किनवट तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस ; शिवणी मंडळात अतिवृष्टी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 12 July 2022

किनवट तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस ; शिवणी मंडळात अतिवृष्टी

किनवट,दि.11 (प्रतिनीधी) :  तालुक्यात  रविवारी (दि.10) सकाळपर्यंतच्या 24 तासांत खर्‍या अर्थाने मान्सून सक्रिय झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालुक्यातील एकूण नऊ मंडळात दमदार पाऊस बरसला असून, शिवणी मंडळात सर्वात जास्त मुसळधार पाऊस कोसळल्याने तिथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यातील नऊ मंडळातील एकूण पाऊस 449.80 मि.मी.झाला असून, त्याची सरासरी 49.98 अर्थात 50 मिलिमीटर आहे.  पैनगंगा दुथडी भरून वहात असल्यामुळे, काठालगतच्या शेतात पाणी शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे कळते. पूर परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून सर्व विभाग सतर्क झाले आहेत.

रविवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून,  कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 58.3 (327.4 मि.मी.); बोधडी- 58.3(403.3 मि.मी.); इस्लापूर- 50.0(490.0 मि.मी.); जलधरा- 48.0 (417.1 मि.मी.); शिवणी- 102.5 (475.9 मि.मी.); मांडवी- 24.8(252.6 मि.मी.);  दहेली- 24.8 (251.0 मि.मी.), सिंदगी मो. 58.3 (253.4 मि.मी.); उमरी बाजार 24.8 (280.4 मि.मी.).

  तालुक्यात जुलैच्या पहिल्या दिवसापासूनच दररोज हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यात काही भागात दमदार कोसळलेल्या पावसामुळे पहिली अतिवृष्टी जलधरा मंडळात, दुसरी इस्लापूर मंडळात तर आजच्या नोंदीनुसार तिसरी अतिवृष्टी शिवणी मंडळात झालेली आहे. तालुका सध्यातरी पाणीदार झाला असून, अतिवृष्टीमुळे कुठे जिवित हानी झाल्याची बातमी सध्यातरी नाही. मात्र, किनवट पासूनच जवळच असलेल्या कोठारी नाला पावसामुळे तीन दिवसापासून दुथडी भरून वहात असल्यामुळे वाहतूक तीन दिवसापासून बंद असून, त्या भागातील  शनिवारपेठ, मदनापूर,भुलजा,पार्डी बु, येंदा-पेंदा एकूण बारा गावाशी गेल्या तीन  दिवसापासून संपर्क तुटला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 3,151.1  मि.मी.असून, त्याची सरासरी 350.12 मि.मी.येते.  आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस इस्लापूर मंडळात झाला असून, सर्वात कमी दहेली मंडळात झालेला आहे. तालुक्यात रविवार 10जुलै पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस  285.4  मि.मी.असून, त्या तुलनेत 122.68 टक्के पाऊस पडलेला आहे. जो की,  समाधानकारक आहे.

     01जून ते 30 सप्टेंबर या चार महिन्यादरम्यान तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस 951.90  मि.मी. असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 36.78 टक्के पाऊस पडलेला आहे. तसेच 01 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस 1026.58 मि.मी.असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 34.10 टक्के पाऊस पडलेला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत पडलेला पाऊस  375.90 मि.मी.पडला होता.  30 सप्टेंबर पर्यंतच्या वार्षिक पावसाच्या तुलनेत  त्याची टक्केवारी 131.71 होती.

No comments:

Post a Comment

Pages