ठाणे, दि. 18- मतदार यादीत नाव येण्यासाठी काय करावे लागेल, कोणता फॉर्म भरावा लागेल, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन, मतदार यादीत नावासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे करावा, नाव नोंदणी अर्ज सादर करणे ते ओळखपत्र मिळणे यादरम्यान किती वेळ लागतो, मत दिलेल्या उमेदवाराने त्या मताचा गैरवापर केला तर काय करायचे ... तरुणाईला पडलेल्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत शिंदे आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून ठाण्यातील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. समृद्ध, सुजाण व बळकट आणि पारदर्शक लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी श्री. देशपांडे यांनी केले.
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि ठाण्यातील के.ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत आयोजित लोकशाही गप्पा – भाग 7 अंतर्गत ‘कशी होते मतदार नोंदणी’ या परिसंवादात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, मतदार नोंदणी अधिकारी पवन चांडक, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अर्चना घोलप, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोषकुमार सेंद्रे आदी या परिसंवादात सहभागी झाले होते. संवादक प्रणय चव्हाण व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अभिषेक नेमाणे यांनी मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार युवराज बांगर, जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य सुचित्रा नाईक, उपप्राचार्य श्रीमती टोके, महेश पाटील, संदीप पागे, श्री. आठवले आदी उपस्थित होते.
विशेष पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजे काय, मतदार नोंदणी करणे का आवश्यक आहे, 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आगाऊ मतदार नोंदणी करता येते का अशा अनेक शंकांची उत्तरे यावेळी मान्यवरांनी दिली. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मतदार नोंदणी जनजागृतीविषयी पथनाट्य सादर केले. महाविद्यालयात उभारलेल्या मतदार नोंदणी केंद्राचे उद्घाटन श्री. देशपांडे यांच्या हस्ते झाले.
श्री.देशपांडे म्हणाले, भारताची लोकशाही व्यवस्था ही जगातील मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही टिकविण्याची व अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी ही आजच्या तरुण पिढीवर आहे. पारदर्शक निवडणुका हा या लोकशाहीचा गाभा आहे. त्यासाठी मतदार याद्या सदोष असणे आवश्यक आहे. ही यादी निर्दोष, पारदर्शक, परिपूर्ण व अधिक अचूक असावी व कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वंचित, बेघर, तृतीयपंथीय, महिला, युवक अशा घटकांच्या हातात लोकशाहीच्या नाड्या आहेत. तेच जर या प्रक्रियेच्या बाहेर असतील तर लोकशाही बळकट कशी होणार. म्हणून तरुणांना, वंचित समाजातील घटकांना प्रवाहात आणण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.
विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती अशी अनेक कामे करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत युवा, बेघर, तृतीयपंथीय, देहविक्रय करणाऱ्या महिला, भटके विमुक्त, वंचित घटकांची मतदार यादीत नोंद करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच मतदार नोंदणीसाठी आलेल्या अर्जाची तपासणीसाठी विशेष यंत्रणा राबविण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
सुदृढ व बळकट लोकशाहीसाठी या प्रक्रियेत तरुणांना सामावून घेण्यात येत आहे. महाविद्यालयांमध्ये मतदान नोंदणी केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच समाज माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येत असून मिम्स, लोकशाहीचा भोंडला असे विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त युवा वर्गाला मतदार यादीत नाव नोंदणी करता यावी, यासाठी वर्षातून चार वेळा आगाऊ नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन 18 वर्ष पूर्ण न झालेल्या तरुणांनाही नाव नोंदविता येणार आहे. मात्र, त्यांच्या नावाचा समावेश 18 पूर्ण झाल्यावर यादीत होणार असल्याचेही श्री. देशपांडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment