डॉ.कारभारी काळे यांच्या संशोधनाला ऑस्ट्रेलियन पेटंट जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 3 February 2021

डॉ.कारभारी काळे यांच्या संशोधनाला ऑस्ट्रेलियन पेटंट जाहीर


   औरंगाबाद,  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांच्या संशोधनाला ऑस्ट्रेलियन पेटंट मंजूर झाले आहे. दरम्यान, विद्यापीठासाठी ही अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी व्यक्त केली आहे.


     डॉ. काळे हे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून अनुदानीत आणि जिओस्पेशिअल टेकनॉलॉजी या जागतिक दर्जाच्या विषयावर आधारित राष्ट्रीय संशोधन प्रकल्पावर मागील काही वर्षांपासून संशोधन करत आहेत. यामध्ये भारतातील आयआयटी, आयआयएसटी आणि डीआरडीओ यासारख्या नामांकित संस्थांमधील अनेक शास्त्रज्ञ वेगवेगळ्या विषयावर संशोधन करत आहेत. डॉ. काळे यांनी उपग्रहाद्वारे घेतलेल्या हैपरस्पेक्टरल ईमेजेस चे विश्लेषण करण्यासाठीचे अचूक तंत्रज्ञान विकसित केले आहे. या संशोधनामध्ये डॉ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश सोलंकर आणि धनंजय नलावडे या संशोधक विद्यार्थ्यांनी काम केले आहे. जागतिक पातळीवरील विकसित अवकाश तंत्रज्ञानामुळे हैपरस्पेक्टरल इमेजेस चा उपयोग करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अनेक पदार्थांचा अभ्यास करणे सुलभ झाले आहे. हैपरस्पेक्टरल इमेजेसमध्ये मानवी डोळ्यांना न दिसणारी प्रचंड अशी माहिती संकलित केली असली तरी या माहितीचे अचूक विश्लेषण करताना अनेक तांत्रिक अडचणीना सामोरे जावं लागत. यामध्ये विविध पदार्थांच्या प्युअर स्पेक्टरल सिग्नीचर शोधून काढने हा एक जागतिक दर्जाची समस्या आहे. या प्युअर सिग्नीचर्स तांत्रिक भाषेमध्ये हैपरस्पेक्टरल एन्डमेम्बर या नावाने ओळखले जातात. डॉ. काळे यांनी हैपरस्पेक्टरल इमेज च विश्लेषण अधिक सुलभ करण्यासाठी हैपरस्पेक्टरल इंडमेम्बर एक्सट्रॅक्शन चे अचूक तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे पृथ्वीच्या भूभागावरील कोणत्याही पदार्थांचे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने विश्लेषण व वर्गीकरण करणे शक्य होणार आहे. या संशोधनाची उपयुक्तता ही भारत सरकारच्या अवकाशातून माती परीक्षण, पाणी गुणवत्ता तपासणी, पीक प्रकार ओळखणे, पीक आरोग्य तपासणी, पीक उत्पन्नाचा अंदाज लावणे, दुष्काळाची तीव्रता तपासणे आणि नैसर्गिक आपत्ती विश्लेषण करणे यासारख्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी फायदेशीर आहे. या ऑस्ट्रेलियन पेटंट सोबतच डॉ. काळे यांनी त्यांच्या संशोधनावर आधारित इतर सात भारतीय पेटंट हे भारतीय पेटंट जर्नल मध्ये प्रकाशित केले आहेत. संशोधनामधील या  आंतरराष्ट्रीय पातळीच्या यशामुळे विद्यापीठाचे  मा.कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रमोद येवले, मा.प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, विभागप्रमुख तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सचिन देशमुख आणि विभागातील सहकारी प्राध्यापकांनी  डॉ. काळे यांचे  अभिनंदन केले आहे.


   दरम्यान, मराठवाड्यातील विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये गुणवत्ता आहे आणि तशी संधी मिळाल्यास ते दाखवू शकतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी ही अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी व्यक्त केली आहे.



No comments:

Post a Comment

Pages