नुकतेच चर्चेत असलेले आदरणीय पत्रकार संतोष दादा अरसोड यांच डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आणि प्रत्येकक्षणी मेंदूला विचार करायला भाग पाडणार "प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा"हे पुस्तक वाचण्यात आलं. स्वच्छते इतकच चाकोरीबद्ध,समाजाने मर्यादित केलेल्या गाडगेबाबांच्या जीवनाचे पैलू दादांनी पुस्तकात उघड केले आहे.एक क्रांतीकारक,संत, समाजसुधारक,शेतकरी आंदोलक, समाजप्रबोधक, शिक्षणमहर्षी, स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते,अहिंसावादी, कीर्तनकार असे अनेक पैलू दादांनी प्रचंड ताकदीने मांडले आहे.बाबांनी केलेला गृहत्याग, पुरणपोळीचा हट्ट केल्यावर चांदूरबाजारच्या काकडे पाटलांनी बाबांना मारलेले फटके,कलावती(मुलगी)च्या लग्नासाठी बायकोला ज्वारी भीक मागायला लावलेला प्रसंग,गोविंदाच जुन्या कपड्यावर लावलेलं लग्न, आपल्या धर्मशाळेत मुलगी आलोका आश्रय न दिलेला कठोर प्रसंग,आलोकाच्या बाळंतपणासाठी बायकोला शेण-गोवऱ्या वेचून पैशाची तजवीज करायला लावण्याचं धाडस याप्रसंगातून कर्तव्यकठोर असलेला बाबा आणि बाबांच्या चळवळीला मूक समर्थन देणारे कुटुंबीय हे भावनिक द्वंद दादांनी पुस्तकात असे रेखाटले की वाचकांच्या पापणीच्या कडा ओलावतात. गृहत्याग केल्यावर अनेक दिवसांनंतर कुटुंबीयांची आणि बाबांची भेट झाल्यावर ह्रदयद्रावक प्रसंग पुढे आला आणि आईच्या विनवणीवर सुद्धा डेबू घरी जायला तयार नाही, तेव्हा लेखक म्हणतात,की हे भावनिक द्वंद अनुभवताना ऋणमोचनच्या पूर्णेचा काठ कारुण्य कंपित झाला नसेल तर नवलच!पण असे कठोर आणि भावनिक प्रसंग डोळ्यासमोरुन पान पलटवताना वाचकांच्या काळजाचा काठ कारुण्य कंपित झाला नसेल तर नवलच!!!
कारण आदरणीय संतोष दादांनी गुळगुळीत बोलणाऱ्या आणि मोहक शब्द लेखणीत वटवणाऱ्या लेखकाची, वक्त्याची भूमिका कधीच निभावली नाही तर गाडगेबाबा जगण्याचा प्रयत्न कृतीतून सतत केला. म्हणूनच की काय लेखकाचा परीवर्तनवादी पिंड आणि सामाजिक कळवळा या पुस्तकांत जवळून अनुभवता येतो.मामाचे शेत घशात गिळणाऱ्या सावकाराला शिकवलेला धडा,पिंडदानाच्या वेळी भटजीला निशब्द केलेला युक्तिवाद, कीर्तनातून अंधश्रद्धा संपवण्यासाठी तुकोबारायां सारखा केलेला मानसिक प्रहार,लोकांच्या समस्येचे अभंग गावून दगडातून गायलेले 'देवकीनंदन गोपाला'चे क्रांती स्वर,टाळ वाजवून समाजाचं टाळक जागेवर आणण्यासाठी उग्र आणि आवेशात आलेले बाबा. इत्यादी प्रसंगातून पुस्तकाच्या सुरुवातीला क्रांतीकारी संत हा शब्दोलेख अतिशय समर्पक वाटतो.गाडगेबाबांचे डॉ.पंजाबराव देशमुख यांच्याशी असलेले सौख्य, कर्मवीर भाऊराव पाटीलांवर असलेले प्रेम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी असलेले निकट संबंध लेखकाने कळकळीने, विस्मरण होऊ न देता नमूद केले आहे हे पुस्तकाचे विशेष.
"गांधीकु मरणच नही"असं म्हणत महात्मा गांधींचा कीर्तनातून जयजयकार आणि"बाबासाहेबांचे लहान-सहान काम नाही केल,तर हिंदुस्थानाची घटना लिवली,हा विद्येचा साक्षात्कार आहे.बाबासायबानं देशाले घटना देऊन माणसाले-माणसात आणलं"असे डॉ.आंबेडकरांबददल गौरवोद्गार काढणारे डेबूजी शाळेत निरक्षर असूनही लौकिक अर्थाने साक्षर होते.अन स्वतला पुरोगामी म्हणवून घेणारे आम्ही शाळेत साक्षर असूनही लौकिक अर्थाने निरक्षरता आहोत.कारण गांधी आणि आंबेडकर या दोन्ही महापुरुषांत लोकांनी जाणीवपूर्वक भेद निर्माण करुन द्वेषाच आयत मटेरियल नवीन पिढीच्या डोक्यात भरणे सुरु आहे.गाडगेबाबांची दशसूञी म्हणजे मानवी कल्याणाचे संविधान आहे.बाबांचे कीर्तन म्हणजे मानवाच्या मुक्तीचे विद्यापीठ आहे.भोंदूगिरीचे चिरफाड करणारे भेदक शस्त्र आहे. कीर्तन- क्रांती-करुणा असा तिहेरी प्रवास घडवून समाजाचा अज्ञानाने बसवलेला धागा जोडण्यात यशस्वी झालेला महाराष्ट्राचा दुसरा संत तुकाराम म्हणजे संत गाडगेबाबा.हीच प्रचिती वाचकाला पुस्तक वाचून झाल्यावर येते.
लेखकाने आपण लेखक नाहीच हे पुस्तकाच्या सुरुवातीला मान्य केले.पण उत्तम वक्ते, पत्रकार,शेतकरी नेते असलेले संतोषदादा हे नुसते लेखक नव्हे; संवेदनशील लेखक आहे. म्हणूनच बाबांच्या चळवळ पुढे नेण्यात आपण अपयशी का ठरत आलो हे लिहिताना त्यांच्या मनाची कारुण्याची किनार दिसते.कमीत-कमी शब्दांत,लहान-सहान वाक्यांत १०-१२ओळींचा आशय असलेले वाक्य लिखाणात आणि भाषणात असते आणि हे समजण्यासाठी माणसाला सुद्धा विशिष्ट वैचारिक उंची लागे हे १०१%खरय.गाडगेबाबांच्या ठायी कळवळा होता.आजच्या कीर्तनकारांकडे, वक्त्यांकडे कोट, चंद्रकोर,कोल्हापूरी पायात,माळा,इकडून-तिकडून सोशल मिडियावर ओढून-ताणून आणलेले म्युच्युअल मित्र,एक लाॅबी आहे पण कळवळा नाही. दोस्तहो! आपल्याच हातून प्रसिद्धीचे झेंडू चहू प्रांतात मिरविणाऱ्यांनो उसने अवसान गळून पडतेच पण समाजाप्रति कळवळा हा निर्माण करता येत नाही तो आतून पाहिजे.नुसता गुळगुळीत शब्दांचा खेळ करुन सोशल मिडियावर फाॅलोवरसला नवा प्रांत करुन देणाऱ्या स्वयंघोषित बुलंद तोफा जेव्हा "प्रबोधन"या शब्दातील "प्रबो"बाजूला ठेऊन"धन"महत्त्वाच मानतो, तेव्हा समाजापर्यंत"विचारलं"पोहचत नाही. म्हणून शुदध हेतू घेऊन गाडगेबाबांचा विचार पुढे नेला पाहिजे.यासाठी स्वतःला, स्वतःहून बुलंद आवाज समजणाऱ्यांनी, व्याख्यांत्यांनी तर हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.मानसिक, सामाजिक खडकाळ भूमी प्रबोधनाच्या नांगराने नांगरुन काढणाऱ्या या संताच वाचन नव्याने व्हाव आणि गाडगेबाबांचे सच्चे अनुयायी तयार व्हावे,जागर व्हावा,जागृती व्हावी हा लेखकाचा उद्देश प्रत्येक पानांत स्पष्ट दिसतो.दादांची लेखणी वाचकांची एकाग्रता भंगवत नाही तर टिकवून ठेवते. पुस्तक वाचनीय आहे आणि प्रेरणादायी सुद्धा..हेच सांगण्यासाठी आवर्जून केलेला हा शाब्दिक संसार आटोपता घेते.वाचकांच्या पसंतीला नक्की खरे उतरणारे पुस्तक मेंदू त विचारांची पेरणी करण्यासाठी समर्थ आहे या आशावादासह लांबलचक असलेला पोस्ट प्रपंच संपवता ना. तूर्तास मनाच्या आर्त डोहातून एवढचं की,
"सामाजिक चळवळीच्या विश्वकोशातील'प्रबोधन'या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणजे"संत गाडगेबाबा".
No comments:
Post a Comment