा तरी ही !

पिढी आणील वठणीवरी ही !

त्या प्रतापसिंगाची लेखणी ही !

या करिता हसू लागली रे !!४!!

        अशी एका पेक्षा एक अनेक भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची गीते सुरेश पाटील यांनी स्वरबद्ध करून स्टेजवर गायली आहेत. वडील यादवराव पाटील यांना वामनदादांचा सहवास खूप जवळून लाभल्यामुळे वडिलांची इच्छा होती की,वामनदादा कर्डक यांच्या नावे संगीत विद्यालय सुरू करावे,म्हणून सुरेश पाटील यांनी संगीतकार सदाशिव गच्चे यांच्या हस्ते 1 जानेवारी 1914 रोजी  "वामनदादा कर्डक संगीत अकॅडमी"चे उदघाटन करण्यात आले.या संगीत अकॅडमीच्या माध्यमातून सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्रद्धा मामीडवार,स्नेहल सरपे, रिंकू मुनेश्वर, शिवांजली मुलकेवार असे असंख्य शिष्य निर्माण करून त्यांना संगीताच्या अध्यापनाबरोबरच गोंडी,बंजारी,तेलगू आदी भाषेतील गीतगायन शिकवले.

स्वतः पाटील यांना हार्मोनियम,व्हायोलिन,तबला,सतार आदी वाद्य सहजपणे वाजवता येतात.आकाशवाणी यवतमाळ व नांदेड येथील केंद्रावर मुलाखत वजा गीततगायनाचे कार्यक्रम झाले आहेत.

           सुरेश पाटील हे किनवट करांसाठी दरवर्षी सर्व वाद्यवृंदासह बुद्ध जयंतीला"बुद्ध पहाट",डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला"भीम पहाट" तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी सहा डिसेंबरला"गाणे निळ्या नभाचे"ही बुद्ध-भीम गीतांची शास्त्रोक्त संगीताची मेजवाणी श्रोत्यांना देतात. लॉर्ड बुद्धा टीव्ही वरील "जयभीम इंडिया"या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून काम केले असून साम टीव्ही, झी टीव्ही वरील"अंतर्नाद"या विश्वविक्रमी गिनीज वर्ल्डबुक कार्यक्रमात त्यांना गीतगायनाची संधी मिळाली आहे. ह्या सर्व प्रवासात पत्नी सुषमा यांची अतिशय मोलाची साथ मिळाली.मुलगी सांची हिला गायन व चित्रकलेची आवड आहे.तर मुलगा अभिनव हा तबला वादन शिकतोय.

             एकंदरीतच सुरेश पाटील यांचा जीवन प्रवास खडतर असला तरी भावी पिढीला तो नक्कीच प्रेरणादायी  आहे. येणाऱ्या काळात त्यांनी स्थापण केलेल्या "वामनदादा कर्डक संगीत अकॅडमीतून" शिकून बाहेर पडणारा शिष्य हा सुर्या सारखा चमकत राहो.सुरेश पाटील यांच्या पुढील वाटचालीस मंगल कामना!

                       

- सदाशिव गच्चे, नांदेड

No comments:

Post a Comment

Pages