किनवट तालुक्यात 29 हजार 553 हेक्टरवर झाली रब्बीची पेरणी ; सरासरी पेरणी 199.68 टक्के - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 24 January 2023

किनवट तालुक्यात 29 हजार 553 हेक्टरवर झाली रब्बीची पेरणी ; सरासरी पेरणी 199.68 टक्के

किनवट. दि.२४ (प्रतिनिधी) : किनवट तालुक्यात गत पावसाळ्यात विविध महसूल मंडळात तब्बल दहा वेळा झालेली अतिवृष्टी व ऑक्टोबर अखेर पर्यंत बरसलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगाम अक्षरश: वाया गेला. त्या पाठोपाठ आलेल्या रब्बी हंगामात संथगतीने होत असलेली पेरणी पूर्ण होण्यासाठी जानेवारीचा दुसरा आठवडा उजाडला. तालुका कृषी कार्यालयाच्या रब्बीच्या अंतिम अहवालानुसार तालुक्यात  सरासरी लागवड क्षेत्राच्या 199.68 टक्के पेरणी झाली आहे.


            तालुक्याचे जून ते ऑक्टोबरपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान 1026.58 मिमी असताना प्रत्यक्षात 1,450.60 मिमी पाऊस झाला. सरासरीपेक्षा 41.30 टक्के अधिक पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके पाण्यात गेली. लाखो रुपयांचा फटका शेतकर्‍यांना या एकाच हंगामात बसला आहे. परतीच्या पावसामुळे नोव्हेंबरपर्यंत अनेक भागातील शेतात पाणी होते. त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी एक महिना विलंबानेच सुरू झाली.


     तालुक्याचे रब्बीचे  सरासरी क्षेत्र 14 हजार 800 हेक्टर आहे. त्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात 29 हजार 553 हेक्टरवर अर्थात जवळपास दुप्पट पेरणी झाली आहे. त्यात प्रामुख्याने तृणधान्यात ज्वारीची पेरणी 1 हजार 908 हेक्टर क्षेत्रावर झाली असून, त्याची टक्केवारी 104.15 आहे. गव्हाची पेरणी 5 हजार 470 हेक्टरवर झाली असून, त्याची टक्केवारी 170.67 आहे तर मक्याची पेरणी 4 हजार 834 हेक्टर झाली असून, त्याची टक्केवारी 171.62 आहे. इतर तृणधान्ये 127 हेक्टरवर पेरण्यात आले असून, त्याची टक्केवारी 171.62 आहे.


       गतवर्षी नाममात्र झालेल्या गळीतधान्याच्या पेरणीत यंदा वाढ झाली असून, यंदा करडई 5 हेक्टरवर तर तीळ 14 हेक्टरवर पेरण्यात आले; शिवाय इतर गळीत धान्य 28 हेक्टर धरून एकूण 47 हेक्टरवर तेलवर्गीय पिकांची पेरणी झालेली आहे.


   किनवट तालुक्यात रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचे पीक म्हणजे हरभरा आहे. गतवर्षी हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र 4 हजार 966 हेक्टर असतांना 16 हजार 937 हेक्टरवर अर्थात तिप्पटीपेक्षा जास्त पेरणी झाली होती. त्यावरून यंदा हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र वाढविण्यात येऊन, 8 हजार 193 हेक्टर करण्यात आले. कृषी खात्याचा अंदाज खरा ठरवीत शेतकऱ्यांनी हरभऱ्यालाच पसंती देऊन तब्बल 16 हजार 210 हेक्टरवर पेरणी केली. जी,की, दुपटीच्या जवळपास असून,त्याची टक्केवारी 197.85 आहे. इतर कडधान्याचे सरासरी क्षेत्र 78 हेक्टर असूनही केवळ 8 हेक्टरवर इतर कडधान्यांची पेरणी झालेली आहे.


    दरम्यान, यंदा रब्बी हंगामात नगदी पीक म्हणून 903 हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली असून, या व्यतिरिक्त 283 हेक्टरवर धने (कोथिंबीर) पेरण्यात आले आहेत. यंदा उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश जलप्रकल्प शंभर टक्के भरलीत. तसेच गावतळी व इतर सखल भागात अजूनही पाणी आहे. त्याचा फायदा विहीर बागायत क्षेत्राला होऊन, रब्बीत अधिक उत्पादनाची आशा आहे.


“किनवट तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने, रब्बीचे लागवड क्षेत्र वाढण्याची अपेक्षा होतीच. त्यानुसार गतवर्षीपेक्षा हरभरा पिकाचे सरासरी क्षेत्र 65 टक्क्याने वाढले असून, ज्वारी, गहू व मक्यासोबतच गळीत धान्याच्या सरासरी क्षेत्रातही वाढ झालेली आहे.”


 - बालाजी मुंडे. तालुका कृषी अधिकारी, किनवट.

No comments:

Post a Comment

Pages