शेतकरी बांधवांसाठी प्रभावी उपक्रम राबविणार - नंदकुमार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 7 October 2022

शेतकरी बांधवांसाठी प्रभावी उपक्रम राबविणार - नंदकुमार

 औरंगाबाद,दि. 07  : कृषि आणि रोजगार हमी योजना या विभागामार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. अशा योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन रोजगार हमी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी समृद्ध शेतकरी विचारमंथन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मीना, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंदार वैद्य, कृषि सहसंचालक दिनकर जाधव, राज्य प्रशिक्षण समन्वयक नीलेश घुगे कृषि अधिकारी, कृषि सहायक यांची उपस्थिती या कार्यशाळेत होती.

 महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत रोहयो आणि कृषि विभागाचे अधिकारी यांना प्रत्यक्ष अनुभव, शेतकऱ्यांची मागणी, नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पन्नवाढ करण्यास मदत करावी. संवादाने विश्वास निर्माण करुन शेतकरी बांधवांचे जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न दोन्ही विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे नंदकुमार यांनी सांगितले. राज्यातील विविध प्रयोगशील शेतकरी, मजूर आणि जोड व्यवसाय करणाऱ्या यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथाचे दाखले देत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी हा प्रथम माणूस आहे आणि माणूस प्रगतीसाठी विविध व्यवसाय करु शकतो. यासाठी शेती बरोबरच इतर जोडव्यवसाय करण्याबाबत अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करावे असेही त्यांनी सांगितले.

 कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले म्हणाले की, शेतीसाठी पाण्याचा सुयोग्य वापर पीक पद्धतीत बदल, हवामानानुसार पीक रचना योग्य बाजारभावासाठी उत्पन्नाची साठवणूक, शेततळे इत्यादी उपाययोजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी शासनाचा कृषि विभाग विविध उपक्रम राबवित आहेत.योजना  प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी अधिकारी व कर्मचारी यांची आहे. ते काम प्रभावीपणे करावे, असे मार्गदर्शनात श्री.डवले यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Pages