किनवट तालुक्यात गत चार वर्षात 43 शेतकरी आत्महत्या ; केंद्र व राज्य सरकारच्या उपाययोजनेनंतरही शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 11 February 2022

किनवट तालुक्यात गत चार वर्षात 43 शेतकरी आत्महत्या ; केंद्र व राज्य सरकारच्या उपाययोजनेनंतरही शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच

किनवट,दि.11 (प्रतिनिधी) :  केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकर्‍यांची  सामाजिक व आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी बहुविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचा दावा केला जात असला तरी, किनवट तालुक्यात गत चार वर्षात तब्बल 43 शेतकर्‍यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळले आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.


   गत चार वर्षापासून सातत्याने कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पिडल्या जात आहे.  त्यातून सावरतांना कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी आलेला कर्जबाजारीपणा आणि काही वेळा चांगले पीक हाती आल्यानंतरही बाजारपेठेत अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदील होत आहे. यातूनच तो टोकाचे पाऊल उचलतो. अशा परिस्थितीत  घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे त्याच्या पश्चात कुटुंबाची अवस्था दयनीय होत असल्याचे चित्र पहावयास मिळतेय.


   शेतकरी आत्महत्या नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येतात. त्यामध्ये विशेष पॅकेज, अनुदानावरील निविष्ठा वाटप, फळ लागवड, कर्जमाफी, शेतीपूरक व्यवसायासाठी अनुदान अशा बाबींचा समावेश आहे. मात्र या सर्व उपाययोजना कुचकामी ठरल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरून सिद्ध होत आहे. सन् 2020 मध्ये राज्यात 2 हजार 547 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. गतवर्षीही राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच होते. जानेवारी ते नोव्हेंबर 2021 या  11 महिन्याच्या कालावधीत सुमारे अडीच हजारपेक्षा जास्त शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे.


         किनवट तालुक्यात 2018 मध्ये 13 शेतकर्‍यांनी आपले जीवन संपविले असून, त्यातील अकरा शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीसाठी पात्र ठरले असून, बाकी दोन शेतकरी शासन निकषात न बसल्याने अपात्र ठरलेत. पुढे 2019 मध्ये 09, 2020 मध्ये परत 09 तर 2021 मध्ये 12  मिळून गत तीन वर्षात 30 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. सुदैवाने आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देण्यासाठी जी शासकीय मदत देण्यात येते त्यासाठी सर्वचजण पात्र ठरले असून, धनादेशाद्वारे मदत पोहचविण्यात आली आहे.


       1997 नंतर शेतकरी आत्महत्येच्या घटना चर्चेत आलेल्या आहेत. त्यानंतरही शेतकर्‍यांना धोरणात्मक पाठिंबा देणारे निर्णय अजूनही झालेले नाहीत, असा शेतकर्‍यांचा आरोप आहे. वातावरणातील बदलाचे मोठे आव्हान शेती क्षेत्रासमोर आहे. सातत्याने ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, गारपीट व याच्या परिणामी कीड-रोग वाढीस लागले आहेत. कोरडवाहू पिकास एकरी 15 ते 20 हजार तर ओलितात 25 ते 40 हजार रुपयांचा खर्च होतो. इतका खर्च करूनही उत्पादन व  उत्पन्न याची शाश्वती नाही. बाजाराची अनिश्चितता, कमी हमीभाव व विमा कंपन्यांची नफेखोरी अशी अनेक कारणे शेतकर्‍यांच्या नुकसानीसाठी कारणीभूत आहेत.


       प्राप्त झालेल्या माहितीनुसार किनवट तालुक्यात गत वीस वर्षातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी पुढील प्रमाण असून कंसातील आकडा आत्महत्येची संख्या दर्शवितो: 2002 (01),2003(05),2004(12), 2005(04), 2006(16), 2007(14),2008(12),2009(12),2010(06), 2011(08), 2012(14), 2013(25), 2014(26), 2015(32), 2016(29), 2017(12), 2018(13),2019(09), 2020(09), 2021 (12).


 “ निसर्गाची अवकृपा व शासनाच्या चुकीच्या धोरणमुळे   शेती सध्या बिनभरवशाचा  व्यवसाय ठरत आहे. जगाच्या पोशिंद्याला स्वस्त धान्य दुकानावर रांगेत उभे राहून ‘अन्न सुरक्षा धान्य’ विकत घ्यावे लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर, चिंता व चिंतन करायला  लावणारी आहे.”

No comments:

Post a Comment

Pages