किनवट, दि.25 (प्रतिनिधी) : उन्हाळी हंगाम 2021-22 साठी राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसार अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उपअभियानात भुईमूग बियाण्यासाठी ग्राम बिजोत्पादन अंतर्गत अनुदानावर जिल्ह्याला 500 क्विंटल भुईमुगाचे बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यापैकी 50 क्विंटल बियाणे किनवट तालुक्यासाठी उपलब्ध झालेले असून, सध्या तालुकानिहाय बियाणे वाटप होत असल्याची माहिती येथील तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी दिली.
भुईमूग बियाण्यांची विक्री बियाणे महामंडळ म्हणजेच महाबीजतर्फे विक्रेते व उपविक्रेत्यांमार्फत सुरू आहे. या योजनेमध्ये भूईमूग पिकात ‘टॅग-24’ या वाणाचे बियाणे शेतकर्यांना दिले आहे. 20 किलो भुईमूग बॅगची मूळ किंमत 3 हजार 300 रुपये आहे. यावर 1 हजार 400 रुपयाचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना अनुदानित किंमत 1 हजार 900 रुपये प्रति बॅग असून, प्रत्येक शेतकर्याला जास्तीत जास्त दोन बॅग देण्यात येणार आहेत. जिल्ह्यासाठी भुईमूग पिकाचे 500 क्विंटल बियाण्याचे लक्षांक कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झाले आहे. या योजनेत उपलब्ध मात्रेमधून एका शेतकर्याला एक एकर क्षेत्राच्या मर्यादेत सातबारा, आठ-अ व आधार कार्ड, जातीच्या दाखल्याची प्रत देऊन महाबीजच्या वितरकांकडून बियाणे खरेदी करता येईल. किनवट तालुक्यासाठी प्राप्त 50 क्विंटल बियाण्यापैकी 30 क्विंटल बियाणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकर्यांसाठी राखीव आहे. प्रथम प्राधान्य या प्रमाणे बियाणे उपलब्ध असेपर्यंत शेतकर्यांना अनुदानित दराने पुरवठा करण्यात येणार आहे. किनवट शहरात राकोंडे कृषी सेवा केंद्र व महेश कृषी सेवा केंद्र आणि सारखणी येथे शिवकृपा कृषी सेवा केंद्रात सदरील भुईमूग बियाणे अनुदानित दराने मिळतील, अशी माहिती तालुका कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे.
सध्या तालुकानिहाय उपलब्ध झालेले बियाणे (क्विंटलमध्ये)
कंधार 160, किनवट 50, माहूर 30, नांदेड 20, बिलोली 20, लोहा 20, मुदखेड 20, नायगाव 20, अर्धापूर 10, भोकर 10, धर्माबाद 10, देगलूर 10, उमरी 10
No comments:
Post a Comment