औरंगाबाद, दिनांक 04 : देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाले. हा अमृत महोत्सव विविध नवोपक्रमांनी उत्साहात साजरा करावा. प्रत्येक दिवशी नवनवीन संकल्पना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.
खुलताबाद तहसील कार्यालयात आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत 09 ते 17 मध्ये स्वराज उत्सव, 13 ते 15 कालावधीत घरोघरी तिरंगा ध्वज वंदन याबाबत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी संगीता सानप, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, नंदकिशोर भोंबे आदींसह तालुक्याचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
स्वराज उत्सव 09 ते 17 ऑगस्ट दरम्यान होत आहे. सामुदायिक राष्ट्रगान 09 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात तालुक्यात साजरा करण्यासाठी सर्व यंत्रणेने पुढाकार घ्यावा. देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना इतिहासावर चित्र प्रदर्शन, शालेय, महाविद्यालयीन स्तरावर निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, ऐतिहासिक वारशा स्थळांची स्वच्छता, बालगोपाळ पंगत, महिला मेळावा, बस स्थानकावर पथनाट्य, डिजिटल व्यवहार जागृती आदी प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवावेत आदी प्रकारच्या सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या. दैनंदिन कामकाजात गुणवत्ता वृद्धीवर भर द्यावा, असेही अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. बैठकीनंतर उपविभागीय अधिकारी विधाते यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment