'काहूर’ मध्ये आदिवासींच्या भाकरीचा संघर्ष : डॉ.विवेक मवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 24 January 2022

'काहूर’ मध्ये आदिवासींच्या भाकरीचा संघर्ष : डॉ.विवेक मवाडे

किनवट, ता.24 (बातमीदार)  : दुःख, दैन्य, दारिद्र्य व अज्ञान यामुळे विकासापासून कोसो दूर असलेल्या आदिवासींच्या हातावर मीठ-भाकरी  भेटणं मुश्कील असतं. ह्याच भाकरीचा संघर्ष  त्यांनी आपल्या  काव्यसंग्रहातून रेखाटला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विवेक मवाडे यांनी केले.

           येथील जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूल मधील संत तुकाराम महाराज सभागृहात रामस्वरूप लक्ष्मण मडावी यांच्या ‘काहूर’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून तेलंगणातील प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर, महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अ‍ॅड. मुकुंदराज पाटील, मुख्याध्यापक मोहन जाधव, निवृत्त पोस्ट मास्तर दौलतराव कोवे व कवि रामस्वरूप मडावी, पुष्पा मडावी हे  मंचावर उपस्थित होते. पुढे डॉ.मवाडे म्हणाले की,  मराठी साहित्यात विविध साहित्य प्रवाह आपली कैफियत मांडत पुढे आले आहेत. आंबेडकरवादी साहित्य, आदिवासी साहित्य, विद्रोही साहित्य, जनवादी, स्त्रीवादी, श्रमिकांचे साहित्य असे विविध साहित्य प्रकार आपल्या समस्या,  विधानांना मांडण्यासाठी निर्माण झाले आहेत. यामुळेच विद्रोह आणि हक्काची भाषा ही साहित्यातून उमटते. रामस्वरूप मडावी यांनी ‘काहूर’ काव्यसंग्रहातून जीवनाच्या व समाज व्यवस्थेच्या विविध अंगांना साकारलं आहे.

       प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश मुनेश्वर यांनी आभार मानले. प्रारंभी महानायकांच्या प्रतिमा पूजनानंतर वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी स्वागत गीत गाईले.

No comments:

Post a Comment

Pages