‘भीम पहाट’ कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वरमयी अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 19 April 2023

‘भीम पहाट’ कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वरमयी अभिवादन

किनवट (प्रतिनिधी) :  ‘महाज्ञानाच्या महामानवाला थोर त्यागी त्या बुद्ध गौतमाला...’, ‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे ...’, !पहाट झाली प्रभा म्हणाली , भीम जयंती आली...’ अशा बहारदार गीतांच्या शास्त्रीय संगीतमय "भीम पहाट" कार्यक्रमातून संगीतप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 132 व्या जयंती निमित्त स्वरमयी अभिवादन करण्यात आले.


       येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा आणि राष्ट्रपिता जोतीराव फुले व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव शहर, तालुका समिती, सिद्धार्थनगर किनवटच्यावतीने 'आदिजन' संचलित वामनदादा कर्डक संगीत अकादमी प्रस्तुत ‘भीम पहाट’ ह्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन जयंती दिनी प्रभातकाळी करण्यात आले होते.


      ‘भीमपहाट’ ही बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांची संकल्पना असून उत्तम कानिंदे यांची निर्मिती व निवेदन आहे. ‘महाज्ञानाच्या महामानवाला थोर त्यागी त्या बुद्ध गौतमाला...’ या मिश्र रागातील प्रज्ञाचक्षू गायक अनिल उमरे यांच्या स्वरातील वंदन गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर संगीत विद्यालयाच्या प्राचार्या आम्रपाली वाठोरे यांनी यमनचे स्वर घेत ‘कुंभारा परी तू भिवा समाजाला घडविले...’ व उभरते गीतकार गायक रुपेश मुनेश्वर यांच्या साथीने शिवरंजनी रागातील ‘माझ्या भीमाची पुण्याई, आम्हा माणूसकी देई...’ हे युगल गीत गाऊन प्रचंड टाळ्या मिळविल्या.


        लार्ड बुद्धा सिंगिंग हंटचे परीक्षक तथा साम वाहिनीवर झळकलेले गायक सुरेश पाटील यांनी वामनदादा रचित ‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...’ व कलावती रागातील ‘पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली...’ ही गीते प्रस्तुत करून रसिकांवर मोहिनी घातली. युवा गायक कामराज माडपेल्लीवार यांनी ‘पहा पहा मंजुळा, हा माझ्या भीमरायाचा मळा’ हे भावस्पर्शी गीत गाईले.


         कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रुपेश मुनेश्वर यांच्या ‘आली जयंती जयंती, भीम माऊलीचा सण’ या कवी काशीनंदाच्या गीताने बहार आणला. एकापेक्षा एक सरस गीतानंतर सुरेश पाटील यांच्या ‘लई बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात’ या गीताने कार्यक्रमाचा शेवट झाला. कार्यक्रमाचे निवेदन उत्तम कानिंदे यांनी केले. प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी आभार मानले. सिंथोसायझर (की बोर्ड) अनिल उमरे व प्रकाश सोनवणे, तबला प्रफुल्ल वाघमारे, ॲक्टोपॅड राहूल तामगाडगे व ढोलकी साहेबराव वाढवे यांनी साथ संगत केली. नव्यानेच प्रज्ञासूर्याचे नाव मिळालेल्या ताऱ्या जवळच्या सूर्यकिरणांबरोबर पहाटेच्या मंजूळ स्वरांनी संगीतमय वातावरण निर्माण झाले होते.


       प्रसिद्ध व्हायोलीन वादक पंडित बाळ साठे ब्रदर्स यांचे आदर्श संगीत साधक असणारे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चौंसष्ट ललित कलेतील सर्वश्रेष्ठ संगीत कलेतून अभिवादन करणाऱ्या ‘भीम पहाट’ ह्या कार्यक्रमाचे निर्मिती सहायक म्हणून रामजी कांबळे, प्रा. रविकांत सर्पे, ॲड. के.के. साबळे, डॉ. आशिषकुमार बनसोड, डॉ. मनोज घडसिंग, डॉ. महेंद्र कांबळे , डॉ. संजय लोमटे, मनोहर भजगवळे, प्रा. डॉ. पंजाब शेरे, प्रा. गजानन सोनोने, प्रा. आनंद सरतापे, रमेश मुनेश्वर व महेंद्र नरवाडे यांनी भरीव योगदान दिले.


         सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष ॲड. सम्राट सर्पे व सर्व पदाधिकारी आणि शिवाजीनगर उत्सव समिती अध्यक्ष विवेक ओंकार व सर्व कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages