किनवट,दि.09 : देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर 1 जुलै 2022 पासून बंदी घालण्यात आली असून, यामध्ये प्लास्टिक कटलरीसह एकूण 19 वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर किनवट नगरपरिषदेमार्फत प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांच्या नेतृत्वात उपद्रव शोध पथक स्थापन करण्यात आले असून, पथकाद्वारे एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिक बाबत प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
यासंदर्भात पालिका पथकाने एक जुलैपासून शहरातील सिंगल यूज प्लास्टिक वापरल्या जाण्याची शक्यता असलेल्या भाजी व फळविक्रेते,रेस्टारंटस्, बार, भोजनालय, मटन व मच्छी मार्केटसारख्या विविध क्षेत्रातील आस्थापनांना भेटी देऊन तपासणी केली असून, 373 व्यावसायिकांना या संदर्भात नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. तसेच सूचना देऊनही प्लास्टिक वापरणार्या सात व्यावसायिकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे.
सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजे, प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो. त्या वस्तूंचा एकदा वापर केल्यानंतर फेकून द्यायच्या असतात. जर या वस्तूंचा वापर सातत्यानं केला, तर मात्र त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. तसेच, यामुळे आरोग्यालाही हानी पोहोचण्याचा धोका संभवतो, म्हणून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं यावर बंदीचा निर्णय घेतलेला आहे.
प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (75 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या), प्लास्टिक स्टिक असणारे ईअर बड्स, फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक,कँडी स्टिक, आइसक्रीम स्टिक, थर्माकोल (पॉलिस्ट्रिन),प्लास्टिकच्या प्लेट, कप, ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रा, ट्रे, मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद, इन्विटेशन कार्ड, सिगरेटचं पॅकेट, 100 मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनर, स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणार्या गोष्टी) आदी वस्तूंचा यात समावेश आहे.
व्यावसायिक सिंगल यूज प्लास्टिकचा पहिल्यांदा वापर करत असेल, तर त्यास पाच हजार रुपये, दुसर्या वेळी आढळल्यास दहा हजार रुपये आणि तिसर्यांदा आढळल्यास 25 हजार रुपये दंड आणि तुरुंगवास दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा (इपीए) कलम 15 अंतर्गत एकेरी वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या वापरावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
किनवट नगरपरिषदेच्या उपद्रव शोध पथकामध्ये चंद्रकात दुधारे यांच्या नेतृत्वात पा.पू.अभियंता अशोक भालेराव, विद्युत अभियंता विनोद पवार, क्षेत्रिय अधिकारी अतिकउल्लाखान व तौफिकखान,गणेश सिंह ठाकूर, शेख रियाज आदी पालिका कर्मचार्यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment