१४ ऑक्टोबर का विजयादशमी? - प्रा. जी. संदीप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 12 October 2021

१४ ऑक्टोबर का विजयादशमी? - प्रा. जी. संदीप

       आम्ही माणूस असून सुद्धा आम्हाला माणसासारखी वागणूक का मिळत नाही ? या एका प्रश्नाने क्रांतीचा प्रवास सुरु झाला. आम्हीही माणसे आहोत माणसासारखे जगण्याचा अधिकार आहे मग तो अधिकार आम्हाला का दिल्या जात नाही. तो अधिकार माझ्या समाजाला मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार. हा संकल्प करून डॉ.बाबासाहेबांनी आपल्या कार्याची वाटचाल सुरु केली.


       १९२६ साली मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य बनले व  १९२७ च्या दरम्यान अस्पृश्यता निवारण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ४ ऑगस्ट १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते सी.के. बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात एक ठराव पास करून घेतला. त्यानुसार "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केलेली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी दिली आहे. म्हणजेच सगळ्या नागरिकांना शासकीय संपत्तीचा वापर करण्यास अनुमती देण्यात आली. यानुसार महाडच्या नगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यासाठी खुले करण्यात आले. परंतु स्पृश्यांनी अस्पृश्यांना पाणी भरण्याची संधी दिली नाही.


      म्हणजेच हिंदू धर्माच्या नियमानुसार अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाला मज्जाव करण्यात आला होता. ही बाब बाबासाहेबांच्या लक्षात येताच अस्पृश्यांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचा निश्चय केला. त्यानुसार १९ व २० मार्च रोजी १९२७ रोजी बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली कुलाबा परिषद आयोजित करण्यात आली. यात चार ठराव पास करण्यात आले. जे हिंदू धर्मातील अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठीच्या होत्या त्यात, ०१)नोकरितील स्थान, २)स्पृश्यांनी अस्पृश्यांना त्याचे नागरिकत्वाचे अधिकार बजावण्यास मदत करावी


 ३)मृत जनावरे ज्यांची त्यांनी ओढावी, ४)स्पृश्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांना वार लावून जेवण द्यावे.


       या परिषदेच्या शेवटी सर्व सहभागी नागरिकांनी आपला मोर्चा बाबासाहेबांच्या नेतृत्वात चवदार तळ्याकडे वळवला. सर्व सहभागी आंदोलकांनी चवदार तळ्याचे पाणी पिले व आम्ही मानव असल्याची जाणीव स्पृश्यांना करून दिली. ही बातमी स्थानिकच्या स्पृश्याना कळली व त्यानंतर आंदोलकांवर हल्ला करण्यात आला. यात बरेच अस्पृश्य जखमी झाले.


      २६ जून, १९२७ रोजी अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ.बाबासाहेबानी लढा सुरु केला.  दादासाहेब खापर्डे यांच्या प्रवेश मिळवून देण्याचा आश्वासनाने हा  लढा थांबवण्यात आला. अमरावती नंतर पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर खुले करण्यासाठी पुण्यातील एम.एम.जोशी, ना.ग.गोरे, र.के.खाडिलकर, विनायक भुस्कुटे, स्वामी योगानंद यांच्यासह अन्य स्त्री पुरुषांसह बाबासाहेबांनी हा लढा १३ ऑक्टो १९२७ रोजी हा लढा सुरु केला.


      चवदार तळ्याचा सत्याग्रह, मंदिर सत्यागृहानंतर सुद्धा अस्पृश्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीत बदल झाला न्हवता म्हणून नीलकंठ सहस्रबुद्धे, गंगाधर या ब्राह्मण सहकाऱ्यांच्या सोबतीने २५ डिसेम्बर १९२७ रोजी दहनभूमी तयार करून, अस्पृश्याना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.


        या नंतर सुद्धा हिंदू धर्मातील लोकांची मानसिकता बदलत न्हवती, अस्पृश्याना अस्पृश्य म्हणूनच वागणूक दिल्या जात होती. चवदार तळे सत्यगृहाप्रसंगी घेतलेल्या निर्णयामुळं तर त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायात वाढच झाली होती.


      या स्थितीत बाबासाहेबानी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतच होते. त्यातूनच नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्यात आला. ०२ मार्च १९३० रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी निश्चित करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष केशव वर्धेकर तर सचिव म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. नाशिक येथील शंकरराव गायकवाड यांची सभासद म्हणून निवड करण्यात आली.  अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी दिलेला हा सर्वात मोठा लढा होता असे दिसून येते. या लढ्यात साधारणपणे ८००० आंदोलकांचा सहभाग होता. तत्कालीन जिल्हाधिकारी गार्डन यांनी रामकुंडावर येऊन आंदोलकांची भेट घेऊन त्यांना राममंदिर खुले करण्याचे आश्वासन दिले.


         या सर्व आंदोलनानंतर सुद्धा स्पृश्यांच्या मनातील अस्पृश्यांबद्दलची मानसिकता बदलत न्हवती. स्पृश्याना हीन आणि तुच्छतेची वागणूक देतच होते. आता पर्यंत केलेलं मंदिर सत्यागृह हे देव पावेल किंवा देव आमचं भलं करेल या उद्देशाने केलेले न्हवते तर आम्ही ही माणसे आहोत त्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्याचा अधिकार आहे, तो आमचा हक्क आहे. तो हक्क बजावण्यासाठी म्हणून हा सर्व प्रयत्न होता. पण तरीही तशी वागणूक मिळत न्हवती म्हणून येवले येथे धर्मांतरा संदर्भात घोषणा केली.


       हिंदू धर्मात राहून आम्हास मानवी वागणूक दिल्या जात न्हवती, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करून सुद्धा हिंदू मानसिकता आम्हाला सन्मान आणि मानव म्हणून वागणूक देण्यास तयार न्हवती. मग धर्मांतर हा शेवटचा पर्याय शिल्लक राहिला. मग धर्मांतर करण्याचा निर्णय स्वतः बाबासाहेबानी घेतला. तो निर्णय १९५६ साली बाबासाहेबांनी अंमलात सुद्धा आणला. ज्यामुळं आज आमचा आर्थिक, मानसिक, सामाजिक विकास होत आहे. राजकीय व सामाजिक स्तरावर आमी पूर्णपणे विकसित होऊ शकलो असतो, पण आमची वैयक्तिक अशी संस्कृती निर्माण होऊ शकली नाही. हे यामागचं मुख्य कारण आहे असं मला वाटत. मग बौद्ध म्हणून आपली एक संस्कृती नसल्यामुळंच आमचा बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतर सोहळा साजरा करण्यासंदर्भात वाद निर्माण होत आहेत. त्यात १४ ऑक्टो का अशोक विजया दशमी असा वाद निर्माण होऊन. काही उपासक १४ ऑक्टो तर काही उपासक अशोक विजया दशमी दिनी या सोहळा साजरा करतात. असं घडण्यामाग कोण कारणीभूत आहे. याचे कारण काही जण देत असतात. काही जण या वादासंदर्भात म्हणतात की, आम्हाला विचार पुढं पोहचवायचे आहेत. त्यामुळं १४ ऑक्टो ला केला काय ? किंवा अशोक विजया दशमीला केला काय ? काहीही फरक पडत नाही. दोन्ही दिनाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार उपसकांपर्यंत पोहचतो हे मह्त्वाचं आहे.


        धर्मांतर सोहळ्यासंदर्भातील दोन्ही मुद्दे पाहिले तर एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आम्ही धार्मिक स्तरावर आमचा विकास करण्यास कुठं तरी कमी पडत आहोत. (त्या धर्मास धम्म म्हणू किंवा अन्य कोणता शब्द असला तरी तो सुद्धा वापरू शकता. त्याबद्दल काहीही आक्षेप नाही.) आपला धम्म आला म्हणजे आमची संस्कृती आली. ती संस्कृती आहे का आमची ? आम्हाला हिंदू धर्माचे सण साजरे करू नका असे सांगितले जात. पण धम्मातील सर्व मानवांना एकत्रित आणणारा असा कोणता सोहळा आहे ? थकलेल्या मानवी मनाचा विरंगुळा करण्यासाठी कोणता आधार किंवा काय उपाययोजना आहेत आमच्याकडे ? प्रत्येक पौर्णिमा, बुद्धजयंती, बाबासाहेब जयंती. अशी उदाहरणे आपण द्याल. पण हे सोहळे आमच्या आयुष्यात रूढ झालेत का ? तर याच उत्तर नकारात्मक प्राप्त होते. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही धार्मिक स्तरावर करायचा सोहळा नाही तर सामाजिक स्तरावरील सोहळा आहे. पण धार्मिक स्तरावर आमचा एकही सोहळा नाही. मग असे असताना आम्ही धार्मिक स्तरावर अविकसित आहोत असं आपणास वाटत नाही का ? जिथं धार्मिक स्तरावर आमची संस्कृती विकसित नाही. तिथं १४ ऑक्टो का अशोक विजयादशमी हा वाद निर्माण होणारच.


         असा वाद असताना दोन्ही दिवशी बाबासाहेबांच्या विचारांच्या देवाण-घेवाण होते. त्यामुळं कोणत्याही दिवशी साजरा केला तर त्यात गैर काय ? असा प्रश्न करणाऱ्यां विद्वानांनी समजाला उत्तर द्यावे की, येणाऱ्या पिढीसाठी धार्मिक संस्कृती म्हणून आपण काय देऊ शकाल ? किंवा काय दिल ?  हे सोहळे साजरे करत असताना काय घडते यातून किती विचार समाजपर्यंत पोहचतात याच वास्तव सर्वाना माहित आहे. त्यामुळं आपलं अपयश झाकण्यासाठी काहीतरी मलमपट्टी करून बाजूला होण्याने आपली संस्कृती विकसित होणार नाही.


        बुद्धांची विचारसरणी ही मानवाला आनंदी जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवणारी आहे. उपासक आणि भिक्खू या दोन विभागात यातील घटक विभागलेले आहेत. भिक्खू साठी जीवनपद्धती ही खूप बंदिस्त नियमावली आहे, तर उपासकांसाठी त्यात शिथिलता देण्यात आली आहे. मग या उपसकांसाठी आपली संस्कृती निर्माण करणं हे धार्मिक अभ्यासक व बौद्ध भिक्खू वर्गाचं कर्तव्य आहे का नाही ? संस्कृती निर्माण करत असताना, त्या-त्या धार्मिक व्यक्ती प्रमुखांच्या जन्म दिवस व वर्षाला सुरुवात मानून पुढील कालगणना केली जाते. अशी काल गणना करत असताना, बौद्ध धम्मात पौर्णिमेला महत्व आहे. म्हणजेच बौद्ध संस्कृती ही चांद्रकालगननेशी निगडित राहील अस मला वाटत. म्हणजेच आमच्या कोणत्याही धार्मिक संस्कृती चा विचार केल्यास आमची संस्कृती ही चांद्रगणनेशी निगडीतच रहायला हवी. तसे असेल तर धम्मचक्र प्रवर्तन दिन सुद्धा हा तारखेनुसार नव्हे तर मग चंद्राच्या स्थितीनुसारच आम्हास साजरा करावा लागेल.


         बाबासाहेबांनी धर्मांतराची दिनांक निवडत असताना मुळात सध्या प्रचलित कालगनेनुसार दिनांक निवडली नव्हती तर तो एक प्रसंग होता. ज्या दिवशी सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध धम्म अंगीकारला/स्वीकारला होता. तो मुहूर्त(मुहूर्त यासाठी त्या काळात दिनांक हा उल्लेख न्हवता म्हणून) म्हणजे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दहावा दिवस म्हणजेच अश्विन शुक्ल दशमी. जो १९५६ मध्ये १४ ऑक्टोबर रोजी आला होता. म्हणजेच धर्मांतर करत असताना बाबासाहेबानी दिनांक निवडली न्हवती, ही बाब आम्हाला इथं लक्षात घेणे गरजेचं आहे. व त्यानुसारच आम्हाला हा धर्मांतराचा सोहळा साजरा करणे गरजेचे आहे.


        धर्मांतराचा सोहळा म्हणजे नवधर्मांतरीत किंवा आधुनिक भारतातील एक मोठी धार्मिक चळवळ आहे. ही चळवळ विकसीत करायची असेल तर दिनांक नाही तर ती तिथ महत्वाची ठरेल.


        ही बाब जर आम्ही लक्षात घेतली तर आमच्या लक्षात येते की, बौद्ध धम्माचा सूर्य कालगननेशी नव्हे तर चांद्र कालगननेशी संबंध जुळल्या जातो. मग असे असताना आम्ही १४ ऑक्टो चा अट्टाहास का धरायचा ? किंवा दोन्हीही दिवशी साजरा केला तर काय फरक पडतो हा युक्तिवाद का करायचा ? धार्मिक बाबीशी संबंधित ज्या गोष्टी आहेत. त्या चांद्रकालगननेशी संबंधित आहेत. त्यामुळं त्यानुसारच चाललो तर एक संस्कृती निर्माण होऊ शकते. तशी संस्कृती निर्माण करणं गरजेचं आहे. तसे घडत नाही म्हणूनच तर आमच्या डोक्यातून हिंदू संस्कृती नाहीशी होऊ शकली नाही. हिंदू संस्कृतला पर्याय म्हणून बौद्ध संस्कृती स्वीकारायची किंवा निर्माण करायची नाही तर मानवी विकासासाठी गरजेची बाब आहे म्हणून ही संस्कृती निर्माण करणं गरजेचं आहे.


        सामाजिक राजकीय स्तरावर जसे आम्ही अयशस्वी आहोत तसेच धार्मिक स्तरावर सुद्धा अयशस्वी ठरत आहोत. हे यावरू। लक्षात येत. त्यामुळं धम्मातील भिक्खू संघाने, विद्वान मंडळी, धार्मिक संघटनाने एक बौद्ध संस्कृती विकसित करणे गरजेचे आहे. ती जो पर्यंत निर्माण होत नाही. तोपर्यंत आमच्या आचरणात बौद्ध तत्वज्ञान येऊ शकत नाही. हिंदू धर्म जरी त्यागाला तरी हिंदू संस्कृती त्यागली नाही. त्या संस्कृतीचा त्याग करायचा असेल तर आम्हाला पर्यायी बौद्ध संस्कृती द्यावीच लागेल. आपली म्हणावी अशी बौद्ध संस्कृती नही म्हणून हे सर्व वाद वाढत आहेत. येणाऱ्या पिढीला काही देणं ही आमची जबाबदारी आहे. मग ही जबाबदारी लक्षात घेऊन आपण यावर काम करावं आणि पूर्ण धर्मांतरितांना नवं संस्कृतीच्या मार्गावर नेणं कितपत गरजेचं आहे. हे जाणून घेऊन कामाला लागाव.


      येणाऱ्या काळात धार्मिक बाबीमध्ये कोणत्याही प्रकारचा तिथ का दिनांक हा वाद निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. १४ ऑक्टोबर चा मुद्दा इथंच थांबवून अश्विन शुक्ल दशमी(अशोक विजया दशमी) लाच हा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा साजरा व्हावा. प्रत्येक बौद्ध व्यक्तीच्या मनात बौद्ध संस्कृती रुजवावी. ज्यातून बौद्ध धम्मसंस्कृती म्हणून रुजण्यास सुरुवात होईल आणि या असल्या वादाला पूर्णविराम मिळेल.


- प्रा . जी.संदीप (गोणार,नांदेड)

No comments:

Post a Comment

Pages