यंदाच्या बैलपोळ्यावर ओल्या दुष्काळाचे सावट सजावटीच्या साहित्याच्या दरात दीडपटीने वाढ; ग्राहक फिरकेना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 24 August 2022

यंदाच्या बैलपोळ्यावर ओल्या दुष्काळाचे सावट सजावटीच्या साहित्याच्या दरात दीडपटीने वाढ; ग्राहक फिरकेना

किनवट, दि.24,(प्रतिनिधी) : बळीराजासाठी आनंदाची पर्वणी असलेल्या ‘बैलपोळा’ सणानिमित्ताने किनवट शहरातील बाजारपेठ सजली आहे. बळीराजाचे दैवत आणि शेतीत राबणार्‍या बैलांना सजविण्यासाठी आवश्यक साहित्यांच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत सव्वा ते दीडपटीने वाढ झाली आहे. सततचा पाऊस,अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे तालुक्यात ओल्या दुष्काळाचे सावट असल्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकर्‍यांना वाढत्या महागाईत बैलपोळ्याचा सण कसा साजरा करावा, हा प्रश्न पडला आहे. परिणामी, दोन दिवसांवर सण येऊनही बैलांना सजविण्यासाठी लागणार्‍या साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांची फारशी गर्दी दिसत नाही.


       दरवर्षी श्रावण मासाची समाप्तीच्या अमावस्येदिवशी येणारा हा ‘बैलपोळा’ सण यावर्षी सुद्धा त्याचा मुहूर्तावर आला आहे. आधुनिकतेमुळे शहरी भागातील बैलपोळ्याचे महत्त्व कमी होत चालले तरी ग्रामीण भागात हा सण शेतकरी, सामान्य नागरिक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या सणानिमित्ताने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर दुकाने थाटण्यात आली आहेत. महाराजा व महाराणी गोंडा, काळा कंठा, कमरी, मटाटी, गजरा, घुंगर माळा, कवडी माळा, मणीमाळा,काचमणी, प्लास्टिकचे आकर्षक गोंडे, शेंबी गोंडे, घागरमाळ, हिंगूळ, घुंगरू, झालर, दोरी, नाथे, गेठे, मोरखी, कवळी आदी सजावटीच्या वस्तू, झुला, बाशिंग, सूत दोरी, नॉयलॉन दोरी अशा साहित्यांसह बैलांची शिंगे रंगविण्यासाठी आवश्यक असलेले विविध कंपन्यांचे वॉर्निश, बेगड, झुली अशा साहित्यांनी गेल्या आठ दिवसापासून बाजारपेठ सजली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बैलपोळ्यासाठी लागणार्‍या सर्वच साहित्याच्या दरात दीडपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. सतत गत तीन वर्षापासून अतिवृष्टी होत असल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यासमोर यंदाही ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीमुळे आर्थिक समस्या तयार  झाली आहे.  दरम्यान, सध्याच्या ट्रॅक्टर वा आधुनिक यंत्राद्वारे शेती करणार्‍या शेतकर्‍यांकडे बैल नाहीत. त्यामुळे गावोगावच्या बैलपोळा सणाचा थाट सध्या दिसत नाही. चाराटंचाईमुळे अनेकांनी ‘सर्जा-राजा’ला बाजाराची वाट दाखविल्याची वस्तुस्थिती आहे.


    पंधरा दिवसापूर्वी आम्ही रक्षाबंधनानिमित्त राख्यांची दुकाने थाटली होती. त्यातही थोडाफार घाटाच झाला. यंदा पोळ्यासाठी शेतकरी जास्त किंमतीचे साहित्य खरेदी करण्याऐवजी कमी किंमतीचे लहान साहित्य खरेदी करीत असून, ते सुद्धा तुरळक प्रमाणात असल्याचे, दिगंबर गायकवाड, रवी जैन,शेख अहेमद, गजानन इंगलवार, किशन कवडे, रामनाथ आदी साहित्य विक्रेत्यांनी आम्ही शेतकरी ग्राहकांच्या प्रतीक्षेत असून, यंदाही शेतकर्‍यांकडे पैसा नसल्यामुळे पोळ्याच्या साहित्यातही नुकसान होण्याची भिती व्यापार्‍यांनी व्यक्त केली.  दरम्यान, तालुक्यात तब्बल सहा वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून बाधितांना थोडी जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.


“निसर्गातील वृक्ष, वेली, प्राणी, डोंगर, नदीची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे. ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते. हिंदु संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच वन्यजिवांना देखील पूजनीय मानल्या जातं. वर्षभर शेतात शेतकर्‍यांसमवेत बरोबरीने राबणार्‍या बैलांप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून पोळा या सणाकडे पाहिल्या जाते.  सतत कष्ट करणार्‍या आपल्याच पाळीव बैलांचा हक्काच्या विश्रांतीचा एक दिवस व त्यांच्याप्रती कृतज्ञता व प्रेम व्यक्त करण्याचा हा सण आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण सीमावर्तीभागात व कर्नाटकात बैलपोळ्याला ‘बेंदूर’ तर काही भागात ‘कुरुनुर्नामी’ असे म्हणतात. ज्यांच्याकडे बैलं नाहीत ते पोळ्याला मातीच्या बैलाची पूजा करतात.”

No comments:

Post a Comment

Pages