महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' प्रदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 5 September 2022

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' प्रदान

नवी दिल्ली, 05  : महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू  यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. यामध्ये  मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्याप‍िका कविता सांघवी,  बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील  जिल्हा परिषद, क्लस्टर प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके यांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.


      येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार'  वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी राष्ट्रपती, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपुर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह, अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्रशिक्षण ) राकेश रंजन,  यासह वर‍िष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.


   याप्रसंगी देशभरातील एकूण 45 शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ने गौरविण्यात आले. यामध्ये 18 महिला शिक्षक, 1 दिव्यांग उर्वरित पुरूष शिक्षक आहेत. राज्यातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे. मानचिन्ह व प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

 मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल शाळेच्या मुख्याध्यापिका कविता सांघवी या  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळावा, यासाठी वेगवेगळे प्रयोग प्रत्यक्ष राबवितात. यासह वर्ष 2020 मध्ये ‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणा’ची घोषणा करण्यात आली.  प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना हे कसे  उपयोगी ठरेल यावर त्या भर देतात. श्रीमती सांघवी  यांनी 'ग्लोबल आउटलुक' नावाचा स्टीम-आधारित अभ्यासक्रम तयार केलेला आहे. त्या उत्तम प्रशासकही आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील या नाविण्यपूर्ण कामाची दखल घेत त्यांना आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील  जिल्हा परिषद,  क्लस्टर प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके यांनी लोकसहभागातून शाळेसाठी 15 लाख रूपयांपेक्षा अधिक निधी उभारून शाळेचा कायापालट केला. शाळेच्या भौतिक सुविधेत वाढ झाली, शाळेत रेकॉर्डिंग स्टुडियो, म्युझिक स्टुडियो उभे केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळू लागला. विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकसित व्हावेत यासाठी रोबोटीक, कोडींग, ड्रोन संदर्भातील प्रशिक्षण  विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान अर्जित करीत नसून ते जीवनाचे ज्ञान अर्जित करण्यावर भर देत असल्याचे  श्री वाळके त्यांनी सांगितले. श्री वाळके यांनी त्यांना मिळालेला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारामंध्ये सर्वांचा वाटा असल्याचे व्यक्त केले.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामुनाईकतांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक शशिकांत कुलथे हे ज्या शाळेत शिकवितात त्या शाळेतील बहुतेक विद्यार्थी हे बंजारा समाजातील आणि ऊसतोड़ कामगारांच्या कुटूंबातील आहेत. स्थालांतर‍ित कुटूंबातील विद्यार्थी या शाळेत शिकत असल्यामुळे श्री कुलथे यांनी या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह तयार केले. शाळेमार्फत येथील विद्यार्थ्यांना जेवण पुरविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गळती शुन्यावर आलेली आहे. या शाळेत येणा-या बहुतेक विद्यार्थ्यांची भाषा ‘गोलमाटी’ असल्याने त्यांना प्रमाण मराठी भाषा यावी यासाठी गोलमाटी आणि मराठी भोषेचे सचित्र पुस्तकाचे लेखन करून बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे येण्याचा प्रयत्न श्री कुलथे यांनी केला. यासह ते संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कवितेत गोडी निर्माण करण्याचा प्रयत्नही करतात. आज शाळेतील विद्यार्थी मराठी, इंग्रजीतून  आयसीटी, जॉयफुल शिक्षण प्रणाली अंतर्गत येणारे उपक्रमांमध्ये मोठया उत्साहाने सहभागी होत असल्याचे श्री कुलथे यांनी यावेळी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Pages