किनवट तालुक्यातील सर्व जलप्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के मुसळधार पाऊस व अतिवृष्टीची करामत; केवळ पावणेदोन महिन्यात सर्वप्रकल्प तुडुंब - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 29 July 2022

किनवट तालुक्यातील सर्व जलप्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 100 टक्के मुसळधार पाऊस व अतिवृष्टीची करामत; केवळ पावणेदोन महिन्यात सर्वप्रकल्प तुडुंब

किनवट,दि.29 (प्रतिनिधी) : पाटबंधारे विभागाच्या किनवट उपविभागांतर्गत येणार्‍या पाणलोट क्षेत्रातील एकूण 21 सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने लबालब भरले असून, ओव्हर फ्लो झाल्यामुळे सांडव्यावरून पाणी वहात आहे. जुलै महिन्यातील तालुक्यातील मुसळधार पाऊस व सहा वेळेसच्या अतिवृष्टीमुळे किनवट तालुका पाणीदार झाला आहे.  सद्यपरिस्थितीत एकूण 21 जलप्रकल्पांतील पाण्याचा उपयुक्त साठा 61.42 दशलक्ष घनमीटर असून, त्याची टक्केवारी 100 एवढी आहे. यंदा पावणेदोन महिन्यातच वार्षिक सरासरीच्या 75.33 टक्के पाऊस झालेला आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता असल्यामुळे, जलप्रकल्पांतील पाण्याचा साठा कायम राहून रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी टंचाई भासणार नाही, असे चित्र आहे.


     किनवट तालुक्यात नागझरी,लोणी व डोंगरगाव येथील तीन मध्यम प्रकल्प, सिरपूर व मांडवी येथील दोन बृहत लघु तलावाशिवाय इतर 13 लघु तलाव व 3 साठवण तलाव आहेत. तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान  पूर्वी 1 हजार 240 मी.मी. होते. हवामान विभागाने तालुक्यातील बर्‍याच वर्षांच्या वार्षिक पर्जन्यमानाचा अभ्यास करून,  2020 पासून किनवट तालुक्याचे जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1 हजार 63.09 एवढे निश्चित केलेले आहे. तालुक्यात 1 जून पासून आजपर्यंत पडलेला एकूण पाऊस 7 हजार 207.5 मि.मी. एवढा असून, त्याची एकूण सरासरी 800.83 मि.मी. आहे. जो की उपरोल्लेखित वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या 75.33 टक्के पाऊस झालेला आहे.


   आजमितीस तालुक्याच्या सर्व प्रकल्पांतील प्रत्यक्षातील उपयुक्त जलसाठ्याची  आकडेवारी दशलक्ष घनमिटर मध्ये पुढील प्रमाणे असून, कंसातील आकडे त्याची टक्केवारी दर्शवितात. नागझरी-6.57 (100),लोणी-8.38(100), डोंगरगाव- 8.81 (100), सिरपूर बृहत- 4.18 (100), मांडवी बृहत-5.14 (100), कुपटी- 1.30 (100), मूळझरा-1.81(100), थारा-0.86(100), निचपूर-2.20(100), जलधारा-1.87(100), सिंदगी-1.59(100), हुडी-1.57(100), पिंपळगाव(कि.)-2.17(100), नंदगाव- 1.50(100), अंबाडी-0.814(100), दरसांगवी-2.69(100), पिंपळगाव(भि.)-2.28(100), सावरगाव-1.31(100),  निराळा सा.त.- 2.26(100), लक्कडकोट सा.त.-1.814(100), सिंदगी सा.त.-2.314(100)


  गतवर्षीसारखेच यंदाही  पर्जन्यमान कमी काळात थोड्या जास्तच तीव्रतेने कोसळल्यामुळे लवकरच सर्वच जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा क्षमतेइतका पूर्णत: भरल्या गेलेला आहे.  खरीपासह रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी पुरेल म्हणून शेतकरी वर्ग समाधानात आहे. मात्र इस्लापूर,जलधरा व शिवणी मंडळामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे त्या भागातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. कमी-जास्त प्रमाणात तालुक्यातील सर्वच भागातील शेतीपिके अतिपावसामुळे चिबडून गेलीत, तसेच जमीन खरडल्यानेसुद्धा पिके हातची गेलीत. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून, आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गासह सर्वच राजकीय पक्षांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages