मान्यताप्राप्त पक्ष आणि निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी रिपब्लिकन पक्षात व्यापक संघटनात्मक बांधणी सुरू - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 12 September 2022

मान्यताप्राप्त पक्ष आणि निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी रिपब्लिकन पक्षात व्यापक संघटनात्मक बांधणी सुरू - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 12 - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) हा पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष असून आगामी काळात रिपब्लिकन पक्षाला मान्यताप्राप्त पक्ष करून निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करून सर्व जाती धर्मीयांना सोबत घेऊन व्यापक  संघटनात्मक बांधणी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत उगवता सूर्य ही रिपब्लिकन पक्षाची निवडणूक निशाणी पुन्हा मिळविण्याचा रिपब्लिकन पक्षाचा प्रयत्न असून उगवता सूर्य तसेच मशाल आणि तराजू या चिन्हांपैकी एक  चिन्ह रिपब्लिकन पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून मिळू शकेल. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला 2 उमेदवार आणि विधानसभा निवडणुकीत 13 उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार आज रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारीणी च्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली आहे. 


आगामी महापालिका; जिल्हा परिषदा पंचायत समिती आदी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या सोबत युती करून लढण्याचा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकरिणी च्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे. 


 राज्यात अत्यंत प्रतिष्ठेची असणारी मुंबई महापालिकेची सत्ता आगामी निवडणुकीत भाजप ; शिंदे गट आणि रिपब्लिकन पक्ष निश्चित काबीज करील असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला. मुंबईत मराठी दलितांसह गुजराती उत्तर भारतीय ;  दक्षिण भारतीय अन्य राज्यांतून आलेले दलित हे रिपब्लिकन पक्षासोबत मोठया प्रमाणात आहेत.मुंबईत शिवसेनेला एकनाथ शिंदे गटामुळे मोठा धक्का बसला आहे.राष्ट्रवादी ची ही मुंबईत ताकद कमी आहे.त्यामुळे भाजप शिंदे गट आणि रिपब्लिकन पक्षाच्या युती ला आगामी निवडणुकीत मुंबईची सत्ता काबीज करता येईल. 150 जागा जिंकण्याचे भाजप चे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी रिपाइं भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला सर्व ताकदीने साथ देईल. त्यासाठी मुंबई मनपा निवडणुकीत रिपाइं ला किमान 25 जागा देण्यात याव्यात आणि रिपाइं ला उपमहापौर पद देण्यात यावे  अशी रिपाइंतर्फे भाजप कडे मागणी करण्यात येणार आहे.अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे. 


लोणावळा येथील वळवण व्हिलेज रिसॉर्ट येथे रिपाइं च्या राज्य कार्यकारीणी ची बैठक घेण्यात आली त्यात विविध ठराव मंजूर करण्यात आले तसेच रिपाइं राज्य कमिटी ची निवड करण्यात आली.यावेळी रिपाइं चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजभाऊ सरवदे; कार्याध्यक्ष बाबुराव कदम; सरचिटणीस गौतम सोनवणे; माजी आमदार सुमंतराव गायकवाड; माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


केवळ दलित आणि बौद्धांच्या मतांवर राजकारण करणे सोपे असून निवडून येणे मात्र कठीण आहे. त्यामुळे दलित बौद्धांच्या सोबत बहूजन मराठा आणि मुस्लिम सर्व जाती धर्मीयांना सोबत घेऊन रिपाइं चे पक्ष संघटन मजबूत करावे. प्रत्येक तालुक्यात सभासद मोहीम राबवावी. तालुक्यात किमान 20 हजार सदस्य आणि जिल्ह्यात किमान 1 लाख सदस्य करणाऱ्या  तालुका आणि जिल्हा कार्यकरिणी ला मान्यता देण्यात येणार आहे. प्राथमिक सदस्य 20 रुपये आणि क्रियाशील कार्यकर्ता शंभर रुपये असे शुल्क रिपाइं तर्फे निश्चित करण्यात आले आहे.  रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकरिणी तर्फे  25 सदस्य असलेल्या वर्किंग कमिटी ची वेगळीकोअर कमिटी करण्यात येणार असल्याची घोषणा ना.रामदास आठवले यांनी केली.


 यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी लोणावळ्याचे माजी उनगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांची निवड करण्यात आली. तर पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी रिपाइं चे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड यांची निवड करण्यात आली.तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी पंढरपूर चे जितेंद्र बनसोडे यांची निवड करण्यात आली. तसेच उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी राजा कापसे; मराठवाडा प्रदेश अध्यक्ष पदी दौलत खरात ;मुंबई प्रदेश अध्यक्षपदी सिद्धार्थ कासारे;  कोकण प्रदेश अध्यक्ष पदी जगदीश गायकवाड;मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी आघाडी च्या अध्यक्ष पदी सुमित वजाळे आदी अनेकांची यावेळी निवड करण्यात आली. येत्या दि.3 ऑक्टोबर रोजी रिपाइं चा 66 वा वर्धापन दिन सोहळा  जळगाव  येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकरिणी ची बैठक येत्या दि.21 सप्टेंवर रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.



No comments:

Post a Comment

Pages