किनवट तालुक्यात 3 हजार 115 हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी तालुक्यात सिंचनाच्या सुविधा वाढविण्याची गरज - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 23 February 2021

किनवट तालुक्यात 3 हजार 115 हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी तालुक्यात सिंचनाच्या सुविधा वाढविण्याची गरज

किनवट, ता.23 (बातमीदार) :  किनवट तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र पाच टक्यापेक्षा कमीच असल्यामुळे, शेतकर्‍यांचा सर्व जोर खरीप व रब्बीतील पिकं घेण्यावर असतो.   उन्हाळ्यातील सिंचन सुविधांच्या कमतरतेपायी  तालुका कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात आतापर्यंत  3 हजार 115 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झालेली आहे. फेब्रुवारी अखेर अंतीम पीक पेरणी अहवाल प्राप्त होईपर्यंत या आकडेवारीत थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे.


     तालुक्यात बोधडी, जलधरा, इस्लापूर, शिवणी, दहेली, मांडवी, उमरी बाजार, सिंदगी मोहपूर व किनवट अशी 9 महसूल मंडळे असून, तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 1 लाख 56 हजार 753 .68 हेक्टर आहे.  उन्हाळी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र 1 हजार 703 हेक्टर असूनसुद्धा गत वर्षी  5 हजार 642 हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. यंदा मात्र त्यात घट झाली असून, आजपर्यंत 3 हजार 115 हेक्टरवर उन्हाळी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे.


       तालुक्यात यंदा  तृणधान्यामध्ये आतापर्यंत उन्हाळी भात 167 हेक्टर, उन्हाळी ज्वारी 1 हजार 004 हेक्टर व मका 421 हेक्टरवर पेरला गेला आहे. गतवर्षीच्या अंतीम उन्हाळी पीक पेरणी अहवालानुसार भात 87 हेक्टर, उन्हाळी ज्वारी 1 हजार 641 हेक्टर व मका 518 हेक्टरवर पेरला गेला होता. कडधान्यामध्ये गतवर्षी मूग अवघा 8 हेक्टरवर पेरला गेला होता. यंदा त्यात वाढ होऊन आजपावेतो 16 हेक्टरवर मूग पेरण्यात आलेला आहे. गळीत धान्यामध्ये  गतवर्षी उन्हाळी भूईमूगाची 1 हजार 547 हेक्टरवर तर तिळाची 942 हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र उ.भूईमूगाची आजपर्यंत केवळ 640 हेक्टर तर तीळ 601 हेक्टरवर पेरला गेला आहे. तसेच  सूर्यफूल 8 हेक्टर तर सोयाबीन 43 हेक्टरवर पेरले गेले आहे.


       गतवर्षी परतीच्या पावसात खरीपातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फूटून, दाणेही बारीक झाल्याने खूप नुकसान होऊन उताराही घटला. त्यामुळे यंदाही सोयाबीनच्या बियाण्यांची कमतरता भासणार हे तेव्हांच स्पष्ट झाले होते. त्यामुळे कृषीखात्याच्या सूचनेनुसार काही शेतकर्‍यांनी खास बियाण्याकरीता उन्हाळी सोयाबीनची पेरणी केल्याचे समजले. नगदी पिकांमध्ये ऊस 26 हेक्टर, पपई 4 हेक्टर, केळी 3 हेक्टर तर टरबूजाची 54 हेक्टरवर लागवड करण्यात आलेली आहे. भाजीपाल्यामध्ये मिरची 13 हेक्टर, कांदा 4 हेक्टर तर इतर विविध भाजीपाल्याची 81 हेक्टरवर आतापर्यंत लागवड झालेली आहे. उन्हाळ्यात पाळीव जनावरांना चार्‍याची कमतरता भासते म्हणून काही भागात ज्वारी 9 हेक्टरवर तर मक्याची 21 हेक्टरवर चार्‍यासाठी पेरणी करण्यात आलेली आहे. या महिन्याअखेर पर्यंत उन्हाळी पिकांची पेरणी चालू राहणार असून, अंतीम पीक पेरणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तालुक्यातील रब्बीच्या पेरणीचे चित्र स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment

Pages