किनवट,दि.03 (प्रतिनिधी) : तालुक्यातील काही भागात हरभर्याचे पीक हे फुलोर्यात तर काही भागात घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. बहुतांश भागातील हरभर्यावर तांबेर्यासह घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असून, खरीपातील सोयाबीन, कपाशी व तुरीच्या नुकसानीत खचलेला शेतकरी आता रब्बीतील घाटेअळीच्या व्यवस्थापनामुळे मेटाकुटीस आलेला दिसत आहे.
किनवट तालुक्यातील रब्बीतील हरभरा पिकाचे पेरणी झालेले क्षेत्र 11 हजार 828 हेक्टर आहे. यंदा खरीपामध्ये सोयाबीनवर चक्रीभुंगा व खोडमाशीचा हल्ला झाल्यावर अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीदाच्या शेंगांना कोंब फुटून ते पीक हातचे गेले होते तर कपाशीवर झालेला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व बोंडसडीमुळे त्या नगदी पिकाचाही उतार कमी होऊन शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्यांची सारी भिस्त ही तुरीवर रब्बीतील हरभर्यावर होती. मात्र डिसेंबरमधील हवामानातील चढ-उतारामुळे तुरीवरही अवकळा येऊन अनेकांची तूर शेंगा भरण्यापूर्वीच सुकल्या गेल्याच्या तक्रारी कृषीविभागाकडे आलेल्या होत्या. आता हरभर्यावरील तांबेरा व घाटेअळीच्या आक्रमणामुळे शेतकरी हे पीकतरी हातचे जाऊ नये म्हणून धडपडत आहेत.
घाटे अळी ही हरभरा पिकावरील प्रमुख कीड असून, या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंडयावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून दोन ते तीन दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीत द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पीक फुलोर्यावर आल्यावर, ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणत: 30-40 घाट्यांचे नुकसान करते.
घाटे अळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, नीळकंठ, काळी चिमणी इत्यादी पक्षी पिकांमध्ये फिरून घाटे अळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे हे पक्षी शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकाचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल, त्या शेतामधे बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हेक्टर 20 पक्षी थांबे) तयार करून शेतामध्येे लावावेत. त्यामुळे पक्ष्यांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते. कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी धाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्युर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यांमध्ये सतत तीन दिवस आठ ते दहा पंतग आढळल्यास, व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.
“शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पीक फुलोर्यावर आल्यानंतर घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी खालील दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळून कराव्या. पहिली फवारणी 50 टक्के फुलोरावर असतांना निंबोळी अर्क पाच टक्के किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी., 20 मि.ली. तर दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर इमामेक्टीन बेंझोएट पाच टक्के एस. जी. चार ग्रॅम किंवा ईथिऑन 50 टक्के ईसी 25 मिली किंवा फ्ल्युइँडामाईड 20 टक्के डब्ल्युजी मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलिपोल 18.5 टक्के एस.सी.3.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा रोगाकरिता प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी प्रोपीकोनॅझोल 25 टक्के इ.सी. 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याची शिफारस तालुका कृषी विभागातर्फे करण्यात आली आहे.”
- बालाजी मुंडे, तालुका कृषी अधिकारी, किनवट
No comments:
Post a Comment