किनवट तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींमध्ये १८२ जागांसाठी ४०२ उमेदवार निवडणूक रिंगणात सोमवारी ७९ उमेदवारांनी घेतली माघार, तर ३८ उमेदवार बिनविरोध - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 6 January 2021

किनवट तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींमध्ये १८२ जागांसाठी ४०२ उमेदवार निवडणूक रिंगणात सोमवारी ७९ उमेदवारांनी घेतली माघार, तर ३८ उमेदवार बिनविरोध

किनवट , ता. ६ :  तालुक्यातील २६ पैकी फुलेनगर व गोंडेमहागाव या दोन ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्यामुळे त्यांचे प्रत्येकी तीन प्रभाग मिळून ६ प्रभाग व चिखली ई.च्या तीन पैकी २ प्रभाग आणि रामपूर/भामपूर, आंदबोरी, दयालधानोरा, पांगरी येथील प्रत्येकी एक प्रभाग मिळून एकूण सहा प्रभाग बिनविरोध निघाल्यामुळे एकूण ८२ प्रभागातील १२ प्रभाग कमी झाले असून, उर्वरीत २४ ग्रामपंचायतीतील प्रत्यक्ष निवडणूक होणार्‍या प्रभागाची संख्या ७० झालेली आहे.

 तालुक्यातील २६ पैकी फुलेनगर व गोंडेमहागाव या दोन ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून, उर्वरीत २४ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सोमवारी (ता.४) उमेदवारी परत घेण्याच्या दिवशी ७९ उमेदवारांनी माघार घेतली आहे. एकूण ३८ उमेदवार अविरोध निघाले आहेत. आता उर्वरीत २४ ग्रामपंचायतीमध्ये १८२ जागांसाठी ४०२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.


       सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नामांकनपत्र परत घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यास सुरुवात झाली. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षविरहित लढविली जाते. तसेच या निवडणुकीत उमेदवारांची संख्यादेखील जास्त असते. त्यामुळे निवडणूक आयोगाने यावेळेस आधुनिक काळाशी नाते सांगणारी ४० निवडणूक चिन्हे वाढविल्यामुळे आता या चिन्हांची संख्या १९० झालेली आहे. यातील कांही निवडणूक चिन्हे मजेदार असून, प्रचारादरम्यान काही विनोदी किस्से घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र जास्तीत जास्त उमेदवारांनी आधुनिक चिन्हापेक्षा ग्रामीण भागात परंपरागत चिन्हच फायदेशीर ठरेल या विचाराने  गॅस सिलिंडर, छताचा पंखा, शिलाई मशीन, टि.व्ही, कपबशी,कपाट या सारख्या घरगुती वापरातील वस्तूंनाच पसंती दिली आहे. उमेदवारी मागे घेणे व निवडणूक चिन्ह वाटपामुळे तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी होती. शारिरीक अंतर राखण्याचा फज्जा उडाला होता, तर अनेक लोकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. त्यामुळे कोरोना संसर्गाचे भयसुद्धा या निवडणुकीपुढे संपल्याचे दिसत होते. तहसील आवारात गटागटाने लोक तावातावात निवडकीची चर्चा करीत होते.

    सरपंचाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढले जाणार असल्यामुळे, बर्‍याच जणांनी पॅनलविरहित अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. गावपुढार्‍यांनी त्यांची मनधरणी करूनही त्यांनी माघार घेतली नाही. ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. पूर्वी गावांत राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नव्हता. गावातील नेतेच आपापले पॅनेल उभारून निवडणूक लढवायचे. मात्र, सध्या राजकीय नेत्यांनी ग्रा.पं.च्या निवडणुकीकडे लक्ष देणे सुरू केले असून, प्रत्येक गावात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सदस्यांसाठी सातवी उत्तीर्णची अट घातल्यामुळे, अनेकांना निवडणुकीपूर्वीच माघार घ्यावी लागली. त्यामुळे पॅनलसाठी उमेदवार शोधतांना अनेकांची बरीच धावपळ झाली. ‘गावाचा विकास’ या मुद्यावरच निवडणूक लढविली जाते. यावेळेस जुन्या सदस्यांच्या कारभाराला कंटाळून अनेक गावांत स्वयंस्फूर्तीने तरुणांनी आपापले पॅनल उभे करून, ग्रामविकासाचा आपला मनोदय जाहीर केला. मात्र, गावात ज्या नेत्याचे वजन जास्त त्याचीच चलती राहात असलेतरी, तरुणांच्या सहभागामुळे ही निवडणूकीतील रंगत वाढणार,  हे मात्र नक्की !

No comments:

Post a Comment

Pages