किनवट येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करा;अभिवक्ता संघाची मागणी
किनवट,ता.२०(बातमीदार) : येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयास मंजुरी मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, या आशयाचे निवेदन अभिवक्ता संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार भीमराव केराम व खासदार हेमंत पाटील यांना नुकतेच देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, किनवट हा आदिवासी अतिदुर्गम, डोंगराळ व नक्षलप्रवण तालुका आहे.या तालुक्याचे जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर १५० कि.मी.इतके आहे.
तालुक्यात किनवट,इस्लापूर, मांडवी व सिंदखेड ही चार पोलिस ठाणे आहेत.तसेच पाच वनपरिक्षेत्र कार्यालये आहेत. याबरोबरच 'एफडीसीएम,'चे वन विभागीय प्रकल्प कार्यालय आहे.तालुक्याचे मुख्यालय असलेल्या किनवट शहरात निझाम काळापासून न्यायालय आहे.
सध्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कामासाठी तालुक्यातील जनतेला नांदेड येथे जावे लागते.यामुळे नागरिकांचा भरपूर वेळ व पैसा खर्च होतो. तालुक्यातील जनतेची आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे.या सर्व पार्श्वभूमीवर किनवट येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय होणे गरजेचे आहे.
निवेदनावर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॕड.अरविंद चव्हाण,सचिव अॕड.पंकज गावंडे, सहसचिव अॕड बी.पी.पवार,कोषाध्यक्ष अॕड.एस.एम.येरेकार,माजी उपाध्यक्ष अॕड.एम.यु. सर्पे
यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, उपरोक्त मागणी घेऊन आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सदरील मागणी मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे तालुका प्रमुख व नगर परिषदेचे सभापती व्यंकट भंडारवार यांनी अभिवक्ता संघाला दिली आहे.
No comments:
Post a Comment