'प्रथमता आणि अंतिमतः मी भारतीय' ही भावना रुजवण्यात भारतीय संविधान यशस्वी ठरले -सदाशिव गच्चे यांचे प्रतिपादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 26 January 2023

'प्रथमता आणि अंतिमतः मी भारतीय' ही भावना रुजवण्यात भारतीय संविधान यशस्वी ठरले -सदाशिव गच्चे यांचे प्रतिपादन

 नांदेड, (प्रतिनिधी)- 'प्रथमता आणि अंतिमतः मी भारतीय आहे', ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनावर बिंबविण्यात भारतीय संविधान यशस्वी ठरले आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक तथा लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी सदाशिवराव गच्चे यांनी केले.


 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेडच्या श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात आयोजित समारंभात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. विकास कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ७४व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला दीनदयाल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. देवदत्त देशपांडे,  प्रसिद्ध सोनोग्राफी तज्ञ डॉ . कैलाश धुळे, जागृती सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव आनंद भोरगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


 याप्रसंगी पुढे बोलताना सदाशिवराव गच्चे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या दोन महान विभूती होत, असे सांगितले. केवळ स्वातंत्र्य लढाच नव्हे तर स्वातंत्र्यानंतर सुद्धा चिरंतन काळासाठी भारताचे अखंडत्व कायम राहावे, यासाठी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्य वेचले, असेही यावेळी सदाशिवराव गच्चे यांनी स्पष्ट केले.


 महाविद्यालयातर्फे प्रारंभी महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. देवदत्त देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर सामूहिक रित्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातर्फे सेवानिवृत्तीबद्दल सहशिक्षक सदाशिवराव गच्चे, पीएच.डी. प्राप्त डॉ. नागराज मांजरमकर, एस.बी.आय. बँकेत पदोन्नती मिळाल्याबद्दल शंकरराव नरवाडे यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठातून पत्रकारिता पदव्युत्तर पदवी एम.जे. (एम. एस.) मध्ये सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थिनी शारदा कुलकर्णी तसेच तायक्वांदो आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला विद्यार्थी सुशांत प्रशांत ठमके आणि वुशू क्रीडा प्रकारात गुणवंत ठरलेले राहुल इंगोले आणि राहुल लोणे या विद्यार्थ्यांना याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल धुळे यांनी तर विलास वाळकीकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संजय नरवाडे, प्रा. वीपिन कदम , भारत सोनटक्के, आदित्य कुंटे, श्वेता पाटील दादींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी देविदासराव कल्याणकर, दीपक शिराढोणकर, बी.के. कांबळे आदींसह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages